ःआजच्या टिव्ही मोबाईलच्या जमान्यात जग जवळ आलय. जग इतकं जवळ आलय की प्रत्येकजणला वाटतय की त्या जगाला आपण आपल्या कवेतच घेवून फिरतोय. खरच असं प्रत्येकाला वाटत आहे. आपण सगळे चर्चा करतोय जगात जेवढे प्राचीन देश आहेत त्यापैकी भारत हा एक देश आहे. त्याचप्रमाणे जगात ज्या काही प्राचीन संस्कृती आहेत त्यात भारतीय संस्कृती चांगलीच तग धरुन आहे . भारतीय संस्कृतीची पाळेमुळे जनमानसात घट्ट रुतून बसलेली आहेत. भारतात मानवता जोपासली गेली. माणुसकीचे दर्शन येथेच घडले व घडत राहते.
भारतातील साधुसंतानी विश्व हेची माझे घरं ही शिकवण दिली. जय जगत ही कल्पनाही भारतीयाचीच. सब भूमी गोपालकी हेही घोष वाक्य आपल्याचं भूमितलं. या घोषणा जरी चांगल्या दिसत असल्या व चांगल्या आहेत ; पण भारतातही जात,वंश,धर्म, वर्ण मानण्यात भारतीय समाज बराच पारंगत आहे.पूर्वीच्या काळी जातीयतेचे चटके बसलेला समाज. विषमतेत भाजून निघालेला समाज आज घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रगती करताना दिसतोय. भारतीय समाज शिकला. शिकलेला समाज शाहणा झाला. बौद्धीक प्रगतीबरोबर आर्थिक प्रगतीही झाली. अधुनिक जग जवळ आलं. जगात दूरच्या एका कोपऱ्यात घडलेली घटना क्षणात जागाच्या दूसऱ्या कोप-यात कळायला लागली.
भारतीय हिंदू समाजात कसे वागावे कसे बोलावे हे त्या धर्मात सांगितलेले आहे. हिंदूनी जीवनात सोळा संस्कार हे महत्त्वाचे मानलेले आहे. हिंदूचे संस्कार हे वेगवेगळ्या विधीद्वारे केली जातात. हे संस्कार मानवी मुल्यांशी निगडीत आहेत. जीवनात मानवी मूल्य जपले जावेत यासाठी आहेत. आगदी गर्भधारणेपासून ते विवाहपर्यंत आई वडील ,गुरु यांच्याकडून हे संस्कार केले जातात. हे संस्कार वैदिक विधीनुसार केले जातात. या संस्कारांचा हेतू चांगला दिसून येतो. सात्वीक वृतीची जोपासना व्हावी. सद्गुण वाढीस लागावे हा या संस्कारामागचा हेतू दिसून येतो. हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत एकून सोळा संस्कार विधी करतात.
भारतातील समाज हा आपआपल्या संस्काराचा समृध्द वारसा घेवून जगतो आहे. भारतीय समाजाचा निसर्गाशीही अतुट नातं जोडलं गेलेलं आहे. आणि हे भारतीय जीवनशैलीचं एक खास वैशिष्टय आहे. भारतात जे हिंदू आहेत ते लोक हे सोळा संस्कार … गर्भाधान , पुंसवन , सीमंतोन्नयन, जातकर्म , नामकरण , निपक्रमण , अन्नप्राशन, कर्णवेध , चौलकर्म, उपनयन , वेदारंभ , समावर्तन, विवाह , वानप्रस्थ , संन्यास व शेवटचं संस्कार म्हणजे अंत्येष्टी. ह्या संस्काराच्या गोष्टी हिंदू समाज करत असतो.
