प्राजक्त फुलं ओघळताना त्या झाडाला काय वाटत असेल ??
आपलं बाळ आपल्यापासुन सेपरेट होताना त्या मातेला नक्की काय वाटत असेल ??
पण मग जेव्हा ती फुलं वेचताना परकर पोलक्यातील ८ वर्षाची सुंदरी , दाताचं बोळकं आणि पायात पैजणाचा छुमछुम आवाज करत चालत येइल आणि तिच्या नाजुक हाताने एक एक फुल परकरात गोळा करेल आणि पाठमोऱ्या तिच्या आकृतीकडे जेव्हा झाड ( आई) पाहील तेव्हा तिला नक्कीच प्राजक्तची आई असल्याचा तिला अभिमान वाटेल..
आणि एखादे ७० च्या पुढचे आजोबा पिशवी घेउन देवासाठी फुलं गोळा करायला लागतील तेव्हा त्या झाडाचा उर भरुन येइल कारण तिचं बाळ ( प्राजक्ताचं फुल ) देवाच्या पायावर वाहिलं जाणार.. फुलाच्या सुवासाने देव मनोमन त्या मातेचे आभार मानेल…
पण हीच फुले जेव्हा इतर लोकांच्या पायदळी तुडवली जातील तेव्हा तिचं काळीज चिरेल का ?? तर असं अजिबात होणार नाही उलट ती माता धन्य होइल कारण घाणीने बरबटलेल्या महागड्या बुटाना त्या पिटुकल्या बाळांचा सुवास येणार असतो.. त्यांच्या बुटावरील परिणामी मनावरील घाण निघुन जाणार असते.. कारण एखाद्याला आनंद द्यायला दुसऱ्याला दुख भोगावच लागतं.. फुलाना कितीही तुडवा कितीही चुरगळा ती सुवासच देत रहातात.. आता सकाळी चालायला जाताना एक फुल माझ्या डोक्यावर पडलं आणि पायापाशी येवुन थांबलं आणि तिथुन लेखाची सुरुवात झाली.. चालुन परत आले तर झाडु मारणाऱ्याने सगळी फुलं गोळा करुन कचऱ्यात फेकली होती.त्याने त्याचं काम केलं आणि प्राजक्तने दरवळण्याचं काम केलं.. आपणही प्राजक्त व्हायचा प्रयत्न करायला कार हरकत असावी ?? पहा विचार करुन.. आपण करत असलेल्या कामातुन , आपल्या कृतीतुन ,आपल्या वागण्या बोलण्यातुन दरवळत राहु..
एका छोट्या फुलाने दिलेला हा मौल्यवान सल्ला आपल्या बुध्दीने आपल्यात उतरवुन दुसऱ्याला देउयात.
माझ्याकडून सुध्दा हे कोणीतरी लिहुन घेतय म्हणुन मी तुम्हाला देतेय.. तुम्हा वाचकांची आणि विधात्याची मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करते.. त्या प्राजक्ताचं किती छोटं आयुष्य आहे पण सुगंध मात्र……
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री