फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
गतवर्षीचा पिक विमा व या वर्षीच्या अतिवृष्टी चे दुष्काळी अनुदान कधी मिळेल या प्रतीक्षेत बळीराजा असून आता बळीराजाच्या नजरा खरीप हंगामाकडे लागल्या आहेत तर खरिपाच्या पिक पेरणीसाठी शेतीची मशागत करून बळीराजा पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत.
“ऊन, पाऊस, थंडी, वारा या कशाची भीती न आम्हा !
काळी आई धनधान्याने ओटी भरेल हीच अपेक्षा आम्हा !”
असा काळ्या आईवर विश्वास ठेवून तिच्या उदरी शुद्ध बीजांची पेरणी करणाऱ्या बळीराजाच्या पाचवीलाच कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ पुजलेला आहे. गत काही वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटांनी थैमान घातले असून पूर्णतः खरीप हंगाम असो का रब्बी हा निसर्गाच्या हुलकवण्यांनी हिरावून घेतल्याचे बळीराजासह प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही उघड्या डोळ्यांनी पाहिलेच आहे.
दरवर्षी उधारी – उसनवारी करून हजारो रुपये मातीत टाकणाऱ्या बळीराजाला आजपर्यंत अनेक संकटांचा सामाना करणेच नशिबी आले आहे. गतवर्षीचा पिक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर आलाच नाही वरून अतिवृष्टी चे दुष्काळी अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे कुटुंब आज घडीला आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र असतांनाच मृग नक्षत्र सुरुवात होऊन आठवडा उलटला तरीपण पेरणीयोग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजा च्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागल्या असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना शेती कसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून आलेल्या नैसर्गिक संकटांना तोंड देत आर्थिक संकटांनाही न घाबरता आपल्या काळ्या आईवर ठाम विश्वास ठेवून दरवेळी जीव दावणीला लावणाऱ्या शेतकऱ्यांना शेती कसणे , पेरणी करणे भागच असते. कधी अतिवृष्टीने तर कधी कोरड्या दुष्काळाने एका हंगामाचे पीक हिरावून घेतले तरी दुसऱ्या हंगामात तरी शेती साथ देईल ! या अपेक्षेने बळीराजाची भिस्त दरवेळी पुढच्या हंगामावर अवलंबून असते. अशीच परिस्थिती पाहता आता या खरीप हंगामासाठी बळीराजाला शेतीच्या मशागती पूर्ण करून पेरणी ची ओढ लागल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांचे सरकार म्हणून मिरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोणी तरी सांगा हो की आमचा गेले वर्षीचा पीकविमा आणि अतिवृष्टी दुष्काळ च्या रक्कमा अद्याप आम्हाला मिळाल्या नाहीत त्यासाठी संबंधित कंपनी व विभागांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कोणीतरी आवाज उठवेल का..? असा टाहो शेतकऱ्यांतुन ऐकायला मिळत आहे.