मानवी जीवनातील विवाह संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे . धर्म ,अर्थ, काम व मोक्ष यासाठी हा संस्कार मोलाचा व महत्वाचा मानला जातो. तरुणाईची भोग इच्छा समाजमान्य मार्गाने पूर्ण करावे यासाठी विवाह संस्कार केले जातात. प्राणी व मानव यात हाच फरक जाणवतो. विवाह संस्कारामुळे वंशवेल वाढत राहते . समाजमान्य मार्गाने तरुण तरुणीला विवाह संस्कारामुळे जीवनात स्थैर्यप्राप्त होते.
आता भारतीय संस्कृतीत स्त्रीला पवित्र स्थान दिलेले आहे. येथे स्त्रीशक्तीचा जागर घातला जातो. येथे स्त्रीला पूजले जाते. स्त्री ही चारित्र्यवान असावी. शीलवान असावी आशी अपेक्षा आपल्या देशात केली जाते. स्त्रीचं चारित्र्य हे काचे सारखं आहे. तिनं ते जपावं म्हणून लहानपणासून तिच्या मनावर बिंबवलं जातय. काच फुटू नये म्हणून घरातील आई बाबा भाऊ ही सगळी मंडळी डोळयात तेल घालून जपत असतात. तिचं कुठं चुकून वाकडा पाय पडू नये म्हणून सर्वजण सांगत राहतात, ” बाई बग ग माय चाल बिगडू देवू नग सरळ बगुन चाल.” तिचं विवाह होईपर्यंत सर्वांना काळजी .. ( घरातील दिवटा काहीही केलं तरी चालते. मर्द आहे तो)
चला आपणही विचारपूर्वक काळजी घेवू की या संस्काराची ;पण या अधुनिक युगात लग्न हे संस्कार राहीलय का ?काळानुसार बदल होतात. बदल होत आहेत व होत राहणार आहेत;पण लग्नात अलीकडे लईच बदल दिसून येत आहेत.व हे बदल संसर्गजन्य रोगाप्रमाणे झपाटयात पसरत आहेत. माणुस म्हणुन आपण आधुनिक होवू या ;पण चांगल्या वाईट गोष्टीचा विचार करुनच. याचा विचार कोणीही करताना दिसत नाही . मी बढा तू बढा करत आपण पळत आहोत हे निश्चित.
आता सारासार विचार करण्याची बुद्धी आपण गहाण ठेवली आहे . चांगलं काय वाईट काय याचं विचार समाजात होताना दिसत नाही. गावात एखादयाने लग्नात चार पाचशे माणसं जमवल की दुसरा हजार माणुस जमवतो. आता गावात , शहरात लग्नात चढाओढ दिसून येत आहे . लग्नाची जूनी रीत जावून नाविन रीत जन्मास आली आहे . लग्नात ही वाईट, बिनकामाच्या खर्चीक बाबी मुद्दाम घुसडल्यासारख्या वाटतात . लोक मागचा पुढचा विचार न करता त्या गोष्टीचे अनुकरण करताना दिसत आहे .
मी या पाच सहा महिन्यात चार पाच लग्नात हजार होतो. आता पूर्वीचे लग्न म्हणजे चार पाच जण वाजवणारे राहायचे.शंभर दोनशे पाहुणेरावने यायचे.जमीनीवर बसुन जेवायचे . लग्नात मोजून चार पाच पराती, चार पाच वाटया , तांब्या , जमलं तर सावगवणी लाकडाची बाज द्यायचे. हे सर्व इतिहासजमा झालं. असं कोणी केलं तर तो बुद्धीने मागास आहे. आता हळूहळू हे सर्व बदलत गेलं. गावातील आमक्याने दहा हजाराच सामान दिलं म्हणून तमक्याने विस हजाराच सामान देवू लागले. लग्नात नव नविन करण्याची जनू स्पर्धाच सुरु झालेली आहे. बिनकामी खर्च वाढला आहे. यामुळे गरीबाच्या मुलीचे त्यांच्या आईबाबाचे हाल हाल होत आहेत .
