अण्णा भाऊ साठे यांच्या कथात्म साहित्यातील सामाजिक आशय..

शब्दांना अनुभवाची धार आणि प्रतिभेचे तेजस्वीपण लाभले की अस्सल साहित्यकृतीचा जन्म होतो. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याला हेच वास्तवाचे अधिष्ठान प्राप्त झाले होते. जगलेल्या दाहक जीवनाची विदारक अनुभूती शब्दाशब्दांतून पुल्लिंगासारखी प्रज्वलित होते आणि अंधारलेले मनाचे कोपरे प्रकाशमान व्हायला लागतात. दुःख,दैन्याच्या अंधारात चाचपडणारा मानवी समूह हा त्यांच्या आस्थेचा विषय होतो आणि त्यातूनच अस्सल साहित्याची निर्मिती होते. एका कामगारानेच कामगारावर लिहावं ही अस्सल साहित्याची बीजं अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसायला लागतात. सुख वैभवच्या रुपेरी महालात बसून लिहिलेले तथाकथित मराठी साहित्य काळजाचा ठाव कधीच घेऊ शकले नाहीत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचं मराठी साहित्य विश्वातील पदार्पण म्हणजे खेडी-पाडी, वाडी- तांडे यातून दुःख, दैन्य, दारिद्र्य सोसणाऱ्या सामान्य माणसाच्या नायकत्वाचा उदय होता. विसाव्या शतकातील एक सामर्थ्यशाली लेखक म्हणजे अण्णा भाऊ साठे होत. पन्नास वर्षे ही जीवनमान लाभले नाही अशा प्रतिभासंपन्न साहित्यिकाने कथा, कादंबरी, नाटक, लोकनाट्य,प्रवासवर्णन, पोवाडा, लावणी असे विविधांगी वाङ्मय प्रकार हाताळून अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या विविधांगी साहित्य प्रकारावर आज संशोधन होताना आपणास दिसते ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल. मनोरंजनासाठी साहित्याचं सृजन व्हावं हा विचार अण्णा भाऊ साठे यांच्या मनाला स्पर्श करणारा नव्हता. सामाजिक परिवर्तनाचा क्रांतिकारी एल्गार हाती घेऊन इथल्या व्यवस्थेला अंतर्बाह्य परिवर्तन साकार करणे हेच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रधान ध्येय होते. भारतीय संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य,समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि मनुष्यता ही मूल्ये दिसून येतात. अण्णा भाऊ साठे यांच्या कथांमधून आणि साहित्यातून भारतीय संविधानिक अमुल्यांचे ठायी- ठायी दर्शन होताना दिसते. दलित, कामगार आणि स्त्री म्हणून होणारा अन्याय सहन न करता त्याविरुद्ध दाद मागणारी संघर्ष करणारी नायक आणि नायिका अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात चित्रित केली आहेत. समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेमधून, पारतंत्र्यातून आणि बंधनातून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेऊ पाहणारे नायक आणि नायिका अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात आणली आहेत.गाव गाड्यासह जाती-जातींमध्ये समता निर्माण झाली पाहिजे,गरीब- श्रीमंत भेद संपला पाहिजे अशी वैश्विक विचाराची नायक आणि नायिका अण्णाभाऊंनी आपल्या विविध कथांमधून आणि साहित्यातून चित्रीत केली आहेत.