पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. वारकरी मुखाने विठ्ठल नामाचा गजर करीत आणि मनात पांडुरंगाचे स्मरण करीत पायी दिंडीत सामील होतात. सर्व काही विसरून ते चालत असतात. महाराष्ट्रातील अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने आपला देश सोडून परदेशात गेलेले आहेत तरी त्यांना पंढरीच्या वारीचे कौतुक वाटते. दररोज ते वारीची माहिती घेत असतात ते शरीराने प्रदेशात असले तरी मनाने दिंडीत सामील झाल्याचा त्यांना आनंद होतो *घार हिंडे आकाशी। चित्त तिचे पिल्लापाशी* तसेच हुबेहूब प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीचे होते असे म्हटले तर वावगे होणार नाही. साता समुद्राच्या पलीकडे वारीची महती आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच…..
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी श्री क्षेत्र आळंदीहुन तर जगद्गुरु तुकोबारायांची पालखी देहू येथून पंढरपूर कडे प्रस्थान करतात, सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त आपल्या आनंदा साठी विठुरायाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजन करतात. आपल्या मनातील सर्व दु:ख विसरून विठ्ठला कडे जाण्यासाठी पायी दिंडीचा अवलंब करतात. वारी म्हणजे परमार्थाचे सरळ सोपे सहज शिक्षण देणारी शाळा होय. प्रसिद्ध गायक भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग माझ्या लक्षात येतो. *विठू नामाचा गजर । गर्जे भीमा तीर।। * या अभंगामुळे मनाला मनस्वी आनंद होतो. वारकरी हा वर्षानुवर्ष वारी करीत विठ्ठलाला भेटण्यासाठी जातो. ऊन, वारा, पाऊस ,वादळ याची तमा न करता वारकरी दररोज विठ्ठलाच्या ओढीने माऊली माऊली म्हणत, एक एक पाऊल पुढे टाकत असतो. त्याच्या मनात फक्त विठू माऊली विषयी भाव असतो. त्याला घराची चिंता नाही. त्याच्यासमोर कोणी लहान मोठा नाही. *या रे या रे लहानथोर*। असे म्हणून सर्वांना तो एकत्रित करतो.
तो कसलाही भेदभाव करत नाही. *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ * ।। या नीतीने चालतो. वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत ते एकमेकांना माऊली* या नावाने हाक मारतात, त्यामध्ये फार गोडवा आहे. दररोज नवीन गाव, नवीन व्यक्ती, भेटतात राहण्याची जेवणाची सर्व दिंड्यांची सोय केली जाते. प्रत्येक दिंडीला विशेष नाव आहे. क्रमांक आहे. त्यानुसार दिंड्या एका पाठोपाठ पंढरपूर कडे जात असतात.
या दिंड्या दिव्य घाटात आल्यानंतर खरोखरच मनाला आनंद देतात डोळ्यांना ही हिरवळ व मनाला हा घाट प्रसन्न करून सोडतो .माऊलीच्या रथाला ओढण्यासाठी बैल जास्त जोडले जातात आणि प्रत्येक माणूस पालखीला हात लावूनच पुढे सरकत असतो. हा भव्य दिव्य देखावा या पृथ्वीतलावर फक्त महाराष्ट्रातच आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. वारीमध्ये अनेक दानशूर लोक वेगवेगळ्या पदार्थांचे वाटप करतात, कपड्यांचे वाटप करतात, पाणी पाऊस ,वादळ यापासून सुरक्षित राहण्यासाठी वारकऱ्यांना बरेच जण छत्री तसेच रेनकोट देऊन दान केल्याचे मनाला समाधान मानून घेतात, ही वारी अशी चालत राहते. त्यामुळे सर्व धर्मीयांना पांडुरंग हा आपलाच वाटतो म्हणून वारीचे महत्व कमी न होता दिवसेंदिवस ते वाढत आहे ह्या वारीमुळे मनुष्यात एकात्मतेची बीज रुजतात हा आपला आहे याची जाणीव होते. अनेक जण वारीत मिसळून आपले दुःख विसरतात आई -वडिलांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन वारकरी पंढरीत दाखल होतो. पंढरीत गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करतो आणि आत्मिक शांती मिळवितो ,पंढरीला पोहोचल्याचे सुख त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहते, *अवघे गरजे पंढरपुर । चालला नामाचा गजर म्हणत तो सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये मिसळून जातो,आपण सर्वजण एकाच पांडुरंगाची लेकरे आहोत असे त्याला वाटते म्हणूनच *विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळाचा मेळा* असे म्हटले जाते.
