येत्या बुधवारी 21 जून 2023 रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात साजरा होत आहे. नागरिकांनी योग, प्राणायाम, आसने करून आपले आरोग्य ठणठणीत ठेवण्याचा संदेश या दिनानिमित्ताने दिला जातो. त्यामुळेच हा लेखन प्रपंच……….
योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे ,युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला, संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशाचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जगभरात दरवर्षी 21 जून हा योग दिन म्हणून अतिशय आनंदाने साजरा केला जातो. 2015 मध्ये दिल्ली येथील राजपथ येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले. तेव्हा 84 देशाचे नागरिक उपस्थित होते त्यावेळी तरुणांना योग करण्याचं मंत्र मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, त्यावेळी त्यात दिव्यांगांचाही समावेश होता. आरोग्यासाठी योगाचा मंत्र दिला. यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन नववा आहे.आपण तो साजरा करत आहोत हा दिन संपूर्ण जगात शाळा, महाविद्यालयात वेगवेगळ्या संस्थेत प्रतिष्ठानाद्वारे साजरा करत आहोत. *योग म्हणजे एकात्मता होय.*
सर्व सजीव सृष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योगा होय.
भारतात योगा प्राचीन काळापासूनच आहे .योगामध्ये विविध योग सूत्राचा वापर केला जातो. नियम,प्रत्याहार ज्ञान,आसन ,भक्ती, ध्यान अशा बाबी त्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. मानवाला आपल्या जीवनात आध्यात्मिक ,मानसिक, शारीरिक स्तरावर योगांनी विकास घडवून आणता येतो. संपूर्ण जगात योगाचा प्रचार झाल्यानंतर भारत आणि जग यांची जीवनपद्धती जवळजवळ सकारात्मक बनते, ती शांततेसाठी आपणाला उपयोगी पडते. योग हा जीवनाच्या सर्व पैलू मध्ये संतुलन ठेवण्या व्यतिरिक्त आरोग्य आणि कल्याणसाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करतो, जीवन सुखी समृद्ध व आनंदी बनविण्यासाठी योग महत्त्वाची भूमिका बजावतो. योग चिकित्सा, प्रणायाम ,योगासन, सूर्यनमस्कार अशा सर्व बाबीची माहिती योगामध्ये होते. 2015 -सुसंवाद आणि शांततेसाठी योग,2016 -शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग, 2017- मध्ये आरोग्यासाठी योग,त्यानंतर 2018- शांततेसाठी योग ,2019- हृदयासाठी योग, 2020 – कौटुंबिक योग ,2021- कल्याणकारी योग, 2022- मानवते साठी योग, आणि यावर्षी 2023 वसुधैव कुटुंबकम योग साजरा केले जात आहेत
भारतात पतंजली मुनीच्या काळापासून योग चालू आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंदानी जगभर योगाचा प्रचार व प्रसार केला त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा तसेच श्री रविशंकर यांनी सुद्धा योगाचे प्रचार व प्रसार केलेला आहे.आपण ही करत आहोत.अशा पद्धतीने योग केलेले आहेत. सर्वांना उत्तम आरोग्य हवे तर योग करण्या शिवाय पर्याय नाही हे आपणास आता समजत आहे. *योग का करावा*? आपण जे अन्न खातो त्याचे पचन व्हावे हात, पाय ,पोट ,मान ,पाठ याचे स्नायू बळकट व्हावेत तसेच हृदयविकारा पासून व इतर रोगापासून मुक्ती मिळावी यासाठी दररोज योग करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी न चुकता योग करावा. योगाने शरीर निरोगी व बळकट बनते. तसेच उत्तम मानसिक आरोग्य लाभते .वजन नियंत्रणात राहते. कोणत्याही गोष्टीचा संयम आपोआप येतो .
अनेक रोगांना लढण्याची क्षमता शरीरात योगामुळे निर्माण होते. तसेच आज उत्तर गोलार्धात भौगोलिक दृष्ट्या 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो .21 जूनपासून सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते हा एक नैसर्गिक बदल आहे. तेव्हापासून उष्णता कमी होते व वातावरणात फरक जाणवतो. 21 जूनला योग दिन तसेच सर्वात मोठा दिन असा योगायोग आहे. योगाच्या प्रचंड लोकप्रियते पुढे जगभरातील विविध भागात योग केंद्रे आणि स्टुडिओची स्थापना झाली आहे सर्वांनीच दररोज योगा करून आपले जीवन आरोग्यदायी ठेवावे,
*शब्दांकन*
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी ता.मुखेड जि.नांदेड