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे कोणत्याही शाळेत गेलेले नव्हते. त्यामुळे शाळेत घडणारे भाषिक कौशल्य त्यांच्या मनावर झाले किंवा नाही हे सांगता येणार नाही. अण्णा भाऊ साठे यांची भाषिक क्षमता ज्या शाळेत वाढली, विकसित झाली ती शाळा म्हणजे अण्णाभाऊंचे संपूर्ण जीवन होय. दैनंदिन जगण्यातील अनुभव हेच त्यांचे शिक्षक आणि प्रेरणा होती. म्हणूनच त्यांच्या भाषिक संस्काराचा आधार हा अण्णाभाऊंचा अस्सल जीवनानुभव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अण्णा भाऊ साठे यांना जन्माला आल्यापासून सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत जीवन संघर्ष मोठ्या प्रमाणात वाट्याला आला होता. साहित्य समाजाची प्रतिकृती असते. मानवी जीवन अनुभव शब्द रूपाने साहित्यात अभिव्यक्त होतात. साहित्य आणि समाज यांचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळापासून मानवी भावभावनांचे प्रतिबिंब साहित्यात उमटत आले आहेत. कथात्म, नाट्यात्म, निबंधात्म, काव्यात्म या विविध रूपांमधून जीवन व्यवहाराचे दर्शन साहित्यात येत असते. कथात्म साहित्यामध्ये कथा व कादंबरी हे महत्त्वाचे प्रकार आहेत. कालानुरूप अनेक विकसनशीलतेचे टप्पे पार करत कथा या साहित्य प्रकाराने समकालीन स्वरूप धारण केले आहे. कथा हा साहित्यप्रकार आशय आणि रूपाने कादंबरीपेक्षा लघु अवकाश असणारा असून तो जीवनातील विशिष्ट अनुभव मर्यादित भाषिक अवकाशामध्ये तीव्रपणे प्रतीत करणारा तो एक साहित्यप्रकार आहे. हे या ठिकाणी नमूद करणे आवश्यक वाटते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या प्रतिभावंत साहित्यकारने आपल्या एकूण कथा साहित्यात समाजातील दलित, उपेक्षित, भटके, स्त्रिया, पुरुष, शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी अशा सर्व घटकांतील समस्यांचा वेध घेणाऱ्या कथा लिहिल्या. त्यामुळे त्यांच्या कथांमधून आशय सुत्राबाबतीत वैविधता आढळते. समाजातील मूल्यांचा स्वीकार व मानवी मूल्यांचा प्रखर विरोध हे महत्त्वाचे केंद्र अण्णा भाऊ साठे यांच्या सर्वच कथा लेखनात दिसून येते. संघर्ष हा अण्णा भाऊ साठे यांच्या कथेचा आणि एकूण साहित्याचा गाभा आहे. माणसा – माणसातील, समाजा- समाजातील, माणूस व पशु यांच्यातील, माणूस- परिस्थिती यांच्यातील, धर्म, जात,वर्ण यांच्यातील संघर्ष अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कथांमधून मांडलेला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कथांमधून समाजाच्या दारिद्र्याचे, स्त्रियांच्या समस्यांचे सुधारणावादी दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक विषमते विरुद्धची बंडखोरी, तमाशा जीवनाचे प्रश्न,जातीय संघर्ष, मानवी विक्रृतींचे चित्रण, भटक्या विमुक्त जमातींचे चित्रण, दलित -कष्टकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्यांचे चित्रण विविध कथांच्या माध्यमातून साहित्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कथेतील दारिद्र्याच्या चित्रणाबाबत निला उपाध्ये म्हणतात,’अण्णाभाऊंच्या अनेक कथांतील माणसं पोटाच्या भुकेने व्याकुळ झालेली असतात. आणि ते भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी बंडखोर बनायला व पशुपातळीवर जायलाही तयार असतात. हा विचार अण्णाभाऊंच्या अनेक कथांमधून आलेला दिसतो.’
