फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ ग्रा.पं. अंर्तगत असलेल्या महादेव तांडा येथे वर्षाचे बाराही महीणे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा असो पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते त्यामुळे आम्ही शाळेला जावं , मोलमजुरी ला जावं का दिवसभर पाणीच भरत राहावं? असा सवाल महादेव तांडावासीयांकडून फुलवळ ग्रा.पं. ला विचारत असल्याचे ऐकावयास मिळत आहे. या तांड्याच्या नावे पाणी पुरवठ्यासाठी विविध योजनेतुन भरघोस निधी शासनाकडुन आणला पण अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने ही योजना केवळ निधी उचलुन घेण्यासाठी होती का? असेही येथील जनतेतून बोलल्या जात आहे.
ग्रामपंचायत चे नळाला येणारे पाणी कधी आठ दिवसाला तर कधी दहा दिवसाला येते, तेही दुषित पाणी. त्यात ब्लिचिंग पावडरचा वापर तर कधीच होत नाही असेही या तांड्यावर राहणाऱ्या लोकांनी बोलुन दाखवले. पिण्याचे तर पाणी आम्हाला वर्षाचे बाराही महीणे एक-दिड किलो मिटरहुन आणावे लागते. पावसाळ्यात चिखल तुडवत तर थंडीच्या दिवसात कुडकडत व उन्हाळ्याच्या दिवसात पाय भाजत महादेव मंदिरा जवळील बोअरहुन तर कधी कंधारेवाडी शिवारातील बोअरहुन पाणी भरावे लागते असे येथील महीला व पुरुषांनी सांगितले.
ग्रा.पं. ला अनेकवेळा आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी काहीतरी उपाय योजना करा अशी विनंती केली पण ग्रा.पं. काही लक्ष द्यायला तयार नाही. या वार्डातील संबधीत सदस्य ही मान्य करतात की या तांड्यात पिण्यासाठी पाणी नसून आमचा नाईलाज असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी यांना आपण कळवलं का? असा प्रश्न येथील तांड्यावरील लोकांना केला असता त्यांनी हो ग्रामसेवकच आठवडा आठवडा येत नाहीत आणि या ग्रा.पं. ला वर्षातुन दोन-तिन ग्रामसेवक येऊन बदलुन जातात मग आलेल्या ग्रामसेवकांना आम्ही कळवतो व ते पण व्यवस्था करु असे सांगतात व दुसऱ्या वेळी दुसराच ग्रामसेवक येथे येतो. कायमस्वरुपी येथे ग्रामसेवकच नसल्यामुळे येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रतिक्रिया :-
1)संजीवनी केशव चव्हाण
मी नववी वर्गात शिकते. माझी शाळा तांड्यापासुन दोन किमी अंतरावर आहे. शाळेला जाण्या अगोदर आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी एक-दिड किमीहुन पाणी आणूनच शाळेत जावे लागते. कधी उशीर झाला तर शाळाही बुडते. आमची ग्रा.पं. ने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, वर्षाचे बाराही महीणे आमची पाण्यासाठी भटकंती चालुच असते.
2)आश्विनी चव्हाण:-
मी सातवी वर्गात शिक्षण घेते. पिण्याच्या पाणीसाठी आमच्या तांड्यावर वर्षाचे बाराही महीणे उन्हाळा, हिवाळा, पाउसाळा पायभाजीत, चिखल तुडवत, कुडकुड पाणी आणूनच शाळेला जावे लागते, अनेकदा पाणी आणताना निसटुन पडल्याचेही सांगितले. कधी शाळेला उशिर झाला की शाळाही बुडते त्यामुळे आभ्यासवरही परिणाम होतो.
3)पंचफुला लोभाजी राठोड :-
आम्ही दिवसभर कामासाठी, पोटभरण्यासाठी मजुरीने जातो. दिवसभर काम करुन पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा पायपिट करीत पाणी भेटेल तेथुन आणावे लागते. वर्षाचे बाराही महीणे आम्हाला पाणी पायपिट करुनच भरावे लागते. ग्रामसेवकही काही करीत नाहीत व सरपंच, सदस्यही कुणी लक्ष देत नाहीत. आम्ही तांड्यावर राहतो म्हणजे आम्ही काही जनावरे नाहीत.
4)तिरुपती चव्हाण:-
मी शिक्षण घेण्यासाठी कंधारला असतो. सुटीला गावाकडे आलो तर पिण्यासाठी घागर घेऊन पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. तेही पाणी एक-दिड किमी अंतराहुन आनावे लागते. ही उन्हाळ्यापुरती गोष्ट नसुन वर्षाचे बाराही महीणे हेच हाल आहेत.
5)व्यंकटी राठोड:-
मी कामानिमीत्त बाहेर गावी जाऊन पोट भरतो. कधी सणावाराला गावाकडे आलो तर पिण्यासाठी पाणी पण भेटत नाही. तुम्ही एकदिवस घागर घेऊन एक-दिड किमीहुन पाणी आणा म्हणजे काय हाल होतात ते तुम्हाला समजेल, इतकी ग्रा.पं. आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तांड्याला जाण्यासाठी निट रस्ते देखील नाहीत दगड गोट्यातुन जावे लागते.
6)प्रविन बालाजी चव्हाण:-
अनेक वेळा मी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, सदस्य यांना पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करा अशी विनंती केली होती पण आमचे कुणी ऐकुन घेत नाही. फुलवळ ग्रा.पं. अंर्तगतच आमचा तांडा आहे मग भेदभाव का करता? शासनाच्या विविध योजनेतुन पिण्याच्या पाण्यावर खर्च झालेला तुम्ही दाखवता मग पाणी का भेटत नाही? वर्षाचे बाराही महीणे आम्हांला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. नीट रस्ते देखील नाहीत दगड गोट्यातुन जावे लागते, असे ते म्हणाले.
7)ग्रामविकास अधिकारी सोनकांबळे यांना तांड्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला का? असे विचारले असता त्यांनी मी गाडीवर आहे नंतर बोलतो असे म्हणुन फोन ठेवला.
8)उपसरपंच हे याच तांड्यावरुन विजयी झाले होते पण उपसरपंच जवळपास एक वर्षापासुन गावातच नाहीत असेही तांडावासीयांनी सांगीतले.