आपल्या कर्तुत्वाने पराक्रमाने ज्या लोकांनी इतिहास घडविला त्या असामान्य व्यक्तीचे स्मरण व्हावे; त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती नवीन पिढीला व्हावी त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी व त्यांच्यासारखे असामान्य कार्य नवीन पिढीच्या हातून घडले जावे; पारतंत्राच्या जुलमी गुलामगिरीतून आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचा आदर्श आपण घ्यावा व त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची मधुर फळे चाखताना त्यांच्या पराक्रमाचे गोडवे या पुढील पिढीने गावेत यासाठी इतिहासाचे एकत्रित लेखन केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत नक्षत्रासारख्या दैदिप्यमान अशा महान व्यक्तींनी महाराष्ट्रातील तरूणांच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्याचे महान कार्य क्रांतिचे महामेरू चंद्रशेखर आझाद यांनी केले. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण या लेखात करून घेणार आहोत त्यानिमित्ताने हा शब्द प्रपंच. …
इसवी सन 1600 मध्ये व्यापारासाठी भारतात दाखल झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार करून संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. महासागरामध्ये अचानक उद्भवलेल्या वादळाचा किनाऱ्याला तडाखा बसून विध्वंस व्हावा; अगदी तशाप्रकारे अल्पावधीतच होत्याचे नव्हते पाहण्याची वेळ भारतीयांना आली.
इंग्रजांच्या अंगी गोचीड स्वभाव धर्म होता. स्वभाव धर्मानुसार त्यांनी भारतीयाचे आर्थिक शोषण केले.
अन्याय,अत्याचार, जुलूम, जबरदस्ती सहन करणे भारतीयांच्या दृष्टीने नित्याचेच बनले होते मात्र सहन शीलतेला देखील मर्यादा असते असे म्हटले जाते
*आलेलं दुःख पचवलं की*,
*जगण्याची उमेद भेटते* ।
*जिथे झाडाला घाव घातला जातो, तिथेच नवी पालवी फुटते*।।
अन्याय ,अत्याचार ,जुलूम, शोषण या मार्गाने इंग्रजांनी भारतीयांच्या स्वाभिमानावरती घाव घातला आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या मनात क्रांतीची नव-पालवी फुटली क्रांती अगोदर मनात जन्मते, मगच ती व्यवहारात उतरते. क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी तक्षशिला जवळच्या भावरा नावाच्या छोट्या खेड्यात झाला, त्यांच्या आईचे नाव जगदानी देवी तर वडीलाचे नाव पंडित सिताराम तिवारी होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा काळ असल्यामुळे भारतात सर्वत्र इंग्रजां विरुद्ध असंतोष पसरला होता. विविध प्रकारचे निषेध, आंदोलने, मोर्चे, निदर्शने,चळवळी, सभा आपापल्या परीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक करत होते. परदेशी कपड्यावर बहिष्कार टाकण्यासाठी आंदोलन सुरू झाले. जागोजागी कपड्याच्या होळ्या केल्या गेल्या.इंग्रज सरकारचा निषेध करून संताप व्यक्त करण्यात आला.
इंग्रजांनी भारतातून कच्चा माल नेऊन तिकडून पक्का माल तयार करून आणून दुहेरी राजनीती अवलंबून भरमसाठ नफा कमवला.आपल्या देशाची आर्थिक लूट चालवली होती.
तेव्हा चंद्रशेखर आझाद यांच्या कानावर इंग्रजांनी केलेल्या अन्याय अत्याचाराच्या गोष्टी आल्या. त्यावेळी त्यांनी इंग्रजांना भारतातून हाकलून दिले पाहिजे. अशा विचारांची ज्योत त्यांच्या मनामध्ये पेरली गेली आणि तेथूनच क्रांती कार्याला त्यांनी सुरुवात केली. बनारस येथे त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला त्यात *लघुकौमुदिनी आणि अमरकोश* हे ग्रंथ कंठस्थ केले व तसेच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होऊन आपण या देशाचे काही तरी देणे लागतो म्हणून कमी वय असताना सुद्धा ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले, महात्मा गांधींजीनी चालवलेल्या असहकार चळवळीत ते पकडले गेले त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना 15 फटके दिले. त्यावेळी ते न डगमगता तेवढे फटके सहन केले. एवढ्या छोट्या मुलाला फटके दिल्यामुळे भारतीय लोकांच्या मनात इंग्रजांविषयी चीड निर्माण झाली. ब्रिटिश सरकारच्या हाती सत्ता असल्यामुळे असा अन्याय, अत्याचार केला जातो म्हणून लोक एकत्रित आले, तेव्हापासूनच चंद्रशेखर आझाद जणू काही स्वातंत्र्य लढ्यासाठी जन्माला आले होते ते अनेक क्रांतिकारकांना मिळाले, शांत बुद्धीने आणि कसल्याही अडचणीला न डगमगता त्यांनी कार्य आपल्या हातात घेतले.चपळ आणि मजबूत शरीर लाभलेल्या चंद्रशेखर आझाद नेमबाजी मध्ये ही अत्यंत तरबेज होते. भगतसिंग त्यांना गुरु मानत असत, भारतीयांना अतिशय त्रास देणारा अधिकारी म्हणजे साॅर्डर्स याला ठार मारण्याची योजना क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आखली होती. ऐनवेळी चंद्रशेखर आझाद यांना ही या योजनेमध्ये सामील करून घेण्यात आले. नियोजनाप्रमाणे कार्याची आखणी केली गेली, साॅर्डर्स कचेरी मधून बाहेर आल्याबरोबर अचूक नेम साधून ठरल्याप्रमाणे त्याच्यावर गोळीबार केला तेथेच त्याचा अंत झाला.तेव्हा लाहोर शहरातून बाहेर निसटायचे होते .पोलिसांनी संपूर्ण शहरांमध्ये बंदोबस्त वाढवला, नाकेबंदी केली, क्रांतीकारकांनी वेगळा वेश धारण करून नाव बदलून पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणून पोलिसांच्या डोळ्या देखत रेल्वेत बसून तेथून निसटले, त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी वेगळी शक्कल लढवली जणू काही ते परमेश्वराचे भक्त आहेत असा देखावा त्यांनी उभा केला. मथुरेला तीर्थयात्रेला जाणाऱ्या भाविकांमध्ये ते मिसळून गेले आणि निसटून जाण्यात यशस्वी झाले, काही दिवस ते मठात राहिले, भूमिगत होऊन खडतर जीवन जगले. 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी रेल्वे स्टेशनवर चंद्रशेखर आझाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वेतील सरकारी खजिना लुटला.कारण त्यांना शस्त्र खरेदीसाठी पैसा हवा होता. तेव्हा पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या कल्पकतेतून ही कल्पना पुढे आली. काकोरी रेल्वे स्टेशन वर घडलेली घटना इतिहासात *काकोरी कट* म्हणून प्रसिध्द झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चंद्रशेखर आझादानी जीवाचे रान केले. एकदा त्यांना अटक करून कोर्टात घेऊन जाण्यात आले तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना विचारलं.