. आगदी आलीकडील चार पाच वर्षात तर लग्नात लईच बदल झालय. लग्नाच्या वेळी मंगल कार्यालयात सेनिमात आसल्यासारखं पांढरा पडदा लावालेत. माणसं मंडपात … आता कुठं मंडप राहीलय ?मंगल कार्यालयात जमा झाली की त्यांच्या डोक्यावरून ड्रोन विमान फिरवालेत. चार पाच पोरं सारखं डावा डोळा बंद करुन फोटो खेचत असतात. आता तर मंगल कार्यालयात पडद्यावर सिनेमासारखं नवरी नवऱ्या मुलामुलीचं सिनेमा दाखवतात. काय जमाना आला बघा अधुनिकतेचा नावाखाली नुसता नंगा नाच चालू झालय .
.मला सुरवातीला वाटलं हे पडद्यावरील चित्र लग्नाला आलेल्या लोकांच्या करमणुकीसाठी दाखवत असतील , पण माझ्या शेजारी बसलेला माझा मित्र म्हणाला , ” नवरा नवरी छान आहेत.” मी म्हणालो, ” नवरा नवरी कुठं हातं ? ” नवरा नवरी आले म्हणून मान वाकडी करून पाहू लागलो. तर माझा मित्र म्हणाला , ” पडद्यावर बघ ना” मी म्हटलं , आरे ते कसे नवरा नवरी असतील त्याचं लग्नच झालं नाही आजून. मग ते एकमेकांचा तोंडात तोंड कशाला खुपशातील ? तो लग्नापूर्वी मुलीचं चूंबन कसं काय घेईल ? ती धबधब्याखाली ओलीचिंब कशी होईल? ती मुलाकडे तोंड करून मुलासमोर दुचाकीवर कशी काय बसेल ? ती गुडघ्याच्यावर कपडे करून समुद्रात कंबरंइतक्या पाण्यात जाऊन त्या मुलाला गच्च मिठीत घेवून का उभी राहील ?तो मुलगा हीरोसारखं त्या मुलीला स्वतःच्या उरावर कसं काय आवळून, दाबून धरेल ? माझा मित्र माझ्या बालीश प्रश्नाला फक्त हसत राहीला.
पण हे सर्व सत्य आहे. मला प्रश्न पडला ज्या मुलीला आई बाबा आजपर्यंत जपले. तिला शिल, चारित्र्य हे समजावून सांगत राहीले ते तिला लग्नजमेपर्यंत कधीच बाहेर पाठविले नाही . मग आताच तिच्या लग्नापूर्वीचं तिला त्या मुलाच्या हवाली का केले असतील ? सिनेमासारखं चित्रिकरण करुन जमलेल्या लोकांसमोर प्रदर्शन का करीत असतील ? आपल्या संस्कृतीत लग्न झाल्याशिवाय त्या ठरलेल्या मुलासोबत मुलीला पाठवत होते का ? लग्नापूर्वीच परक्या मुलासोबत आपली मुलगी पाठविणे संस्कृतीला धरुन आहे का? समजा लग्न एखादी वेळेस मोडलं तर ?पुढं आपल्या बाईलेकीचं कसं होईल.आहो पाण्याला आग लागत नाही पण लागली तर ?जमेल का त्या युवतीच भविष्य? समजा जमलच तर तो त्या काढलेल्या चित्रविचित्र सिनचं दुरूपयोग करणार नाही का ? मग जीवनभर त्या मुलीच्या जीवनात वादळ घोंगावत राहणार नाही का ?
असे असंख्य प्रश्न माझ्या मनात घोंगावत होते. लग्न सोळा संस्कारापैकी एक खरचं अधुनिकतेच्या नावाखाली ओंघळ रुप धारण करीत आहे.जे आज स्वतःला संस्कृतीचे संरक्षक समजतात ते पण मूग गिळून गप्प बसलेल आहेत. समाजातील धनदांडगेच प्रकार रुढ करत आहेत. व त्या प्रवाहात सामान्य माणुस ही वाहून जात आहे.
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड _६
९९२२६५२४०७