वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. रुग्णांचा आकडा हा तब्बल ३६,९१,१६७ वर पोहोचला आहे. कालच्या २४ तासांत कोरोनाचे ६९, ९२१ नवे रुग्ण आढळले असून ८१९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ६५, २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा वेगही समोर आला आहे. कोरोनाची लक्षणं जाणवत नसतानाही अनेकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे. वेळीच कोरोनाचा धोका लक्षात न आल्यामुळे तसेच वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र आता मुंबई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे हे शहर देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वात जास्त असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीमध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे १७, ४, ७४७ रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत तब्बल १७,५,१०५ कोरोनाग्रस्त आढळून आल्याची माहिती मिळत आहे.कोरोना व्हायरसमुळे पुण्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये आतापर्यंत ४०६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ११,८,३२४ लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, मास्क, होम आयसोलेशन यासारखे उपाय केले जात आहेत.
देशातील विविध रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी ही सातत्याने समोर येत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या उसळण घेत असतानाच कोरोना काळात देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत भारतातील अर्थव्यवस्थेचे अभ्यासक भीती व्यक्त करीत आहेत. याचे पडसाद जेव्हा ठळकपणे जाणवू लागतील तेव्हा सर्वत्र ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम पहावयास मिळतील. तेव्हा शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह मध्यमवर्गीयांना याचा त्रास होईल. कोरोना महामारीच्या काळात भारताचीच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील अहवाल अत्यंत चिंताजनक आहे. जीडीपीमध्ये ४० वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात २०१९-२० च्या तिमाहीत २३.९ % ची अभूतपूर्व घसरण झाली आहे. सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन जारी केला. याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या सर्वच स्तरांवर झाला आहे. निर्मिती क्षेत्रात सकल मूल्य वर्धनात (जीव्हीए) २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत 39.3 टक्क्यांची घसरण झाली.
यंदाच्या पहिल्या तिमाहीत एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) २३.९ टक्क्यांची घट येण्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. अर्थविश्लेषकांनी वर्तविलेल्या भाकितापेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची अधोगती मोठी आहे. जीडीपीमध्येच एवढी घसरण झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारचे करसंकलनच मोठ्या प्रमाणात कमी होईल. जीएसटी संकलन कमी होईल. केंद्र-राज्य सरकारचे उत्पन्न कमी झाल्याने मंदीसदृश स्थिती येण्याचा धोका दिसतो आहे. बेरोजगारी आणखी वाढणे, वेतन कपात असे फटके सर्व क्षेत्रात बसू लागतील. सरकारी करांमध्ये वाढ होऊ शकते. सरकारकडे पैसेच नसल्याने नोटा छापून घेण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. चलन विस्तार झाला की भाववाढ होते, हा अर्थशास्त्रातला नियम आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्यांची क्रयशक्ती कमी होईल. मोठी घसरण होईल. सद्यस्थितीत बँकिंग क्षेत्र ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. ठेवींवर व्याजदर जास्त मिळणार नाही. कर्जे देताना बँकांना कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. नजीकच्या भविष्यात काही बँका अडचणीत आल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. यातून बाहेर पडायला खूप वेळ लागू शकतो त्यामुळे शेअर बाजारात घसरण चालूच राहील. या सगळ्या परिस्थितीत चीनशी खटका उडाला तर कोणत्याही क्षणी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळेल.
गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा प्रश्न उफाळून आला आहे. मागील काही दिवसांपासून तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशात चर्चा सुरू असतानाच चिनी सैन्यानं पॅगाँग सरोवर परिसरात आगळीक करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनकडून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा झालेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. त्यानंतर सीमेवरील तणाव वाढला असून, दोन्ही देशांचे रणगाडे आमनेसामने आले आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न वाढत आहेत. मंगळवारी ड्रॅगनने चुमारमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैनिकांना पाहून चिनी सैनिक तेथून पळून गेले. चिनी सैन्याच्या जवळपास ७ ते ८ वाहने चप्पूजी छावणी येथून भारतीय हद्दीच्या दिशेने येत होती. घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सुरक्षा दलानेही वाहने तैनात केली. चिनी सैनिकांची कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैनिक हाय अलर्टवर आहेत. यापूर्वी सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत प्रवेश करत होते, परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळीही भारतीय सैनिकांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा नव्या ठिकाणी वाद सुरू झाला आहे. जिथे पूर्वी वाद होता त्या जागेवरुन आता हा वाद पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस सुरु झाला आहे. भारतीय लष्कराला सीमेवरील चीनच्या कृत्यांविषयी आधीच माहिती होती. भारतीय सैन्याच्या स्पेशल ऑपरेशन्स युनिट, शीख लाईट इन्फंट्रीने २९-३० ऑगस्ट रोजी रात्री चीनचा डाव उधळून लावला. गेल्या एका आठवड्यापासून भारताने सीमेवर अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र तैनात केले आहे, ज्याने चिनी प्रदेशावर लक्ष्य केले जाऊ शकते.
लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या पर्वतांवर भारतील लष्कराने पाय रोवले आहेत. त्यामुळे या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात भारताने अतिरिक्त जवानांना तैनात केले आहे. पँगौंग सरोवरात स्वहद्दीत चिनी सैनिकांनी तळ ठोकला आहे. पूर्वस्थितीनुसार आपल्या क्षेत्रात नियंत्रणरेषेच्या कक्षेत थांबण्याची भारताची मागणी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारताने हीच मागणी कायम ठेवली. चीननेही वेळोवेळी त्यास सहमती दर्शवली. राजनैतिक, लष्कर, परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत मागे हटण्याची तयारी दाखवली. संपूर्णपणे स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय चर्चा निष्फळ ठरेल, असे भारताने वारंवार बजावले. २९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते ३० ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी बांधकाम आरंभले. साधारण ५०० सैनिक होते, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जवानांनी त्यास विरोध केला. शक्तिप्रदर्शन केले. शारीरिक इजा दोन्ही बाजूंनी कुणासही झाली नाही. जवानांनी मानवी भिंत तयार केली व युद्धस्थितीतील कवायती केल्याचा दावा सूत्रांनी केला. ड्रॅगनच्या कावेबाजपणाचा अंदाज असल्याने जवान सज्ज होते. त्यामुळे चिनी सैनिकांना मागे हटावे लागले.
१५जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने गेल्या दोन महिन्यांमध्ये ड्रॅगनची दुखरी नस दाबली आहे. चिनी मालावर अप्रत्यक्ष बहिष्कार, शेजारील राष्ट्रांशी व्यापारविषयक करारावर निर्बंध लावताना भारताने चीनला वेळोवेळी समज दिली. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख, भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनला वेगवेगळ्या शब्दांत भारताचे पुढील मनसुबे सांगितले आहेत तरीही चीनने आतापर्यंत वेळकाढूपणा कायम ठेवला आहे. चीनचे सैन्य नियंत्रण रेषेवर भारताच्या आतच असते. ते माघारी घेण्याची नौटंकी सुरू असते. कोरोनावर आपण येत्या काळात मात करुच, अर्थव्यवस्थेत सुधारणाही होईल परंतु ह्या चिन्यांना कायमचा धडा शिकवावाच लागेल.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय \ ०२.०८.२०२०