मागच्या सातव्या भागात मी माझ्या दर्शनाबद्दल लिहिले.माझ्यासोबत आलेल्या इतर तीर्थयात्रींच्या अमरनाथ दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर, पालखीने दर्शनास गेलेल्या यात्रेकरूंचे दर्शन तुलनेने घोड्यावर गेलेल्या यात्रेकरूंपेक्षा लवकर झाले. प्रत्यक्ष अमरनाथ गुहे जवळील लॉकरपाशी यात्रेकरूंची लॉकरमध्ये वस्तू जमा करण्यासाठी खूप गर्दी असल्यामुळे यात्रेतील माझे सहकारी सुभाष देवकत्ते,कालिदास निरणे,लष्करातून निवृत्त झालेले संतोष चेनगे यांनी स्वेच्छेने सगळ्यांचे सामान सांभाळण्याची जबाबदारी घेतल्याने यात्रेकरूंना फार मोठा दिलासा मिळाला व वेळेची बचत झाली.
बाबा बर्फानीचे दर्शन झाल्यानंतर सर्वच भाविक यात्रेकरूंना झालेला आनंद लपत नव्हता. अमरनाथ दर्शन हा हेतू घेऊन यात्रेस माझ्यासोबत आलेल्या यात्रेकरूंची वैयक्तिक कुटुंबात कुलदैवत, आराध्य दैवत, आणि मानस देवता हे सर्वच वेगवेगळ्या आहेत. ईश्वराची आराधना करताना जे नऊ प्रकार सांगितले आहेत ते याप्रमाणे ,श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, असे ते नऊ प्रकार आहेत. भक्तीच्या या प्रत्येक प्रकारामध्ये श्रेष्ठ भक्तही होऊन गेले आहेत. तसे पाहिले तर भक्ती म्हणजे
हिंदू धर्मातील , भक्ताच्या वैयक्तिक देवाबद्दल आणि भक्तासाठी देवाबद्दलच्या परस्पर तीव्र भावनिक जोड आणि प्रेमावर भर देणारी चळवळ.भगवद्गीतेनुसार हिंदू धार्मिक ग्रंथ, भक्तीचा मार्ग , किंवा भक्ती-मार्ग , हा ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग या इतर दोन
धार्मिक दृष्टीकोनांपेक्षा श्रेष्ठ आहे. तीर्थयात्रेस माझ्यासोबत आलेल्या यात्रेकरंच्या भक्तीचे देखील अगदी असेच आहे. देव आहेच आणि तो मला तारून नेतोच अशी श्रद्धा असणाऱ्या प्रतिभा चौधरी
||गोविंद गुरु दोऊ खडे काके लागू पाव
बलीहारी गुरू आपके, गोविंद जिने दिखाये||
या कबीराच्या दोह्याप्रमाणे गुरुवर नितांत श्रद्धा असणाऱ्या आणि वयाच्या आठव्या वर्षी गुरु केलेल्या सौ विजयालक्ष्मी पाम्पटवार. दरवर्षी अमरनाथला कुठले तरी साकडे घालणारे आणि साखडे पूर्ण झाले म्हणून परत सतत ९ व्या वर्षी अमरनाथ यात्रेला येणारे सुभाष देवकते, मी पूजा करतो पण ते एक कर्मकांड म्हणून त्यापेक्षा माझे मन एखाद्या मशीन डिझाईन मध्ये जास्त रमते असे थेटपणे सांगणारे विशाल राठी, शासकीय सेवेत सुटा बुटात राहणारे आणि वावरणारे पण नंतर गुरुचा आदेश झाल्यामुळे वस्त्र प्रावरणाप्रमाणे स्वतःचे संपूर्ण अंतरंग बदलून आणि जीवनशैलीत खूप कठीण बदल करणारे प्रदीप राहेगावकर, माझी बायको भगवान शंकराला मानते तर मला कृष्ण आवडतो आणि कृष्णाप्रमाणेच रंगढंग करत आयुष्य जगलो आहे असे प्रांजळ कथन करणारे नगरसेवक राहिलेले पुर्णा येथील अशोक जयस्वाल आणि अशा व्यक्तीचा सांभाळून घेत संसार करणाऱ्या सौ संध्या जैस्वाल तर आई-वडिलांची मनापासून सेवा करणारी त्यांची कन्या सृष्टी. असे मनाचे अनेक कंगोरे असणाऱ्या विविध व्यक्तींच्या सहवासात यावर्षीचा अमरनाथ यात्रेचा प्रवास आनंदात सुरू आहे.
प्रशासन आणि मिलिटरीच्या निर्देशाप्रमाणे अमरनाथ यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या आत बेस कॅम्प सोडावा लागतो. त्याप्रमाणे आम्ही सकाळी ६ ला बालताल बेस कॅम्प वरून श्रीनगर साठी निघालो.