तुमचं नाव काय? त्यावेळेस ते म्हणाले *आझाद* वडिलांचे नाव काय? *स्वतंत्र* राहण्याचे ठिकाण *जेल* अशा प्रकारचे सडेतोड व निडर पणे उत्तरे दिल्यामुळे ते ही चिडले, सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटक केले आणि अनेक जणांवर खटले चालविण्यात आले .अशफाक उल्ला खान
,रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती कधी ही सापडले नाहीत.
अशा कितीतरी घटना इतिहासामध्ये आपल्याला स्फूर्ती आणणा-या आहेत. समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या अनेक तरुणांनी क्रांतिकारक संघटना उभी करण्याचे ठरवले हे क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते.1928 साली दिल्लीच्या फिरोज कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये *हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन* या संघटनेचे स्थापना करण्यात आली, कारण भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून कायमचे मुक्त करायचे होते. शेतकरी, कामगार, मजूर या सर्वांचे शोषण करणारी अन्यायी यंत्रणा उलटून टाकायची होती. वेगवेगळे शस्त्र गोळा करणे, महत्त्वाच्या कार्यक्रमाचे अंमलबजावणी करणे ही कामे स्वतंत्र एका संघटने कडे देण्यात आली तिचे नाव होते.*हिंदुस्तान सोशाॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी* आणि त्या विभागाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते, सरकारने या विभागावर धाडी टाकल्या. राजद्रोहाच्या आरोपाखाली अनेक खटले भरण्यात आले. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र इंग्रज अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले, शेवटपर्यंत ते इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. फितुरी हा भारतीय समाजाला लागलेला एक कलंक आहे. या फितूरीनेच अनेकांचा जीव घेतला हेच शस्त्र वापरून इंग्रजांनी चंद्रशेखर आझादानाही घेरले. शेवटी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी चकमक झाली, तेव्हा त्यांनी अनेकांना जखमी करून, *मै आझाद था. आझाद हॅुं, आझाद ही रहूॅंगा्* असे म्हणून आपल्या बहारदार मिशीला पीळ देऊन स्वतः च्या अंगावर गोळी झाडून घेऊन आपली शपथ पूर्ण केली. या भूमीत घडलेल्या सर्व क्रांती मधील नररत्नाची नुसती ओळख जरी करून घ्यावयाचे असेल तर आपल्याला हजारो पानाचे अनेक पुस्तके लिहावे लागतील म्हणून आपण फक्त या लेखाच्या रूपाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख करून घेत आहोत. इंग्रज सत्ते विरुद्ध झुंजत असताना ज्यांनी आपल्या प्राणाचे मोल मातृभूमीच्या चरणी अर्पण केले .अशा नरत्नाच्या चारित्र्यातून आणि चरित्रातून आजच्या तरुणांनी स्फूर्ती घेऊन त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा इतकेच नाही तर जगाला उलगडून दाखवावे. आपण स्वंतत्र आहोत याची माहिती आपणास आहे परंतु परकीयांचे येथे प्रस्थ दिवसें दिवस वाढत आहे हे जर असे वाढत राहिले तर पुन्हा आपल्या देशावर कोणते संकट ओढावेल हे सांगता येणार नाही; त्यासाठी आजच्या तरुणांनी स्वाभिमानी बनावे, आपला काही वेळ देशसेवेसाठी घालवावा. तसेच आपले विचार हे राष्ट्रप्रेमी असावेत. तेव्हाच त्यांना खरोखर आदरांजली ठरेल. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात त्यांनी समर्पण केलेल्या त्यांच्या स्वतःच्या देहाच्या, संसाराच्या, सुखाच्या आणि सर्वस्वाचा त्यांनी त्याग केला. *जिवंतपणे ब्रिटिश सरकारच्या हाती पडणार नाही ही प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली* 27 फेब्रुवारी 1931 रोजी ते शहीद झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर या क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान होण्यासाठी भारत सरकारने अलाहाबाद येथील मैदानाला चंद्रशेखर आझाद मैदान असे नामकरण केले, जयंती निमित्त त्यांना शतश :प्रणाम
*शब्दांकन*
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड