हिवाळ्याचे दिवस होते. डोंगराचं पोट चिरुन सूर्य हळूहळू वर येत होतं. हिरानगर जाग झालेलं होतं . सोनेरी सूर्य किरणे आकाशाला झाकत होती. गुलाबी लालसर रंग पांघरुन आकाश पशुपक्षांना खुणवत होतं.चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होता.बरेच पक्षी थंडीमध्ये गुपचूप बसलेले होते.वातावरण शांत होतं;पण मध्येच टिटवी टीव टिव टिटी टिवचा सुर धरलेली होती.
हिरानगर गावात बाईगड्याचा वावर सुरू झालेला होता.थंडी अंगाला झोबत होती.हातपाय गार पडत होते.म्हातारीकोत्तारी,लहान शेंबडी मुलं शेंबूड ओढत, खोकलत शेकोटया जवळ बसली होती.
गावातील तरुणमंडळी शेताकडे निघाली होती.कोणाच्या हातात कोयता होता.तर कोणाच्या हातात कत्ती होती.कंठीरामदादाही शेताकडे निघाला होता.हातात विळा,अंगाला गोधडी लपेटलेली.थंडीने दातांचा कुडकुड आवाज येत होता.शेत गावाच्या वरलाकडे होतं.
कंठीरामदादा शेतात पोहचलं .शेताच्या जवळच कोणीतरी दोन पाली ठोकलेल्या होत्या.पालीचं समोरचा भाग कापडाने झाकलेलं होतं.मध्ये कोण होते?कितीजण होते याचा अदांज दादाला काही बांधता आला नाही.पालीजवळ जावून तो थांबला ;पण खाली वाकून पालीकडे पाहिला नाही. शेतातून बैलासाठी चारा घेवून घरी आला.घरात सर्वांना सांगितलं,”आपल्या शेताजवळ कुणीतरी आलेत.”
दादा दुपारी पुन्हा त्याच शेताकडे गेला. आता पाल जागी झालेली होती.तिन चार लहान मुली मुलं खेळत होती.एकाही मुलां मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. भोगळीच होती.डोक्यावर मळके केस.मळक्या अंगावरुन पांढऱ्या रंगाचं ओगळ गेलेलं. बाया पालीमध्ये बसून काहीतरी बोलत होत्या.दादा पालीला भेट देवून परत आला.
दादा बैचन होता. शेताजवळ पाली कोणाच्या ? ते कुठून आले असतील ? मग माज्याच शेताजवळ का थांबले असतील ?ते कोण असतील ? असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते .
दिवस मावळतीला गेला होता.पशुपक्षी घराकडे फिरत होती.डोंगर सूर्याला त्याच्या पोटात सामाऊन घेत होता.दादा पुन्हा शेताकडे गेला. गावापासून शेत हाकेच्या अंतरावर आहे.कंटीरामदादा शेतात गेला.एक नजर पालीच्या दिशेने टाकलं. त्याचवेळी चार माणसं पन्नास एक लव्हरं (लावी ),तीतर,दोन तीन ससे घेवून पालीसमोर येवून थांबली.त्यातलं एकजन म्हणाला,”ओ मामा इकडं ये की.असं दुरुन का बगुलालास.हां हां” दादा काही बोलला नाही ;पण तो पालीकडे गेला.पालीसमोर थांबलेली सर्वच एका सुरात म्हणाली,”रामराम जी,हे वावर तुमचं हाय का ? ” दादा म्हणाला,” होय माजचं हाय. म्याच शेताचा मालक हाय.”