पहाडी रस्ते आणि ट्रॅफिक जाम तसेच मिलिटरी चेकिंग यामुळे बालताल ते श्रीनगर हे अंतर तसे कमी असूनही या प्रवासास तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आम्हाला यावेळेस या प्रवासाला तब्बल चार तास लागले.अर्थात दहा ते बारा दिवसाच्या प्रवासात अशा तुरळक घटना गृहीत धराव्याच लागतात.
या झालेल्या उशिरामुळे नियोजनात थोडा बदल करत यात्रेकरूंना प्रथम श्रीनगर येथील सुप्रसिद्ध शालिमार गार्डन दाखवला.जिचा फोटो जुन्या १० रुपयाच्या नोटेवर आहे.शालिमार पाहण्यासाठी रु २४ प्रवेश शुल्क निर्धारीत करण्यात आले आहे.शालीमार बाग ही दल सरोवराच्या ईशान्येला एका वाहिनीद्वारे जोडलेली आहे . याला शालीमार गार्डन, फराह बक्श आणि फैज बक्श असेही म्हणतात .१६१९ मध्ये मुघल सम्राट जहांगीरने ही बाग बांधली होती. जी आता एक सार्वजनिक उद्यान आहे आणि त्याला “श्रीनगरचा मुकुट” असेही संबोधले जाते.चिनी खानास किंवा बागेच्या धबधब्यांच्या मागे असलेल्या कमानदार कोनाडे हे बागेतील एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हे कोनाडे रात्री तेलाच्या दिव्यांनी उजळले होते, ज्यामुळे पाण्याच्या धबधब्यांना परीकथेचे स्वरूप प्राप्त झाले होते.शालिमार बाग पाहण्यास कितीही वेळ दिला तरी तो अपुराच पडतो पण ७१ जणांच्या ग्रुपला मॅनेज करायचे म्हणजे कमी वेळ सांगून लागलेला अधिक वेळ भरून काढावा लागणार हे लक्षात घेऊन मी या बागेसाठी दीड तासाचा वेळ दिला. या रमणीय बागेत फेरफटका मारून आणि मनसोक्त फोटो काढून झाल्यानंतर दोन तासांनी सर्व प्रवासी वापस परतले.
प्रवाशांच्या २ निवासाची सोय मी नेहमीच हाऊसबोट मध्ये करतो ज्यामुळे त्यांना कश्मीर सहल केल्याचा आनंद मिळतो आणि सर्वच खुश होतात असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे.दल सरोवराच्या परिघावर असलेल्या हाऊसबोट्स एक सुखदायक अनुभव देतात, ज्याची आठवण तुमच्यासोबत दीर्घकाळ टिकते .जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांनी इंग्रजांना मालमत्ता खरेदी करण्यास परवानगी दिली नाही. तलावावर राहण्यासाठी बोटी बांधणाऱ्या लोकांमध्ये ही रोजची जीवनशैली होती . सुरुवातीच्या काळात, फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना हाउसबोट्स बांधण्याची आणि राहण्याची परवानगी होती. काश्मीरच्या पर्यटन व्यवसायात या हाऊसबोटचा मोठा वाटा असून आज घडीला श्रीनगर मध्ये १२४० हाऊस बोट आहेत. एका हाऊस बोट मध्ये साधारणतः तीन फॅमिली रूम आणि एक डॉरमेट्री रूम असते. अत्यंत कलात्मक पद्धतीने या हाऊसबोटची अंतर्गत सजावट केलेली असते. काश्मीरमधील हाऊसबोटच्या सजावटींवर मुघल कालीन आणि पर्शियन पद्धतीचा प्रभाव जाणवतो. हाऊस बोट वर पर्यटकांना शिफ्ट केल्यावर सायंकाळी त्यांना छोट्या शिकार्यातून दललेक मधील शिकारा राईडचा सुखद असा अनुभव दिला.सुपर डीलक्स हाऊस मधील एका रूमचे एका दिवसाचे भाडे ४ ते ५ हजार रुपये असल्याचे टेरिफ पाहून अभय शृंगारपुरे यांनी आश्चर्य चकित होऊन मला विचारले की, ” भाऊ १३ दिवसाचे तुम्ही २४५०० रुपये किफायतशीर पॅकेज आमच्या कडून घेऊन देखील तुम्ही इतक्या चांगल्या दर्जाची सुविधा कशी काय देऊ शकता? ” त्यावर मी एवढेच म्हणालो की,ज्या अमरनाथ यात्रे मुळे माझे नाव फेमस झाले ती यात्रा ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्याचे व्रत अंगीकारल्यामुळे आणि २१ वर्ष्यापासूनचे जपलेले संबंध यामुळेच हे शक्य होते.रात्री
राजेशाही हाऊसबोट मधील प्रशस्त पलंगावर झोप कधी लागली हे समजले देखील नाही.
(क्रमशः)