वारीही एक मार्गदर्शक वाट आहे, तिथे अनेक गोरगरीब लोक येतात लहान-मोठे येतात ,दिंडीमध्ये एकमेकांना समजून घेतात,
पुरुष आणि महिला एकत्रित राहतात. हरिनामाचा गजर करतात. फुगड्या खेळतात, त्यामुळे सर्वांना सुख मिळते, दुःख विसरून जातात. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे, वारीत कोणीही उपाशी नसते. सर्व व्यक्ती सारखेच असतात.वारीत घोडे, बैल ,मेंढ्या, हरिण, उंट यांनाही स्थान दिले जाते, म्हणून वारीही एकात्मतेचे प्रतिक आहे. असे म्हणता येते, अनेक वाड्या वस्तीवरून खेड्यापाड्यातून लोक एका मनाने चिखल तुडवत पाण्यातून पुरातून काट्यातून पंढरीला येत असतात. *माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नवीन गुढी* असे म्हणतात, तिथे त्यांना कोणाचीही निमंत्रण नसते किंवा कोणी बोलावले नसते. तरीही अंत:करणातील माऊलीच्या प्रेमामुळे हजारो दिंड्या आषाढीच्या वारीला पंढरपूरला पोहोचतात या वारीतून अनेक गोष्टी आपल्याला कळतात. मनुष्य घरापासून दूर राहिल्यानंतर कोण कोणत्या अडी अडचणी येतात ही दिंडीतून कळते. विठ्ठलावर अपार श्रद्धा ठेवून अनेक वारकरी पंढरीची वारी करताना दिसून येतात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणीक न करी तीर्थव्रत। व्रत एकादशी करीन उपवासी।।गाईन अहनिर्शी मुखी नाम। नाम विठोबाचे घेईन मी बाचे। बीज कण्यातीचे तुका म्हणे।।
अशा पद्धतीने रात्रंदिवस विठ्ठलाचा नामघोष करत वारकरी पंढरपूरला पोहोचतात. असे तुकाराम महाराज स्पष्टपणे वरील अभंगातून सांगतात. पंढरपूर हे वारकऱ्यांचे माहेर आहे. माहेरला जाताना त्यांना विठ्ठलाची आस आहे. कधी तू एकदा भेटतो असे त्यांना झाले आहे. टाळ, मृदंग, वीना घेऊन चालत ते पंढरीला जातात. डोक्यावर पांढरे शुभ्र टोपी आहे. अंगात पांढरा शुभ्र सदरा आहे
गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. कपाळाला गोपीचंदन आणि मुखात हरिनामाचा जयघोष आहे. असे वारकरी अनेक ठिकाणाहून पंढरीला पोहोचतात म्हणून पंढरपूर हे अखंड देशाचं आराध्य दैवत असलेला विठोबा आहे ही वारी शेकडो वर्षां पासून चालत चाललेली आहे. वारीच्या निमित्ताने एकमेकांची भेट होते .सर्व माणसे एकत्रित आल्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यातून पंढरीची वारी एकात्मतेचे प्रतीक ठरते ती अशीच चालत राहो ही अपेक्षा.
जय जय राम कृष्ण हरी
शब्दांकन
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, (गोकुळवाडी)
ता. मुखेड जि. नांदेड