सलग दुसऱ्या रात्री श्रीनगर येथे हाऊसबोर्ड मध्ये शाही निवास केल्यानंतर सर्व यात्रेकरूंना घेऊन सकाळी सात वाजता दोन आरामदायक बसेस मधून आम्ही कटरासाठी निघालो. जम्मू या केंद्रशासित प्रदेशात येणारे कटरा हे शहर श्रीनगर पासून २२५ किलोमीटरवर आहे. हा मार्ग डोंगराळ प्रदेशातून जात असल्यामुळे रस्ते नागमोडी वळणाचे आहेत. विशेष म्हणजे या प्रवासात तुमच्या आजूबाजूला निसर्गरम्य रमणीय असा परिसर सतत सोबत असतो.रस्त्यामध्ये पंजाबच्या एका लंगर मध्ये भोजन घेतले. तिथल्या सर्व सेवेकऱ्यांचा सिरोंपाव व ट्रॉफी देऊन सन्मान केला. ते पाहून त्यांनी असे सांगितले की, ” आतापर्यंत शेकडो लोकांनी भोजन प्रसाद घेतला पण आमच्या सेवेचे कौतुक करून सत्कार करणारे फक्त तुम्हीच.” तेथील सुसज्ज धन्वीक्षेपक यंत्रणा पाहून सगळ्यांना भजनावर डान्स करायला लावला. आमच्यासोबत लंगरवाले देखील सहभागी झाल्यामुळे खुप धमाल केली.
एरवी ७ तास लागणा-या प्रवासास आमच्या दोन गाडी पैकी एक गाडीचे फॅनबेल्ट तुटल्यामुळे पर्यायी व्यवस्थेसाठी फार वेळ वाया गेला.कटरा पोंहचता पोंहचता ७ वाजले. कटरा येथील हॉटेल देवी ग्रँड ची उत्तम व्यवस्था पाहून सर्वजण खुश झाले.
अत्यंत नयनरम्य त्रिकुटा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले जम्मू केंद्रशासित प्रदेशातील रियासी जिल्ह्यामधील सुंदर गाव म्हणजे कटरा.जम्मू हे वैष्णोदेवी चे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते
कटरा जवळ पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. आकाराने लहान असूनही येथे बजेट पासून आरामदायी अनेक हॉटेल्स आहेत. उत्तम प्रकारचे आणि विविध तऱ्हेचे फूड कॅफे येथे आहेत त्यामुळे पर्यटकांसाठी कटरा हे एक अनुकूल ठिकाण आहे. अध्यात्मिक चिंतक, ट्रेकिंग करणारे, पर्वत प्रेमी, यांच्यासाठी कटरा हे एक योग्य ठिकाण आहे.. येणारे पर्यटक मुख्यत्वे वैष्णोदेवी च्या दर्शनाला येणारे श्रद्धाळू आहेत. लाखोच्या संख्येने वर्षभर वैष्णोदेवी ला तिचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
सुमारे सातशे वर्षांपूर्वी पंडित श्रीधर यांनी ज्या पवित्र गुफेचा शोध लावला.तिथे मंदिर बांधून आपले संपूर्ण आयुष्य देवीच्या सेवेसाठी व्यतीत केले ते हे मंदिर म्हणजे वैष्णोदेवी मंदिर. पौराणिक कथेप्रमाणे श्रीधर पंडित यांना देवीने चार पत्रांचे वरदान दिले होते आणि तिच्या प्रकट पूजेचा अधिकारही श्रीधर पंडित यांना मिळाला होता. देवीने स्वतः श्रीधर पंडित यांना या पवित्र तीर्थक्षेत्राचा महिमा लोकांना सांगण्यास सांगितले होते. तेव्हापासून देवीच्या या शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून यात्रेकरु दर महिन्याला वैष्णोदेवी येत असतात.वैष्णोदेवी व्यतिरिक्त शिव खोरी, बाबा धन सार, सणसर आणि पटणी टॉप ही कटरा परिसरातील इतर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे आहेत.
बाणगंगा ते वैष्णोदेवी हे अंतर १४ किलोमीटर आहे. वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाण्याकरता पालखी,घोडे आणि बॅटरी कार हे पर्याय पदयात्रेशिवाय उपलब्ध आहेत. पालखीने तुम्ही थेट देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता. घोड्याने जाणाऱ्या साठी सुरुवातीचे पाच किलोमीटर पायी चालावे लागते त्यानंतर घोड्याची सवारी करता येते. हीच बाब इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या कारच्या बाबतीत आहे. थोडक्यात काय तर किमान पाच किलोमीटर चालल्याशिवाय वैष्णोदेवी ला जाता येतच नाही.असे असले तरी आमच्यातील काही जणांनी त्या रात्रीच वैष्णोदेवीच्या दर्शनास पायी जाण्याचा संकल्प केला ती मंडळी म्हणजे रेखा व विशाल राठी,स्वाती व ब्रिजकिशोर दरक, संगीता व जयप्रकाश नावंदर, सारिका व विशाल मंत्री, राहुल झंवर .ही मंडळी सकाळी ९ वाजता दर्शन करून हॉटेलवर परतली व त्या दिवशी संपूर्ण आराम केला.
