चार दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ६० च्या वयोगटातील एका स्त्रीशी ओळख झाली.. त्या बोलता बोलता म्हणाल्या , ताई तुम्ही लेखिका आहात ना , मग विधवेवर कधी लिहीलय काहो ??..
खरं तर मलाही आठवत नव्हतं..खुप वेगवेगळे विषय हाताळत असल्याने हा विषय बाजूलाच राहिला.. मी म्हटलं , काय झालं??
त्या म्हणाल्या , माझा नवरा दारु पिउन गेला आणि त्याला १२ वर्षे झाली पण सोसायटीमधे माझ्याकडुन वर्गणी घेतलेली चालते पण मला पुजेला बसु देत नाहीत हे असं का ??
खरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही.. केशवपन करणं , सतीची जाणं या प्रथा बंद झाल्या पण ते स्त्रीलाच का भोगावं लागायचं??.. एखाद्या पुरुषाची बायको गेली तर त्याला असं वेगळं बाजूला केलं जात नाही , तो पुन्हा लग्नही करु शकतो .. शहरात आता हा विधवा मुद्दा तितकासा मागे राहिला नाही पण खेड्यात आजही अशा स्त्रीयांना कुठेच स्थान नाही.. हळदीकुंकु सुध्दा त्यांना वगळुन केलं जातं.. खरं तर कुंकु आपण लहानपणापासूनच लावतो मग तरीही हा भेदभाव का ??
मला वाटतं विचारसरणी आणि शिक्षणाचा अभाव .. डीग्री आहेत पण विचारांची दिशा नाही.. उच्चशिक्षीत आहोत पण उच्चविचारी नाही.. जात धर्म , याचा पगडा घेउन वावरताना माणुसकीच विसरलो आहोत.. विधवा स्त्रीलासुध्दा भावना असतात.. तिलाही स्पर्श हवा असतो .. तिलाही साथ सोबत हवी असते.. तिलाही मित्रासोबत फिरायचं असतं.. सधवा आणि विधवा यात फरक काहीच नाही.. फरक असेल तर तोआपल्या संकुचित वृत्तीचा..दुसऱ्याला कमी लेखताना किवा विधवा म्हणुन हिणवताना हीच वेळ आपल्यावर आली तर?? हाच विचार करुन वागलं तर तिलाही भावना आहेत हे आपल्या लक्षात येइल..
शहरात विधवाना बोलवुन हळदीकुंकु केलं जातं पण फक्त हळदीकुंकु हीच त्यांची गरज नाही.. त्यांच्या गरजा या शारीरिकही असतात..अन्न , वस्त्र , निवारा , प्रेम ,सेक्स याची गरज प्रत्येकाला आहे याचाही विचार आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी करायला हवा.. तुमच्या घरात किवा ओळखीत अशी कोणी स्त्री असेल तर तिच्याशी मोकळेपणाने या विषयावर बोला.. तिचा तिला व्यक्ती म्हणुन सर्वस्वी अधिकार मिळायलाच हवा.. तिनेही प्रत्येक सुखाचा आस्वाद घेतला पाहिजे.. लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय वाटतय हा विचार जेव्हा ती करेल त्यावेळी ती सुखी होइल
आपलं सुख आपल्याच हातात असतं म्हणुन मुलीना शिकवा , स्वातंत्र्य द्या.. सक्षम बनवा ..
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री