चारजनापैकी एक म्हणाला,”मालक लव्हरं,तीतर व ससा यापैकी तुमाला जे आवडतय ते घेवून जा की. ” दादा म्हणाला,”माज्याजवळ पैका नायी गा” मोहरक्या म्हणाला,”हिंग तुमाला कोण मागूलालय गा.पैका देवू नगस.” दादानी दोन तीतर घेतले. बराच वेळ गप्पा मारले व घरी निघून आले.असं दोन तीन दिवस गेले.चौघापैकी एक त्यांचा मोहरक्या होता.तो दादाशी सलगी वाढवला.दादा साधा भोळा होता.घरची गरीब परिस्थिती होती.खाणारे तोंड जादा व कमविणारा तो एकटाच होता.दादा कोणावरही पट्कण विश्वास ठेवायचे.याचा फायदा त्या मोहरक्याने घेण्याचं ठरविलं.मोहरक्या म्हणाला,” दादा तुमी लई चांगले हाव. तुमचा सवभावबी मला लईच भावलाय.म्या तुमचं फायदा करावं मणूलालाव बगा.”दादा त्याच्या बोलण्यानं चक्क हुरळूनच गेला व म्हणाला, ” काय फायदा करणार हाईस माजा मला सांग की गा.” मोहरक्या म्हणाला,”सांगताव सांगताव उगीच गडबड नको करू.म्या जे तुला सांगणार हाव का नायी ते घरात,गावात कुणाला बी सांगू नगस.”दादा म्हणाला, “इ हे बग म्या कसं काय सांगीन.कुणाला बी सांगणार नायी.हे घे वचन.” दादानी मोहरक्याच्या हातावर हात मारला.आता मोहरक्याला हुरूप आला.तो दादाला पालमध्ये येण्यास सांगितले. भोळा दादा पालमध्ये जावून बसला.दादाच्या भोवती बाया पोरं पोरी गडी बसले. चौघापैकी एक पालीच्या बाहेर थांबला.
आता मोहरक्याने छोटीशी लाकडी पेटी उघडली. ती पेटी पिवळ्याजर्द दागिन्यांनी भरलेली होती.त्यात नथ होते.आंगठया होत्या.बांगडया होत्या.नेकलेस होते. सोनसाखळ्या होत्या.ते सर्व दागिने पाहून दादाचे डोळे दिपून गेले .गरीब घरातल्या दादाच्या मनात विचार येवून गेलं “काय गा येवडं सोनं माज्याकडं असतं तर?” मोहरक्या म्हणाला,” हे बग दादा हे सगळं सोन्याचंच हाय. यातलं कायी सोनं म्या तुला फुगट देवूलालाव. कोणालाबी सांगायचं नायी.तुला इकत घ्यायचं आसल तर तू घे . तूज्याकडं पैका नसल तर तु दुसरं गीराईक आण.हे सोनं तू विकून दिलास की तुला हे दोन दोन तोळ्याच्या दहा बांगडया फुगट.”दादा लईच हुरळून गेला. सपन तर पडलं नाही ना म्हणून स्वतःच चिमटी घेवून पाहू लागला.मोहरक्याने दादाला छोटासा सोन्याचा तुकडा दिला व म्हणाला,”जा बाराळीला व सोनाराला विचार सोनं खरं हाय का खोटं हाय.”
दादाला खूप आनंद झाला.सोने खरेदीसाठी दादाकडे फुटकी कवडी बी नव्हती.पण दादा कुठलातरी श्रीमंत गिराईक आणणार होता.दादाला विस तोळे सोनं फुगट मिळणार होतं. दादा झपाझप पावले टाकीत बाऱ्हाळीला पोहचला.सुखदेव सोनाराकडे जावून दादा त्याला म्हणाला ,”सोनार मामा म्या थोडं सोनं आणलाव हे खरंखुरं सोनं हाय का तेवंढ सांग की.” सुखदेव सोनारानं चष्मातून दादाकडे पाहिलं.तसा दादानं सोन्याचा तूकडा त्याचासमोर धरला.सोन्याचा तुकडा पारखून तो म्हणाला,”खरंखुरं सोनं हाय.”
