काल सदाशिवपेठेत माझ्या प्रकाशकाच्या ऑफीसला गेले होते.. येताना तुळशीबागेत सहज चक्कर मारायचा प्लॅन होता आणि श्रीकृष्ण मिसळ खायची पण आमच्या पुण्यात मिसळ ७ वाजता बंद झाली आणि मला तिथुन परत यावे लागले..
बाहेर पडताना डाव्या हाताला एक वयस्कर आजोबा पैसे मागत बसले होते.. आजोबा पाहिल्यावर वाटलं , त्यांना काहीतरी द्यावे तितक्यात माझा फोन वाजला म्हणुन तिथेच बाजूला उभी राहुन फोन घेतला.. फोन संपवुन पर्स उघडणार तितक्यात एक लेडी तिथे आली आणि आजोबाना म्हणाली ,काय रे म्हाताऱ्या अजुन डबा रिकामाच का ?? .. भिक मागुन कमवायची पण लायकी नाही का ?? .. मी उघडलेली पर्स पुन्हा बंद केली .. ती लेडी तिथुन निघुन गेली होती म्हणुन मी आजोबांच्या जवळ गेले आणि म्हणाले ,आजोबा कोण होती हो ती ?? .. त्यांच्या डोळ्यात पाणी दिसले .. मी म्हटलं ,,आजोबा हे पैसे घ्या .. मला माफ करा .. मी तुम्हाला विचारायला नको होते.. तितक्यात ते म्हणाले , पोरी तसं नाही..ती सुन होती माझी .. तिने थोड्या वेळापुर्वी माझ्या डब्यात साठलेले सगळे पैसे नेले आणि आता पुन्हा आली.. हे तुमचे पैसे परत घ्या आणि मला काहीतरी खायला आणुन द्या…नाहीतर आजही रात्री मला उपाशी झोपावे लागेल.. मी त्यांना खायला आणुन दिले पण खुप वाईट वाटलं..यात मला कोणालाच दोष द्यायचा नाही पण तो रिकामा डबा आणि भरलेलं मन मला माझ्या बालपणात घेउन गेलं कारण लहानपणी आमच्या फडताळात ( कपाटात ) बऱ्याचदा मी असा रिकामा डबा पाहिला होता ज्यात ५ पैसेही नसायचे आणि मला पुस्तक किवा पेंसील हवी असायची.. आज त्याच पुस्तक पेन ने मला तुमच्यासारखे वाचक भेटले..
मी थोडी डीस्टर्ब झाले पण काळ आणि वेळ हेच सगळ्यावर औषध असते.. उद्या त्या आजोबांच्या जेवणाचे काय हा प्रश्न वरचा सोडवेल पण त्या प्रसंगाने पुन्हा एकदा मला जमीनीवर राहायला शिकवले..आयुष्यात प्रत्येक क्षण आपल्याला काहीना काही शिकवतो.. फक्त आपले डोळे उघडे हवेत..
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री