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘बुद्धाची शपथ’ ही प्र.के. अत्रे यांच्या ‘युगांतर’ या विशेषांकात नोव्हेंबर १९५८ साली प्रकाशित झाली. ही कथा सांगली जिल्ह्यातील चिंचणी गावातील पाच मुलावर चित्रित केलेली वास्तवदर्शी कथा आहे. सांगली जिल्ह्यात चिंचणी या गावातील साहेब, विलास, जगु, मोहन आणि विश्वास ही पाच मुले असतात. विलास उर्फ मास्तर यांच्यासह करवंद्याच्या बागेत करवंदे खाऊन फिरून सायंकाळी घरी येत असताना मास्तर उर्फ विलास घरी जाण्यास नकार देतो. कारण त्याची जनावरं पाटलाच्या उसाच्या मळ्यात शिरल्यामुळे पाटील त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याला त्याच्या आईने मारलेले असते. यावर बाकी सर्व चौघेजण त्याला समजावून सांगतात.’आरं आईने मारलं म्हणून काय झालं?’ पण विलास उर्फ मास्तर घराकडे यायला नकार देतो. त्यामुळे बाकी चौघेही घराकडे जायला नकार देऊन ‘मी बुद्धाची शपथ घरला जाणार नाही.’ अशी बुद्धाची शपथ घेतात. ती पाच मुले मुंबई वरळीला जाण्याचा निर्धार करतात. चिंचणी रेल्वेस्टेशन वरून ही मुलं मुंबईला तिकीट न काढताच रेल्वेत बसून मुंबईचा प्रवास सुरू करतात. त्यांना तिकीट मास्तर पकडतात. या पाचही मुलांची उडालेल्या भंबेरीचं अण्णाभाऊंनी विस्तृत असे सामाजिक पटलावरचे विवेचन केले आहे. या मुलांना चिंचणीची काही माणसं वरळीत राहतात एवढेच माहीत असते. परंतु मुंबई कुठे व वरळी कुठे हे माहीत नसते. तरीही ते प्रवास करून मुंबईला आलेली असतात. मुंबईत तिकीट मास्तर व त्यांच्यातील संवादाचे वर्णन अत्यंत मार्मिकपणे अण्णाभाऊंनी कथन केले आहे.’ बुद्धाची शपथ’ या कथेत अण्णा भाऊ साठे म्हणतात,’डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करताच चिंचणीचा सर्व महारवाडा बुद्ध झाला होता. आपला उद्धार करता जे करिल ते करायचं. या परंपरेला धरून सर्वांनी बौद्ध धम्माची धर्माची दीक्षा घेतली होती. आणि त्या धर्माचे काटेकोर पालन करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला होता. आणि त्या निश्चयाचा अंकुर या बालकांच्या कोवळ्या मनावर रुजला होता. अन्याय,अज्ञान, दारिद्र्य,अवमान,अपमान यांच्या चिखलात त्यांचा जन्म झाला होता. परंतु चिखलात सुंदर कमळ जन्माला येते तद्वतच ती पाच मुलं जन्मली होती. आपल्या उद्धारकर्त्याचे देव व त्याची आपण घेतलेली शपथ आज मोडायची नाही असा त्यांचा निर्धार कायम होता.’अण्णा भाऊ साठे यांना अभिप्रेत अशा समाज जीवनाला त्यांनी दीक्षा देऊन त्याद्वारे त्यांनी समता प्रस्थापित करण्याचा केलेला मानस प्रामुख्याने त्यांच्या कथांमधून आपणास दिसून येतो.’
अण्णा भाऊ साठे हे मोठे वाड्मय निर्मिक आहेत. पण रंगमंचावर,रस्त्यावर, विचारमंचावर, लोकनाट्ये, पोवाडे,गीते, शाहिरी सादर करणारे,नाटक सिनेमातून क्रांतीचा संदेश देणारे अण्णाभाऊ प्रस्थापित कलावंता पेक्षा कणभरही कमी नाहीत.उलटपक्षी त्यांच्यापेक्षा कैक मैल अण्णा भाऊ साठे पुढे आहेत.अण्णा भाऊ साठे हे प्रामुख्याने सिद्धहस्त प्रतिभा संपन्न ललित लेखक आहेत. त्यांनी कादंबरी, कथा, नाटक, प्रवासवर्णन, लोकनाट्य, पटकथा, पोवाडे ,गीते लिहिली आहेत. त्यांचा पिंड मूलतः शाहिरीचा, कथाकराचा आहे.