सोनाराच्या तोंडून शब्द बाहेर पडल्याबरोबर दादाला खुप आनंद झाला.आता तो पळतच हिरानगरकडे निघाला. चालता चालता दादा विच्यार करत होता.गिराईक कोण मिळेल?दादाचं डोकं या विचारानं चक्रावून गेलं होतं. शेवटी दादाने विचार केला आपण बाबशेटवाडीच्या पोलीस पाटालाला सांगितलो तर ….?बाबशेटवाडीचे पोलीस पाटील बऱ्यापैकी श्रीमंत होते. दादा घरी येण्याऐवजी त्याने सरळ पोलीस पाटलाचे घर गाठले.पोलीस पाटील घरीच होते.पोलीस पाटील दादाला पाहून बाहेर आले. दोघांचा रामराम झाला.पोलीस पाटलाचं नाव होतं भिक्काजी. भिक्काजी स्वभावाने चांगला होता.गावात परिसरात त्यांची वट होती.भिक्काजी पाटील म्हणाला,”कसं काय येणं झालं गा? होय काय काम काढलाव ?.” दादा सुरवातीला म्हणाला,”हिंग आता कामकाढल्यावरच माणुस येतोय होय भेटायला.”हे बोलताना दादा जवळपास कोणी नाही ना याचा सुगावा घेत होता. मग हळूच तो भिक्काजीला म्हणाला ,”आत जावूत.घरात बसू.कानात एक गोस्ट सांगायची हाय तुमाला .” मग पोलीस पाटील व दादा घरात गेले.दादा हळूच सोन्याचा तुकडा पोलीस पाटलाच्या हातावर ठेवत म्हणाला , ” पाटील सोनं खरंखुरं हाय. सोनाराकडं म्या जावून आलाव. माज्या शेताजवळ फाशेपारधी आल्यात त्याचाकडं लई सोनं हाय किंमत बी लई कमी हाय तुमी घेवून टाका की.”
दादाचे शब्द ऐकून पोलीस पाटलाचं मन लईच हरकुन गेलं होतं.भिक्काजी म्हणाला ,”चल आताच जावू.” दोघंही हिरानगरला आले.थेट पालीच्या ठिकाणी गेले .वेळ संध्याकाळची होती.दिवस मावळत होता. प्रकाशाला चिरत अंधार पसरत होतं.पाटील सोनं घेण्यासाठी अतुर झालेले होते.दिवस मावळलं.लाकडं पेटवून पालीत ऊजेड केलं.मोहरक्याने पेटी उघडली.पाटलांनी सोनं पाहिलं. दादाच्या बोलण्यावर पाटलाचा विश्वास तर मोहरक्याच्या बोलण्यावर दादाचा विश्वास. पोलीस पाटलाने सोन्याच्या विस बागडया,आंगठ्या विकत घेतल्या.त्या काळात पोलीस पाटलानी दोन हजार पाचशे रुपये मोजले.हा व्यवहार सगळा अंधारात झाला.
पोलीस पाटील गेल्यानंतर दादानी सोन्याच्या दहा बागडया फुकट आणल्या. घरात कोणालाही न सांगता लपून ठेवल्या.दादाला दिलेलं खरंखुरं सोन्याचं तुकडा पालवाल्यानी परत काढून घेतलं .
दुसरा दिवस उजाडला . दादा शेताकडे गेला.दोन्ही पाली तेथे दिसत नव्हत्या.तेथे फक्त राख होती.दादाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.दादा घरी आला.एक बांगडी घेवून तो सरळ बाऱ्हाळीला आला. सुखदेव सोनाराला विचारलं ” हे खरंखुरं सोनं हाय काय ?” सुखदेव सोनार म्हणाला, “हे कशाचं सोनं न फिनं हाय हे तर सोन्याचं पाणी दिलेलं पितळ हाय गा.” हे ऐकून दादाच्या काळजानं पाणी सोडलं .
आता दादाचं पितळ उघडं पडणार होतं. दादा गरीब माणुस.लबाडी न करणारा. आता तो पुरा फसला होता. दादा सरळ पोलीस पाटील भिक्काजीकडे गेला . भिक्काजीला म्हणाला ,” पाटील आपुण चक्क बुडालो की गा.त्या फाशीपारध्यांनी आपल्याला लई मोठा गच्चका दिलय गा.खोटं सोनं दिलया.ते पळून बी गेल्याती.” हे ऐकून पोलीस पाटील स्वतःचं कपाळ बडवून घेतलं.छाती बडवत म्हणाला ,”आता काय इलाज गा ?लालच का फल बुरा होता है ! ” दादा, पोलीस पाटील यांनी सतत पंधरा दिवस मांजरी,उंद्री,मुखेड,होकर्णा, रातोळी,नायगाव व नरसी असे कित्येक गाव त्यांच्या शोधासाठी पालथी घातली ; पण सोनेरी टोळी मात्र सापडली नाही.
आता मात्र दादा कोणाच्या अधात मधात पडत नाही.म्हणतो ,”नाही रे बाबा एकदा घडलय ….”
राठोड मोतीराम रूपसिंग .
विष्णुपूरी, नांदेड -६
९९२२६५२४०७ .