युद्ध नको, बुद्ध हवे.

 

ईथे वैराला उत्तर मैत्री आणि प्रेम आहे.
माणूस नावाच्या जाती-धर्मात जन्माला आलेल्या‘माणसा’चा मानव म्हणून संवेदनशील व हृदय स्पर्शी जीवन जगण्याचा हा मूलाधार आहे. संपूर्ण जगाला अहिंसा, करुणा व मैत्रीचा संदेश देणारी बुद्धांची ती स्थितप्रज्ञ मूर्ती सांगत असते. पण तोफगोळय़ांचा मारा करून क्षणार्धात त्या मूर्तीची नासधूस केली जाते.
मार्च २००१ मध्ये अनेक बुद्धमूर्ती तोडण्यात आल्या. त्यानंतर अफगाणिस्तान व काबूलमध्ये काय घडलं नि आजला काय घडतयं, हे उभे जग पाहत आहे.
द्वेषाने पेटलेला ‘माणूस’नावाचा दहशतवाद अवघ्या जगासाठी धोक्याची घंटा ठरतो आहे. हा माणूस येत्या काळात काय विद्ध्वंस घडवेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही. हा माणूस माणसाचा वैरी का झाला? एकमेकांच्या रक्ताची होळी खेळण्याइतपत तो हिंस्त्र व पशू का झाला? ‘माणूस’ नावाच्या जगातील सर्वात मोठय़ा धर्माला त्याचे उत्तर सापडत नाही वा त्याला ते समजून घेण्याची गरजही वाटत नसावी का?.
बुद्धत्वाची, प्रज्ञेची प्राप्ती जगातील कोणतीही व्यक्ती करू शकते. तिला धर्म, भाषा, प्रांत व जातीचे कोणतेही बंधन आडवे येत नाही. मग, जगभर पसरलेल्या मानवी दहशतवादाचे मूळ कशात आहे? हा प्रश्न दररोज जगण्याची लढाई लढताना प्रत्येक माणसाला अस्वस्थ करतो आहे.
२६-११, ७-११, ९-११ दिनदर्शिकेची प्रत्येक तारीख नि वार काय रक्तपात घडवेल हे कोणता भविष्यवेत्ता सांगू शकणार नाही. ही भीषण परिस्थिती का व कोणामुळे निर्माण झाली?
“माणसा अजब कशी रे तुझी विचारधारा! हरकत नसते तुझ्या घरात घाण असायला? हे नाही कळतं त्याला, की झाकलेली घाण बाधणार आहे शेवटी त्यालाच! लगेच स्वच्छ व्हावं म्हणून काढून फेकावं दूर त्याला! नको थारा त्या काडी कच-याला! मनात नको पुसटसे विकृत विचार उरायला. असे दुष्टपणे वागणे हिंस्त्र प्राण्यांना शोभते!”
क्रौर्य आणि हिंसा हा पशूंचा धर्म आहे. विवेकी माणसाचा तो अधर्म होईल. तेव्हा क्रूर आणि हिंसक कर्म न करणे, हेच माणसाच्या सुखसमृद्धीचं मर्म आहे. सुज्ञ माणसाने दुष्टविचार व दृष्टप्रवृत्ती टाळावी, मानव धर्म पाळावे,भांडणतंटे व अशांतता यांना आळा घालावे. ते न कुणाच्याही हिताचे हे जाणावे. माणसाने माणसाला का आणावा कमीपणा? संपूर्ण विश्वात शांतता नांदण्यासाठी ‘मानवधर्म’ आपणाला हीच शिकवण देतो. त्यानंतरही दहशतवाद उफाळून येतोच.
माणसाने माणसांवर केलेल्या हल्ल्यात १२९ माणसे मृत्युमुखी पडतात. मृतांना श्रद्धांजली, कँडलमार्च निघतो. काळा दिवस म्हणून ‘७-११’ची नोंदही होते. जग आणि माणूस कुठेच थांबत नाही. चक्र सुरू राहते. २६-११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटवरील हल्ला, मुंबई, राजस्थान, दिल्ली, हैदराबाद या देशातील प्रमुख शहरांत दहशतवाद्यांनी घडवून आणलेला रक्तपात.
बॉम्बस्फोट मालिकां किडय़ा-मुंग्यांप्रमाण माणसे मरणे व त्यांना मारणे इतकी मानवी दहशत पसरली आहे.
पशूहून हिंस्त्र झालेला माणूस एकमेकांच्या जीवावर उठला आहे. युद्ध हाच त्याला पर्याय वाटू लागला आहे. द्वेषाला उत्तर द्वेष, हेच त्याच्या डोक्यात भिनले आहे. प्रत्येक माणसांतील मानव हित जपणारा आणि मानव धर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ मानणारा बुद्धाचा शांतीचा ‘सन्मार्ग’ तो स्वीकारेल का?
अवघ्या जगाला शांती, प्रज्ञा आणि मैत्रीची शिकवण देणा-या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या भारत देशात‘असहिष्णुते’ ने वातावरण गढूळ केलं आहे. नाना जातींचा, नाना धर्माचा, विविध भाषा बोलणारा भारत देश स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या पायावर टिकून आहे. भारतीय संविधान हा पवित्र ग्रंथ आपणा सर्वाना देशधर्म सांगत आहे,‘मी कोणत्याही जात, धर्माचा असलो तरी ‘मी प्रथम भारतीय व अंतिमही भारतीय आहे’
पण, भारतात धर्म नि जातीच्या नावाने आपसात युद्ध घडवणे सहज सोपे हे ज्यांना ठाऊक आहे. ते माणसा-माणसांत आगी लावून देण्याचे काम करत आहेत.
‘असहिष्णू’ या शब्दाभोवती सध्या देशाचे राजकारण नि समाजकारण फिरतं आहे. समाजवाद व धर्मनिरपेक्षतेची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याच्या पासष्टीनंतर का होईना, सुरू झाला आहे. धर्मनिरपेक्षतेची व्याख्या जो-तो आपल्या परीने करत आहे. काहींना भारतीय राज्यघटनेमुळे मिळालेल्या संविधानात्मक पदाचाही आदर राखणेही अवघड जात आहे.
देशात ‘धर्मयुद्ध’ पेटण्यास या नेते मंडळी खतपाणी घालण्यात नाहीत का?‘असहिष्णुता ‘ म्हणजे काय रे भाऊ..! असा सवाल देशातील गरीब, कष्टक-यांना पडला आहे.
बुद्धिजीवी आणि साहित्यिकांची ‘पुरस्कारवापसी’ ही त्याला उमजत नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून काही ‘वाचाळवीरांची’ फौज देशातील सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. विविधतेत एकता सांगणारा नि ‘मानव धर्म’ जोपासणारा आपला भारत देश संपूर्ण जगासाठी आदर्श.
इथे विज्ञानवाद जवळ करणारा, अहिंसा, प्रज्ञा, मैत्री, करुणा आणि मुदिता हा युद्धापासून परावृत्त करणारा बुद्धांचा मार्ग आहे.‘पुरस्कारवापसी’पेक्षा परिवर्तनाचा रथ पुढे जावा. या रथाचे सारथ्य प्रत्येकाने करावे,
जात, वंश, लिंग, भेदाच्या भिंती येथे कोसळून पडाव्यात. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या भारतभूमीत आपसातील युद्धाची भाषा थांबावी. हा शांती व ममतेचा संदेश घेऊन जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारतात ‘शांतिदूत’निर्माण होण्याची गरज आहे.

 

रूचिरा शेषराव बेटकर,नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *