नेट प्रॉब्लेम असल्यामुळे अमरनाथच्या गुहेतून हा लेख वेळेवर आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्याबद्दल क्षमस्व. एक दिवस गॅप पडला अनेक वाचकांचे मला फोन आले व त्यांनी लेख न मिळाल्यामुळे काळजी व्यक्त केली त्या बद्दल धन्यवाद. इतक्या व्यस्त कालावधीत देखील वाचक आवर्जून अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचत आहेत.हे याचेच द्वेतक आहे की लेख आपणाला आवडत आहे.
मोठया बसेस दिवसा श्रीनगर शहरात येऊ देत नसल्यामुळे आमच्या दोन्ही बस रात्रीच हॉटेल स्नो पॅलेस इथे थांबल्या होत्या. मी पहिल्यापासून एक सिस्टीम ठेवली होती. अनुभवावरून असे लक्षात आले होते की, बसमधील प्रवासात कुरबुर,भांडणे होतात ती फक्त मागेपुढे बसण्यासाठी.त्यामुळे आमच्या प्रत्येक टूरमध्ये बसचे सीट नंबर बदलत असतात.
आज पुढे बसलेली व्यक्तीला उद्या मागे तर परवा मध्ये बसावे लागते. दररोजच्या सीट नंबर चा चार्ट व्हाट्सअप ग्रुप मध्ये आणि बस मध्ये लावलेला असल्यामुळे सर्वांचे समाधान होते.
पर्यटन करताना प्रवाशांनी आपण कुठे जात आहोत त्याबद्दलची सविस्तर माहिती घ्यायला हवी. बहुतांश प्रवासी जाताना या सर्व बाबींची काळजी घेतातच. गुगल सर्च मुळे आज-काल एका मिनिटात तुम्हाला त्या सर्व ठिकाणची माहिती, केव्हा जावे? कधी जावे? तेथील वातावरण पर्यावरण कसे आहे? याबद्दल माहिती मिळतेच. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठिकाणी जाताना व्यक्तीने या सर्व स्थळांची व्यवस्थित माहिती करून घ्यावी. शिल्पकला, किल्ले, art gallery, या ठिकाणी भेट देताना त्याची व्यवस्थित माहिती करून घेतली तर आपला त्या संबंधाचा एक दृष्टिकोन बनत जातो. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेली ‘हेरिटेज’ श्रेणीतील सर्व स्थळे ही आपला राष्ट्रीय वारसा आहे त्याबद्दल नीट समजून घेतले पाहिजे.
आमच्या अमरनाथ यात्रेतील ज्या प्रेक्षणीय / पर्यटन स्थळांना भेटी दिल्या त्यांची थोडक्यात माहिती देतो.
*चष्मेशाही किंवा चष्मा- ई- शाही गार्डन* मुघल सम्राट शाहजहांचा गव्हर्नर मर्दान खान याने सम्राटाच्या आदेशामुळे सन 1632 मध्ये वसंत ऋतुच्या आसपास ह्या मुघल बागेचे निर्माण केले. शहाजहानचा मोठा मुलगा प्रिन्स धाराशिकू याला हे गार्डन भेट म्हणून प्रदान केले. हे उद्यान 108 मीटर लांब व 38 मीटर रुंद असून एक एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. श्रीनगर स्थित तीन मुघल उद्यानापैकी हे सर्वात लहान उद्यान आहे. या उद्यानाच्या निर्माण कार्यावर मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे. गोड्या पाण्याच्या झऱ्याभोवती बांधले गेलेले हे उद्यान असून हे गोडे पाणी त्याच्या मध्यभागी टेरेस मध्ये वाहते. या बागेचा मुख्य फोकस हा नैसर्गिक गोड्या पाण्याचा झरा आहे.जो तीन विभागांमध्ये विभागलेला आहे. एक जलवाहिनी,दोन धबधबा आणि तीन उद्यानातील कारंजे. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे दररोज विमानाने ह्या नैसर्गिक गोड झऱ्याचे पाणी दिल्लीला पिण्यासाठी आणायचे.
दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित असलेले राष्ट्रीय महत्त्व असलेले शंकराचार्य यांचे मंदिर. ऐतिहासिक आणि पारंपरिक दृष्ट्या काश्मीरमधील सर्वात जुने मंदिर म्हणून शंकराचार्यांचे मंदिर गणले जाते. हे मंदिर एका टेकडीवर वसलेले आहे.जे फार्मियन कालखंडातील ज्वालामुखीच्या क्रिया कलापाने तयार केलेला एक चांगला संरक्षण पंजाल सापळा आहे. या मंदिराच्या बांधकामाबद्दल अचूक तारीख उपलब्ध नाही. शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरी या साहित्यकृतीची रचना येथेच झाली असे म्हटले जाते.
हॉटेल स्नो पॅलेस मधून सर्व सामान घेऊन सकाळी आम्ही साडेसहाला निघालो. सुरुवातीला पाहिले हजरत बल दर्गा. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी मोहम्मद पैगंबर त्यांच्या दाढीचा एक केस जपून ठेवण्यात आलेला आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी अनेक कबुतरे आहेत. दाणे टाकले की ते अगदी आपल्याजवळ येऊन दाणे टिपतात. इतक्या मोठ्या संख्येने कबूतर पाहून अनेकांनी फोटो शूट केले. त्यानंतर आमचा मोर्चा वळला तो खीर भवानी मंदिराकडे. तेथील पुजारी विजय शर्मा यांनी मंदिराबद्दलची माहिती दिली. लंकेमध्ये रावणाने भक्ती करून पार्वती मातेला आणले.परंतु राम रावण युद्धात फार मनुष्यहानी झाली असल्यामुळे पार्वती मातेने हनुमानाला सांगून जल रूपात कश्मीरमध्ये प्रस्थान केले. या मंदिरात पार्वती सोबत शिवजीची पिंडी असून संपूर्ण भारतात फक्त इथेच अशी मूर्ती आढळून येते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शक्तीपीठात चिनारच्या वृक्षामध्ये भारताचा नकाशा स्पष्ट दिसत दिसतो. नवलच आहे नाही का?
तिथून आम्ही निघालो सोनमर्ग कडे. रस्त्यात सिंध नदीच्या काठी सर्वांनी फोटो काढले. आमच्या सोबतच असणाऱ्या शंकरराव देशमुख यांनी सर्वांना चहा पाजला. आम्ही सोनमर्ग ला दुपारी पोहोचलो.प्रत्येकी सहाशे रुपये दराने जीप हायर केल्या. झिरो पॉईंट सह इतर प्रेक्षणीय स्थळे पाहिली. तेथून आम्ही पोहोचलो बालटालला. बस पार्किंग मध्ये आम्हाला घ्यायला पूजा टेन्ट हाऊस चे मालक आले होते. त्यांच्या सोबत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. प्रत्येक तंबूमध्ये ४ ते १० पलंग टाकलेले होते. सर्वांना त्याची माहिती दिली. पूर्ण 71 जण पूजा टेन्ट मध्ये समाविष्ट झालो. दुसऱ्या दिवशीच्या सर्व सूचना सर्वांना सांगितल्या. बालटाल बेस कॅम्प मध्ये एक दिवस मुक्काम यासाठी करायचा असतो की, त्या वातावरणाशी एकरूप होता यावे. लंगर मध्ये जेवून लवकरच झोपी गेलो.
(क्रमश:)