विशेषतः सशक्त, पिळदार,आशयघन, संघर्षसंपन्न कथासूत्रे हे त्यांच्या एकूण सर्वच ललित लेखनाचे नजरेत भरणारे ठशीव वेगळेपण आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘सापळा’ ही कथा गावगाड्याशी निगडित आहे. यामध्ये दलित आणि सवर्ण असा संघर्ष आहे. या संघर्षाचे मूळ इथल्या प्राकृतिकते मध्ये दिसते. मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावणे हे हीन काम महार जातीला करावं लागत असे. त्याचे संपूर्ण चित्रण या ‘सापळा’ कथेमध्ये आले आहे. अमानवी चालीरीती विरोधात महार समाज दंड थोपटून उभा राहतो. म्हणून गावातील इतर सर्व जातीचे लोक त्यांची नाकेबंदी करतात. सर्व महार हतबल होतात. पण हरिबा महार त्यांना आधार देतो. त्यांचा नायक बनतो.हरीबा गावावर खटला भरण्यासाठी तालुक्याला जातो. तो जात असताना पळसाच्या माळावरून जातो.त्यावेळी त्याचे मन भीतीयुक्त असते. त्याला त्या माळाची भीती वाटते. त्याचे दबलेपण हे प्राकृतिक बनते. तालुक्याला पोहोचल्यावर गावावर खटला भरण्याऐवजी तो पळसाचा माळ लिलावात घेतो. माळाची मालकी मिळवितो. त्यामुळे त्याच्यामध्ये आणि पर्यायाने सर्व महार समाजामध्ये आत्मविश्वास वाढतो. सर्व महार समाज सर्व गावाला सापळ्यात पकडतो. ही सर्व करामत होते फक्त पळसाच्या माळामुळे. त्यामुळे या कथेतील पळसाचा माळ आणि हरीबा महार हे प्रेरक प्रतिक आहे. “टाचा घासून मरू या पर मानाने मरू ,घाण कामं करतो म्हणून आम्ही कुत्र्यावाणी ठरलोय.”ती कामं बंद करून एल्गार पुकारणं हा हरिबा महाराचा स्वाभिमानाचा विचार या ‘सापळा’ कथेत आलेला आहे. त्यासोबतच गावातील दत्ता पाटील यांची समंजसपणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून गावातील सर्व मानव जातीने गुण्यागोविंदाने समंजसपणाने, माणसावाणी वागावे हा सामाजिकतेचा वैश्विक,मौलिक असा विचार अण्णाभाऊंनी यातून दिलेला आहे.
खेडेगावातील जाती-जातीमधील उचनीचेतेच्या भावनेमुळे समाजा समाजात कसे वितूष्ट निर्माण होते. हे ‘उपकाराची फेड’या कथेतून अण्णा भाऊ साठे यांनी सांगितले आहे. शंकर चांभार, लखू मांग, मळू महार, मन्या परीट आणि रंगू पाटील यांच्या एकूणच समाज जीवनातील चालीरीती, धार्मिक व जातीय पातळीवर प्राकृतिक कथा मांडलेलीआहे. गावगाड्या मधील जाती निश्चित व्यवसायाचा अवकाश हा या परिसरातील प्रसन्नता प्रदूषित करते आणि तिथूनच माणसाची मनं जातीनिहाय दुरावत जातात याचाही परामर्श अण्णाभाऊंनी या कथेत घेतला आहे. ही कथा जातीयतेच्या विषारी वलयावरती प्रकाश टाकून प्रलय करते.वस्तूतः चांभार व महार या दोन्हीही पीडित व दलित जाती.पण धार्मिक व सामाजिक चालीरीती यांच्यात सुद्धा उंच नीचेतेचे विष पेरतात. यातूनच मळू महार हा त्यांचे आरुसंआणि कावडणी शंकर चांभाराला त्याची मेलेली म्हैस उचलण्यासाठी देतो.कारण शंकरने त्याला चप्पल शिवण्यासाठी सळ आणि आरी देऊन केलेल्या उपकाराची फेड मळू करतो. ही बनलेली जातीय प्राकृतता मळू महार या व्यक्तिरेखेमध्ये स्वाभिमान निर्माण करते. त्यातूनच गर्विष्ठ असलेल्या शंकर चांभाराला अद्दल घडवितो.