ठरल्याप्रमाणे सकाळी ५ वाजता सर्वजण तय्यार झाले होते. पण पाऊस सुरू असल्यामुळे निघण्यास उशीर झाला. कटरा बस स्टँड जवळ असणाऱ्या वैष्णोदेवी शाईन बोर्डाच्या कार्यालयात प्रत्येकाने जावून RFID कार्ड घेतले. यावर्षी ही नवीन सिस्टीम चालू करण्यात आली होती. तेथून ऑटो रिक्षाने आम्ही बाणगंगा ला पोहोचलो.माझ्यासोबत दर्शनास निघालेल्या प्रवाशांपैकी काही जणांनी बॅटरी कार बुक केली होती. तर काहीजण घोड्याने दर्शनासाठी गेले. काही जणांनी पालखी केली होती. पायी जाण्याचा संकल्प केलेल्या यात्रेकरूंचा उत्साह वाढावा म्हणून माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी ढोल ताशे लावले होते. या वाद्यांच्या वादनामुळे आणि वाजवल्या जाणाऱ्या भक्तीमय गीतामुळे यात्रेकरूंमध्ये उत्साह आणि जोश निर्माण होतो. ऊर्जेचे संक्रमण होऊन आपण किती चाललो व किती आराम केला हे कळत नाही आणि अतिशय आनंदात पदयात्रा संपन्न होते हा माझा अनुभव आहे. आमच्या पैकी ३६ जण यावर्षी माझ्यासोबत ढोल ताशाच्या गजरात वैष्णोदेवीच्या पदयात्रेत सामील झाले.त्यामध्ये गायकर परिवातील तुकाराम,नंदिनी,साहिल,
क्षितिज गायकर,तिरुपती व अनुसया गुट्टे
गजानन व प्रियंका मामीडवार,
सुरेश व सुनंदा दलबसवार,
जयवंत व अनिता पांडागळे,सुषमा तौर, बालाजी कवानकर, कालिदास निरणे, संतोष चेनगे, शिवप्रभू कामजवळगे, संजय जाधव, माधव मस्कले, शंकरराव देशमुख, सीमा निरणे यांनी भजने म्हणत चढायी केली.अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचताना ढोल ताशे वाल्यांनी यावेळेस सहा किलोमीटर आधीच निरोप घेतल्याने काही जणांची गती मंदावली.मी स्वतः अनघा व अभय शृंगारपुरे, मुकेशसिंह तौर, शंकरराव वंगलवार असे एकूण ५ जण पदयात्रांमध्ये सर्वप्रथम दर्शन घेण्यात यशस्वी झालो. आमचे दर्शन अतिशय शांत आणि प्रफुल्लित वातावरणात सकाळी साडे अकराच्या सुमारास झाले.
सविस्तरच सांगायचे झाल्यास आमच्या ५ जणांसह यावेळच्या बऱ्याच यात्रेकरूंनी एका दिवसात २८ किमी अंतर पूर्ण केले. त्यामध्ये
शशिकांत व पल्लवी कुलकर्णी,सुधाकर व
सुनीता ब्रह्मनाथकर,अरविंद व अंजली चौधरी,अरुण व मनोरमा लाठकर,बालाजी व सुनीता लाठकर,श्रुष्टी व संध्या जैस्वाल
रेखा देशपांडे,मिना कुलकर्णी यांचा समावेश आहे.श्याम व शुभदा रावके,
ओमप्रकाश व विजयालक्ष्मी पाम्पटवार,प्रतिभा व बस्वराज कुसनुरे यांनी घोड्याने प्रवास केला.रुपाली गोजवाडकर,गंगाधर व जयश्री फलटणकर,
वैजनाथ व शैला तसेच वरद पत्तेवार, तेजश्री व दिगंबर शेंदूरवाडकर यांनी अर्धे अंतर बॅटरी कारने पूर्ण केले.माधुरी व प्रदीप राहेगावकर, अशोक जायस्वाल यांनी काही दिवसापूर्वीच वैष्णोदेवीचे दर्शन घेतले असल्यामुळे हॉटेलमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. रात्री आठच्या सुमारास उदगीर येथील अमरनाथ यात्री नवनाथ सोनवणे यांच्यातर्फे देण्यात आलेले भोजन दर वर्षीप्रमाणे रुचकर होते. मसाज घेऊन गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर शांत झोप लागली.
(क्रमश 🙂