डोळा हा मनुष्याचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे, त्यामुळे तो जग होऊ शकतो ,आनंद घेऊ शकतो, निसर्गाचे सौंदर्य निरखू शकतो, याच डोळ्याला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्याविषयी थोडी माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच……..
आपणांस पाच ज्ञानेन्द्रिय आहेत.
त्यात डोळा हा महत्त्वाचा अवयव आहे,*डोळा लागणे* बोलता बोलता आपण डोळा लागला असे म्हणतो, *डोळा चुकवणे* एखाद्याने आपल्या समोरून डोळा चुकून निघून गेला त्याचा थांगपत्ता लागला नाही *डोळे येणे* डोळ्यात केर कचरा, धूळ, धूर गेल्यानंतर तो खराब होतो त्यामुळे डोळे येतात. असे आपण म्हणतो *डोळे जाणे* एखादा व्यक्ती कोणतेही कार्य करताना डोळ्याला जखम झाली तर डोळे कायमचेच बंद होतात *डोळे उघडणे* खरे काय ? खोटे काय? हे कळाल्यानंतर आपले एकाकी डोळे खाडकन उघडतात. आणि सत्य बाहेर येते *डोळे मिटणे* डोळे मिटणे म्हणजेच एखादी आजी आपल्या नातवाला म्हणते, मी आता कायमचेच डोळे मिटते म्हणजे तुझे समाधान होईल याचा अर्थ मृत्यू येणे *डोळे खिळणे*, डोळे एखाद्या वस्तूवर खिळून एकटक पाहत बसणे. एखाद्या गोष्टीविषयी आकर्षण वाटणे *डोळे फिरणे* एखाद्याची अफाट संपत्ती पाहून मनुष्याचे डोळे फिरतात आणि मनात वाईट विचार सुरू होतात, *डोळे दिपणे* एखाद्याचे सौंदर्य पाहून आपोआप डोळे दिपतात, सोने -नाणे पाहून सुद्धा डोळे दिपतात *डोळे वटारणे* घरात पाव्हुणे आले की छोट्या मुलावर घरातील मोठी माणसे डोळे वटारून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. *डोळे विस्फरणे* एकाकी एखादी गोष्ट दिसली की डोळे विस्फारून पाहिले जाते *डोळे पांढरे होणे* एखाद्या ठिकाणी अचानक साप दिसला की डोळे पांढरे होतात *डोळे भरून येणे* एखादी नवरी नवऱ्याच्या घरी सासरी चालली की गावातील सर्व महिलांचे डोळे भरून येतात. एखाद्या मुलाचे आई-वडील मरण पावले की लोकांचे डोळे आपोआप भरून येतात. *डोळे फाडून पाहणे* एखाद्याने चूक केली की मनुष्य त्याच्याकडे डोळे फाडून पाहतो त्यामुळे पुढील व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते. *डोळे भरून पाहणे* एखादी व्यक्ती चांगल्या गोष्टीकडे डोळे भरून पाहते. बालक रांगत आहे तेव्हा त्याची आई डोळे भरून त्याच्याकडे पाहते *डोळे लावून बसणे* पावसाळा सुरू झाला की शेतकरी पेरणी करतो नंतर पाऊस आला नाही की तो आकाशाकडे डोळे लावून बसतो *डोळे झाकणे* स्वतःच्या मुलांनी चूक केली तरीही त्याचे आई वडील त्या गोष्टीकडे डोळे झाक करतात. *डोळ्यात प्राण आणणे* आई-वडिलांपासून दूर गेलेला मुलगा परत कधी येईल म्हणून आई-वडील आतुरतेने त्याची वाट डोळ्यात प्राण आणून पाहत असतात, *डोळ्यात धुळ फेकणे* म्हणजे बोलता बोलता आपली फसवणूक करणे होय.*डोळ्यात तेल घालून बघणे* लक्षपूर्वक डोळ्यात पाहणे सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देतात. *डोळ्यात डोळे घालून पाहणे* एकमेकांकडे अतिशय प्रेमाने पाहणे विवाह झालेले नवीन जोडपे दिवस रात्र एकमेकाकडे डोळ्यात डोळे घालून पाहतात. *डोळ्यात सलणे,* दुसऱ्याचे चांगले वैभव पाहून वाईट वाटणे यालाच डोळ्यात सलणे असे म्हणतात *डोळ्यात अंजन घालणे* दुसऱ्याच्या चुका सांगणे.परखडपणे बोलणे *डोळ्यावर कातडी ओढणे* जवळच्या व्यक्तीने कितीही मोठा गुन्हा केला तरी डोळ्यावर कातडी ओढून गप्प बसणे *डोळ्याला डोळा लागणे* शेजारीच्या घरी रात्री वाईट घटना घडल्यामुळे तेथे रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही असे आपण म्हणतो *डोळ्याला डोळा भिडवणे**मुद्दामहून उमर्टपणे वागणे माघार न घेणे. नजरेतून आपला राग पुढील व्यक्तीला दाखवणे. *दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसणे व आपल्या डोळ्यातील मुसळ न दिसणे*. दुसऱ्याने केलेल्या छोट्या चुका आपणास दिसतात परंतु आपण केलेली मोठी चूक आपणास दिसत नाही. तसेच *डोळा मारणे* हा एक वाक्प्रचार आहे याचा अर्थ दोन प्रकारे घेतला जातो. पहिला इशारा करणे असा होतो तर दुसरा अर्थ अश्लील चाळ्याकडे घेऊन जातो म्हणून डोळ्यांनी चांगले पहावे. दृष्टी चांगली असावी.तेव्हा सृष्टी चांगली दिसते नाहीतर तेथे डोळे काढून हातात देण्याची भाषा ऐकून घ्यावी लागते त्यापासून दूर राहावे एवढीच अपेक्षा.
*शब्दाकंन*
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी ता.मुखेड जि. नांदेड