विनोदी भाव हा साहित्य कलाकृतीचा एक भाग असून अशा विनोदातून माणसाची मनं प्रफुलित आणि हलकी व्हायला लागतात हा महत्त्वाचा विचार अण्णा भाऊ साठे यांनी ‘घोड गोंधळ’ या कथेच्या माध्यमातून दिलाआहे. हरिबा या नायकाच्या थोरल्या बायकोला शाणीबाईला वीस वर्षे झाली तरी मूल होत नाही. म्हणून हरीबा दुसरी बायको आकुबाई हिच्याशी विवाह करतो. शाणीबाई देन्या आलक याला जवळ करते, तर आकुबाई ही जान्या जमदाडे याला जवळ करते, तेंव्हा गावातले लोक ,”लेका घरातला घोड गोंधळ बंद कर. अरे अब्रू गेली ना… “असं म्हणायला लागतात तेव्हा हरिबा निराश, हताश होतो आणि सतू चांभाराला हा प्रकार सांगतो आणि त्या सतू चांभाराकडून चाबूक आणतो आणि चाबकाने या दोन्हीही बायकांना तो फटकारतो. अण्णाभाऊंनी या विनोदी कथेच्या माध्यमातून झालेल्या चुकीला एखाद्या वेळी फटकारलं की माणसं शहाणी आणि सरळ होतात हा मौलिक विचार या कथेच्या माध्यमातून दिला आहे. आणि दोन बायका केल्यानंतर माणसाची कशी फजिती होते, खेडेगावात, ग्रामीण भागातील घडणाऱ्या या प्रसंगाचे वास्तव चित्र अण्णाभाऊंनी आपल्या ‘घोड गोंधळ’या कथेच्या माध्यमातून मांडलेलं आहे.
आज ग्रामीण भागात एकत्र कुटुंबपद्धती लुप्त होऊन विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारी मंडळी जास्त प्रमाणात दिसतात. आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना जीव लावणारी मुलं आणि सुना कशाप्रकारे वागवतात त्यासोबतच पैसा, जमीन, घरदार, घरातील बायकांमुळे आणि संपत्तीमुळे नातेसंबंधात येणारं वितूष्ट निर्माण होणारा दुरावा, याचे भावस्पर्शी वर्णन ‘दाभाड्याचा वाद’ या कथेतील हनमा इस्लामपूरला जाऊन बंगलौर कौल आणून घर शेकारून घ्यायला लागतो. जिजाबाजवळ पैसे नाहीत म्हणून गावातील कुंभाराकडे जाऊन गावठी कौल आणून आपलं घर शेकारून घेत असताना हनमा जिजाबाला म्हणतो,” मी माझ्या घरावर कौलं टाकतो”. याच्यातून वाद निर्माण होतो. आणि हनमा एक दगड घेऊन जिजाबाच्या बरगडीत मारतो त्यावेळी जिजाबा खाली पडतो. घरातील वातावरण गंभीर होते. हनमा व जिजाबाच्या बायका रडू लागतात. हानमा ही रडू लागतो.जखमी जिजाबाला इस्लामपूरला दवाखान्यात नेतात त्यावेळी हनमा गाडीसोबत इस्लामपूरला जातो. आपल्या भावाला आपण विनाकारण मारलं याचं त्याला वाईट वाटते. आणि मी महापाप केलंय आता मी जेलमध्ये गेल्यानंतर दोन्ही घरची पोरं पोरकी होणार म्हणून तो रडायला लागतो. तेव्हा जिजाबा डॉक्टरांना म्हणतो. “साहेब,मी घर शेकारताना तंबाखू खात असताना घरावरून खाली पडलो आणि माझी एक बरगडी मोडली” असे खोटे सांगतो. “वडील भाऊ बापासमान असतो. हे जिजाबा तू आज खरं केलंस. मी सगळं शेत, घर ईकन पण तुला मरू देणार नाही.” असं हनमा म्हणतो. त्यावेळी जिजाबा त्याच्या पाठीवरून हात फिरवतो.कारण आपल्या भावाला शिक्षा होऊ नये हा वैश्विक विचार जिजाबाने या कथेच्या माध्यमातून दिला आहे.