पाऊले चालती पंढरीची वाट…

 

दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी आकाश कोंदुन टाकणारा टाळ मृदंगाचा नाद, मनात भक्तीभाव गोंदुन जाणारा ग्यानबा-तुकारामांचा गजर कानामनाला जाणवत आहे…
हजारो वर्षापासून तनमनात भिनलेलं विठ्ठल प्रेम कधी डिजिटल, कधी व्हर्च्युअल तर कधी आत्मिक पातळीवर व्यक्त होत जातं…
अशी ही वारी आपल्याला काळवेळाच्या बंधना पल्याड जातं असते.
युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्यदैवत आहे. आषाढी-कार्तिकीची वारी हा मराठीजनांचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि नियंत्रणाशिवाय वारीचा सोहळा साजरा होतो. साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी –
‘माझे जीवीची आवढी। पंढरपूरा नेईन गुढी’
असा निर्धार केला होता.
माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या उत्साहानं लक्षावधी वारकरी पूर्ण करत असतात. जेव्हा सर्वत्र
‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ’ हे प्रल्हाद शिंदे यांच्या खणखणीत आवाजातील गाणं लाऊडस्पीकरवर लागायचं. पंढरपूरला आषाढी-कार्तिकीच्या वारीसाठी जाणा-या सर्वसामान्य माणसांची मनोभावना काय असते हे दर्शवणा-या त्या गाण्याचा लहानपणी अर्थ कळत नव्हता; परंतु सरळ साध्या शब्दांची गेयता ओठावर बसली, अगदी कायमची! समज आल्यानंतर त्या गाण्याचा अर्थही समजला.
‘गांजुनिया भारी, दु:ख दारिद्रय़ाने, पडता रिकामे, भाकरीचे ताट.. पाऊले चालती पंढरीची वाट’,
गेली अनेक दशकं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणा-या या गीताच्या शेवटच्या कडव्यामध्ये ‘घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट’ ही भाबडी अपेक्षा मनाला चटका लावून जाते..
पंढरीच्या वारीत अशी दु:खं दारिद्रय़ानं गांजलेली, संसारतापानं पोळलेली लक्षावधी जनता, सकाळी तांबडं फुटल्यापासून सूर्य मावळेपर्यंत चालत असते. पण वारीचं वैशिष्ट्य असं की, खेडय़ा-पाडय़ातून केवळ विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारक-यांच्या जगण्यात वेगळंच चैतन्य फुललेलं असतं. एरवी शेती आणि शेतीवर आधारित कामधंद्यात गुंतलेल्या बाया-माणसांना वारीच्या वाटेवर ‘माऊली’चं मानाचं स्थान मिळतं.
ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत चालणा-या पाच वर्षाच्या चिमुरड्या मुलीला वा ऐंशीच्या आजोबांना ‘माऊली’ या एकाच नावानं संबोधलं जातं. तसं वागवलं जातं. हा आजही घडणारा, डोळ्यांनी दिसणारा सामान्याला असामान्यत्व देणारा ‘चमत्कार’ फक्त आणि फक्त वारीतच पाहायला मिळतो. अशा या आनंददायी वारीच्या परंपरेनं महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ तेराव्या शतकातच रोवली. संन्याशाची पोरं म्हणून बहिष्कृत जीवन अनुभवलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई या चार अलौकिक व्यक्तिमत्त्वांनी सोवळ्याओवळ्यात गुरफटलेल्या मऱ्हाटमोळ्या समाजात जणू ‘आध्यात्मिक लोकशाही’चा पाया घातला! गीतेचा अर्थ मराठीत सांगून ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या कचाट्यात सापडलेलं धर्मज्ञान रसाळ आणि सोप्या शब्दांत लोकांपुढे नेलं. एका अर्थानं प्राकृत असलेली म-हाटी मनं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीनं सुसंस्कृत झाली. ज्ञानदेवांनी ज्ञानाची तर नामदेवांनी नामाची साधना अगदी सहजपणे लोकांसमोर ठेवली. त्यात व्रतवैकल्य, कर्मकांड आणि रूढाचाराचं स्तोम नव्हतं. मुख्य म्हणजे भक्तीच्या बळावर चोखा मेळा, सजन कसाई, गोरा कुंभार, नरहरी सोनार, कान्होपात्रा, जनाबाई या तत्कालिन कर्मठ वातावरणात अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणा-यांनाही संतपद मिळू शकतं, हे वारकरी संप्रदायानं सिद्ध केलं.
