फुलवळ(धोंडीबा बोरगावे )
नांदेड-उस्माननगर-मानसपुरी-बहादरपुरा-फुलवळ-जांब मार्गे जाणारा बिदर राष्ट्रीय महामार्ग क्र.५० चे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम रखडले आहे. हे काम थंड बस्त्यात असून अनेक ठिकाणी अर्धवट झालेल्या कामामुळे व या रखडलेल्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे सदर रस्त्यास कांहीं ठिकाणी पांदण रस्त्याचे स्वरूप आले असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
त्याचा हकनाक त्रास सर्व सामान्य जनतेस होत असून फुप्फुसाच्या गंभीर आजार व डोळ्यांच्या आजाराशी त्यांना सामना करावा लागत आहे, तर अनेक दुचाकी स्वारांना या रस्त्यातील खड्ड्यांमुळे व धुळीमुळे अपघात होऊन हात पाय गमवावे लागत आहेत. त्यामुळे या रस्त्याला नेमका जबाबदार कोण? आम्ही दोष द्यायचा कोणाला रस्त्याला , ठेकेदाराला की संबंधित रस्त्याकडे दुर्लक्षित करून नागरिकांच्या जिवाशी छळणाऱ्या बांधकाम विभागाला असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत असल्याचे ऐकावयास मिळत आहे.
क्रांती भवन बहादरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलावरून फुलवळ मार्गे जांब जाणारा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे मन्याड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रखडलेला रस्ता केवळ एक किलोमीटर अंतराचा आहे. या रस्त्याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाहनधारकांसह पादचारी व सर्वसामान्य जनतेस वेठीस धरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
बहादरपुरा मन्याड नदीवरील पूल हा धोक्याची घंटा देत असल्याचे अनेक प्रसिद्धी माध्यमांनी संबंधित विभागाच्या व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे संबंधित विभागाने प्रसिद्धी माध्यमांची दखल घेऊन या पुलाचे काम दि.१ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात येऊन या कामास तब्बल एका महिन्याचा कालावधी लागल्यामुळे वाहनधारकांसह पादचारी फुलवळ-दत्त टेकडी-शेकापूर-घोडज मार्गे कंधार असा पर्यायी मार्ग अवलंबून केवळ दीडशे मीटरच्या अंतरासाठी तब्बल नऊ किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. याच कालावधीत संबंधित पुलाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. केवळ पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि बाकी जैसे थे ठेवण्यात आले. त्यामुळे दिवसेंदिवस या एक किलोमीटरच्या खड्डेमय रस्त्यास पांदण रस्त्याचे रूप आले असून या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर बाब आहे, त्यासाठी संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन या रस्त्याची तात्पुरती डागडुगी करून भविष्यात होणारे अपघात टाळावेत अशी मागणी वाहनधारकांसह सर्व सामान्य नागरिकांतून केल्या जात आहे.