फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
स्त्रीयांनी आपल्या आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोनातुन जीवन जगावे व आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करून उच्च ध्येय प्राप्त करावे, असे कंधार न्यायालयाच्या न्यायाधीश मनीषा साखरे यांनी फुलवळ येथे महिलांना मार्गदर्शन करतेवेळी बोलून दाखविले.
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे तालुका विधी सेवा समिती कंधार व ग्रामपंचायत कार्यालय फुलवळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला कायदेविषयक शिबिराचे आयोजन कै.दिगंबरराव पटणे सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार येथील कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीश मनीषा साखरे तर प्रमुख अतिथी म्हणून फुलवळच्या सरपंच सौ.विमलबाई नागनाथ मंगनाळे, ॲड. सुप्रिया उम्रजकर तर प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड. बी.टी. राठोड, ॲड. शेख निजाम, ॲड. पांडुरंग गायकवाड, आर.डी. सोनकांबळे, ॲड. उमर शेख, राम सोनकांबळे, एन.डी. सोनकांबळे, ग्रामविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना न्या.साखरे म्हणाल्या, महिला या बुद्धिजीवी असून अनेक प्रकारचे गुण कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. परंतु नकारात्मक विचारातून त्या अंधश्रद्धा व वाईट चालीरीतीच्या गर्तेत न भरडता, सकारात्मक दृष्टीकोनाचा अंगीकार करून उच्च शिक्षणाची कास धरावी व आपल्या घरातील मुलींना शिक्षण कौशल्याच्या माध्यमातून उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी कटीबध्द राहावे ही काळाची गरज आहे. आज महिलांनी चूल आणि मूल एवढ्या पुरतेच मर्यादित राहू नये. आपल्याच भगिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतल्याचे आपण पाहत आहोत त्यांची प्रेरणा घेत आपणही पुढे यावं असे आवाहन केले आहे. आपल्यातील एखाद्या महिलेची न्यायालयीन लढाई असेल ती कोण्या व्यक्तीच्या विरोधातील नसते ती लढाई अन्याय अत्याचाराच्या विरोधातील लढाई होय. अशा प्रकरणात न्यायालय आपल्या पाठीशी असून आपणास योग्य न्याय दिला जातो असेही त्या म्हणाल्या.
ॲड. राठोड, ॲड. गायकवाड, ॲड. शेख निजाम यांनी महिलांना आपल्या मार्गदर्शनातून कायदेविषयक सल्ला दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून सुरुवात करण्यात आली आणि न्या.साखरेंच्या हस्ते ‘स्त्री आणि फौजदारी कायदे’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत च्या वतीने उपस्थित मान्यवर व महिलांचा शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयमाला संतोष डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन विश्वांभर बसवंते यांनी केले. उपस्थितांचे आभार सौ.दीपिका प्रदीप मंगनाळे यांनी मानले. या शिबिराची सांगता “मोजता येत नाही जगाच्या मापानं, असं शिक्षण दिलय सावित्रीबाई फुले या मातेनं” या गीताने करण्यात आली. यावेळी महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य, महिला अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा वर्कर यासह गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.