मुंबई ; मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावून या विभागाचे महत्वाचे ७५ प्रश्न निश्चित करावे आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने विधानसभेत मांडलेल्या अभिवादन प्रस्तावावर ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या विभागाचे प्रमुख ७५ प्रश्न मार्गी लावण्यास राज्य सरकारने पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने हे ऐतिहासिक वर्ष स्मरणात राहिल. थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे नांदेड येथील स्मारक पूर्ण करावे तसेच मुक्तिसंग्रामाचा इतिहास जनतेला ज्ञात व्हावा, यासाठी एका माहितीपटाची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील स्थगितीचे निर्णय मागे घेण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली.
मुक्तिसंग्रामाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, हा लढा भारतीय स्वातंत्र्य चळवळीइतकाच महत्त्वाचा आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आणि सर्वसामान्य जनतेने प्रचंड अत्याचार व दडपशाही सहन केली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाप्रमाणे मुक्तिसंग्रामातही गावागावातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा न करता स्वयंस्फुर्तीने हे आंदोलन केले. स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा, तसेच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील मुक्तिसंग्रामसैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचाही त्यांनी आपल्या भाषणात विस्तृत उल्लेख केला. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानाचा अशोक चव्हाण यांनी अनेक घटना सांगत उहापोह केला. औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी केलेले वंदे मातरम आंदोलन आणि त्याला काँग्रेस पक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस व पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या समर्थनाचीही माहिती सुद्धा त्यांनी सभागृहाला दिली.