सिरगावातील मोठा भाऊ हणमा दाभाडे आणि लहान भाऊ जिजाबा दाभाडे या दोन भावाच्या कौटुंबिक वादातून आणि म्हाताऱ्या आईला कोण सांभाळणार यातून निर्माण झालेला वाद कसा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचतो. याचे वर्णन ‘दाभाड्याचा वाद’ कथेतून चित्रित झाला आहे. भावा भावात आणि नात्यात आलेला दुरावा,कुटुंबव्यवस्था उध्वस्त होण्याची कारणमीमांसा या कथेतून आधोरेखित झाली आहे. ग्रामीण जीवनातील स्नेह, आपुलकी, जिव्हाळा आटत चालला आहे. युगायुगापासून आनंदात सहजीवन जगणाऱ्या गावाला आणि भावाला स्वार्थाची दृष्ट लागली आहे, नातीगोती संपुष्टात येत आहेत, मना-मनामध्ये दरार निर्माण झालेला आहे. त्यामुळे स्वर्गासमान असलेले ग्रामीण जीवनाचे स्वार्थाच्या नरकात रूपांतर झालेले आहे. अशावेळी अण्णाभाऊंच्या या कथा मानवी जीवन मूल्यांची पेरणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जीवनाचे महन मंगल स्वरूप भावाभावातील बंधूभावाचा ओलावा पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी अण्णाभाऊंचे हे चिरंतन साहित्य मानवतेचा उद्घोष करतात.
ग्रामीण जीवनात नराचा ‘नारायण’होणे ही प्रक्रिया भारतीय साहित्यातून निर्माण करण्याचा अनेक वर्षापासून प्रयत्न होत आला आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांचे जगणे हा विषय हाताळताना ‘आग’ या कथेच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांनी पहिलवान पांडू नांगऱ्या, त्याची बायको हौसा राजा ठोंबरा याच्या वखारीत काम करीत होती. पंचवीस वर्षांच्या हौसावर नजर ठेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारा राजा ठोंबरा हा त्याच्या विकृत प्रवृत्तीमुळे कसे स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करतो हे या ‘आग’ कथेतून अण्णाभाऊंनी सांगितले आहे. गावातील नारू पाटील यांनी समजावून सांगूनही काही फरक पडला नाही .शेवटी पांडू आणि हौसा यावर उपाय करायचं ठरवतात.सुरुंगाचा दारूचा पुडा व त्यापुढ्यात पेटती उदबत्ती राँकेलचे डबे रचलेल्या ठिकाणी हौसा ठेवते. पांडू चावडीवर नारू पाटलासोबत हे सर्व पाहत बसतो. दुकानाला आणि घराला आग लागते. हौसा घरातून बाहेर पडते. शेजारची घरं जळू नयेत म्हणून सगळे लोक प्रयत्न करत करतात त्यावेळी राजा ठोंबरा म्हणतो,
” पाटील पळा,माझ्या संसाराला आग लागली.”पाटील म्हणतो, “दुसऱ्याच्या घराला आग लावणा-याचा संसार पेटतोच लेका, आता मी काय करू. आणि बोंबलू नग.” हौसा हे सगळं पहात होती. थोड्या वेळापूर्वी तिच्या अंतःकरणात पेटलेली आग त्यावेळी शांत झाली होती. माणसाच्या मनातील विकार,काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष, अहंकार यातून मानवी जीवन उद्ध्वस्त होत आहे‌. काम वासना ही तर मानवी जीवन उध्वस्त करणारी शाप वाणीच आहे. एक पत्नी प्रभु रामचंद्राच्या या देशात एक पतिवृत्त घेऊन जगणाऱ्या करोडो लोकांनी ही मानवी जीवनमूल्ये जिवाभावाने जपलेली आहे.परस्त्री मातेसमान असते समजणाऱ्या व तसं आचरण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात.या भारतीय जीवनमूल्यांना धुडकावून लावून दुसऱ्याच्या पत्नीवर पापी नजर ठेवून स्वतःचे व समाजाचे स्वास्थ्य नष्ट करणारे विकृत विचार आजही समाज जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी अण्णाभाऊंचे हे साहित्य शाश्वत मानवी जीवन मूल्यांच्या आणि सदाचाराचा पाठलाग करीत आले आहे. या कथांमधून सुसंस्कृत माणूस घडविण्यासाठीची प्रक्रिया अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सुरू केली आहे. जे जे वांछील ते ते लाहो प्राणी जात..ही ज्ञानेश्वर माऊलींनी मानवतेचा उद्घोष करणारी संकल्पना मानवाला बहाल केली आहे. परस्त्री कडे वाईट नजरेने पाहिल्यानंतर किंवा वाईट कृत्य आपल्या हातून घडल्यानंतर आपल्या संसाराचा कसा नाश होतो. हे अण्णाभाऊंनी ‘आग’ या कथेतून मांडले आहे..
परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा अविष्कार अण्णाभाऊंच्या अनेक कथांमधून व्यक्त होताना दिसतो. ‘वळण’ नावाची कथा त्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे चिमा म्हातारी आणि या कथेचा नायक बळी, बंडू, गोदा आणि गुंडा मास्तर याचे संवादरुपी चित्रण अण्णाभाऊंनी लीलया पद्धतीने मांडले आहे.चिमा म्हातारी सत्तर वर्षापासून मास खाते. मास खाते म्हणून तिचे घर आणि तिच्या संसाराची धूळधाण केली जाते. त्यावर गुंडा मास्तर म्हणतो, “म्हातारीच्या जिभेला सत्तर वर्षे झाली हे वळण लागलं आहे. ते सात दिवसात तुम्ही कसं बदलणार? आणि तिच्या घरात शिरून तिच्या संसाराची जी धूळधाण केली याचा अर्थ काय? ही तुमची माणसं सुधारण्याची त-हा घातकी आहे.”हा महत्त्वाचा वैश्विक विचार गुंडा मास्तरांच्या वर्तनातून अण्णाभाऊंनी समाजाला सांगितला आहे.म्हातारी आपलं शेत हजार रुपयाला विकते त्यातले पाचशे रुपये भावकीला देऊन म्हणते,”ही रक्कम चांगल्या कामाला खर्ची करा.नाहीतर गरीब पोरास्नी वाटा” नंतर
चिमा म्हातारी गुंडा मास्तराकडे जाऊन “मास्तर तुम्ही देवागत मानसं, मला लई सांभाळले. पण आता माझ्या जीवाला बरं नाही.” ती पाचशे रुपये मास्तर कडे देत म्हणाली,” ही रक्कम तुमच्याजवळ ठिवा आणि माझं बरं वाईट झालं की माझा दिवस घाला. झालं गेलं सारं ईसरा.” हा माणुसकीचा, आपलेपणाचा आणि जिव्हाळ्याचा संदेश अण्णाभाऊंच्या ‘वळण’ या कथेतून आपणास शिकायला मिळतो. मला समाजाचं काही देणं लागते. ही भावना चिमा म्हातारीच्या वर्तनातून सिद्ध होते. एकदा लागलेलं वळण लवकर सुटत नाही पण प्रयत्न केल्यानंतर ते सुटते हा ही संदेश अण्णाभाऊंनी या ‘वळण’ या कथेच्या माध्यमातून वाचकांना दिला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश असून सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी उद्बोधक ठरणारा आहे..समाजाभिमुख साहित्याची पेरणी करणाऱ्या साहित्य पांढरीच्या या मळेकरी बळीराजाचं हे पीक नश्वर आहे.

 

शिवा कांबळे

सदस्य: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन
‘फकिरा’
चक्रधर नगर, मालेगाव रोड, तरोडा (खुर्द),नांदेड.
भ्रमणध्वनी :९४२२८७२७२१”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *