नांदेड – वाढदिवस साजरा करण्याचे सद्या सर्वत्र स्तोम माजले आहे. येथील वाघमारे परिवाराने खर्चाला फाटा देत एक आदर्श वाढदिवस करण्याचा वस्तूपाठच घालून दिला. शहरातील नमस्कार चौक परिसरात असलेल्या रामनगरस्थित सुमन अनाथ मुलींचे बालगृह येथे ‘मैत्रा’ या चिमुकलीच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून उपस्थित सर्व मुलींना सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने पुढाकार घेत फलदान करीत वाढदिवस साजरा केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, कवी थोरात बंधू, कवी प्रकाश ढवळे नागलगांवकर, सुनंदा वाघमारे, सुप्रिया वाघमारे, अधिक्षक प्रिती दिनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरात तसेच जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जातात. आषाढी एकादशी आणि ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्या मैत्रा या नातीचा चौथ्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून मूळगाव तरोडा बु. येथील पंचशील बुद्ध विहारात बौद्ध उपासक, उपासिका आणि बालक, बालिकांच्या उपस्थितीत तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप, पुष्पपुजन, त्रिसरण पंचशील ग्रहण तसेच बालक बालिकांना ‘एक वही – एक पेन’ वाटप असे कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर राम नगर येथील मुलींच्या अनाथालयात केळी, डाळींब, सफरचंद आदी फळांचे वाटप करण्यात आले.
तिसऱ्या सत्रात पोलिस मुख्यालयानजीक असलेल्या देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात अभिष्टचिंतन कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर पालीनगर येथील संबोधी बुद्ध विहारात बुद्ध वंदनेचा कार्यक्रम आणि खीरदान कार्यक्रम संपन्न झाला. तसेच बालक बालिकांना मिठाई वाटप करण्यात आली. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञाधर ढवळे, बाबुराव थोरात, अनुरत्न वाघमारे, प्रकाश ढवळे, सुनंदा वाघमारे, विशालराज वाघमारे, सुभाष लोखंडे, शिल्पा लोखंडे, भगवान सावंत यांच्यासह तरोडा बु. आणि पालीनगर येथील बौद्ध उपासक उपासिका, सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.