दिंडीत चालणार्या वारक-यांच्या जगण्या-वागण्यात जी सहजसुलभता असते, त्यामागे संतांच्या या साऱ्या प्रेरणा अभंगातुन येतात.
पहाटेपासून सुरू होणारी काकड आरतीची आळवणी ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा’ या शब्दांतून गारव्यानं आळसलेल्या आसमंतावर बरसते, तेव्हा दिंडीतील लहान-थोरांची लगबग बघण्यासारखी असते. पंढरीच्या वारीत गेल्याशिवाय वारकऱ्यांची ही लोकविलक्षण भक्ती आणि शक्ती आपल्याला कळत नाही. पंढरपूरच्या वाटेवर दिंडीत दररोज होणा-या भजनांमध्ये संत तुकारामांच्या अभंगांची संख्या जास्त असते.
मनाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे हे अभंग मोठे मार्मिक.
तुकोबांचे मानवी व्यवहार निरीक्षण अचूक आहे. सुंदर प्रपंच आणि उत्कट परमार्थ या दोन्हींचं एकवट दर्शन घ्या. परमार्थात प्रगती करण्यासाठी कोणत्याही अघोरी मार्गाचा अवलंब करायची गरज नाही. म्हणूनच असेल कदाचित, वारक-यांच्या नित्यपाठात तुकोबांचे अभंग जास्त प्रमाणात असतील.’’
वयाच्या साठीतही नवं शिकण्याचा अमाप उत्साह वारकर्यांमध्ये असतो. 30 वर्षांहून अधिक काळ त्या दिंडीत चालणार वारकरी पुन्हा नव्याने सहभागी होतो. उत्सुकता आणि त्यानंतर पांडुरंग भेटीची आतुरता, हेच या दिंडीप्रेमामागील खरं कारण आहे.
आकाशाच्या सावळ्या विठ्ठलाची अथांग माया डोळ्यात साठवत वारकरी चालू लागलो… अचानक आभाळ भरून यावं आणि डोळ्यातील जलबिंदूच्या आनंदाश्रूंमध्ये न्हाऊन निघावं.
एकेक पाय सावकाश उचलत, सबंध शरीराचा भार काठीवर टाकत ऐंशीच्या घरातील आजोबा चालू लागतो अन् ओठांवर ‘रामकृष्ण हरी’चा जप आणि डोळ्यांमध्ये पांडुरंगाचे रूप साठवत त्यांचे थकलेले शरीर उत्साहानं पंढरीच्या वाटेनं निघालेलं असतं ना तेव्हा कुठं कळतं भक्तीचा नाद काय असतो.
लक्षावधी वारक-यांचा जनसागर अचानक भरती आल्यानंतर सागराच्या लाटा जशा किनाऱ्याकडे धावतात, त्या गतीनं पंढरीच्या दिशेनं झेपावू लागतो. हातात वीणा घेतलेले वीणेकरी, डोईवर तुळशीवृंदावन, हंडे, कळशा घेतलेल्या आया-बाया, वजनी मृदंग-पखवाज खांद्यावर असलेले मृदंगमणी, टाळकरी, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले, झेंडेवाले, भिन्न वयोगटातील अबालवृद्ध ‘माऊली, माऊली’ म्हणत पंढरपुरात बसलेल्या विठू माऊलीच्या दिशेनं धावतात. कुणी पायात पाय अडकून पडतात, पुन्हा ‘माऊली’चा जयघोष करत धावू लागतात. दीडेकशे किलोमीटर चालून पाय थकलेले असतात; पण पंढरपूर जवळ आलं, ही बातमी तन-मनात जोष फुलवते. कारण पंढरीच्या ओढीनं प्रत्येक वारक-याच्या डोळ्यासमोर विठाई, कृष्णाई, कान्हाई नाचत असते.
विठ्ठल आणि वारकरी यांच्यातील नातं माय-लेकरासारखं आहे. बाहेरून दुडूदुडू धावत येणा-या बालकांना भेटण्यासाठी, हृदयाशी धरण्यासाठी आई आपले दोन्ही हात उभारून घराच्या उंबऱ्याशी उभी असते.
अगदी तसंच त्यामुळे आपली ही लेकरं कधी पंढरपुरात येतात आणि आपण त्यांना कधी उराशी कवटाळतो, असं विठ्ठलाला देखील वाटत असेल.
वारक-यांना जेवढी पांडुरंगाला भेटण्याची आस लागलेली असते, तेवढीच किंवा काकणभर जास्त ओढ विठ्ठलाला भक्तांच्या भेटीची असते.भक्तांमधील अनुपमेय, अवर्णनीय आणि निरपेक्ष एकरूपता आपल्याला वारीच्या वाटेवर पदोपदी पाहायला मिळते.
शरीराला हरवून मनात उत्साह जागवणारा वारकर्यांच निर्धार मन कधीच विसरू शकणार नाही. कारण वारी म्हणजे जीवन आनंदानं जगण्याचा मोक्षमार्ग, भक्ती चा अखंड उत्सव..
तो उत्सव अजूनही संपूर्ण महाराष्ट्राला कळलेला नाही, कारण ‘ज्ञानबा-तुकाराम’चं कुणी ‘ब्रॅण्डिंग ’ केलेलं नाही. खरं सांगायचं तर तसं करायची गरजही नाही. त्यासाठी पंढरीच्या वारीला चला, आणि पंढरीची वारी काय ते साक्षात अनुभवा…

रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *