ना.धों.महानोर यांच्या कवितेत विरलेली स्त्री

 

आधुनिक मराठी साहित्यातील निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर. त्यांचे कवितालेखन प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहे. निसर्गाची भाषा बोलणारे, निसर्गाशी संवाद साधणारे, रसिकांचं बोट धरून त्यांना निसर्गाशी मैत्री घडवून देणारे असे हे कवी ना. धों. महानोर. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आपल्यास दिसून येतो.
” मी रात टाकली, मी कात टाकली। मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली। “
ज्या संसारांमध्ये तिचे मन रमत नाही, तिच्या कोणत्याही गरजा पूर्ण होत नाहीत त्या संसाराला निरोप देताना तिला लाज वाटत नाही अशी बिनधास्त, सडेतोड स्त्री महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी
ना. धों महानोर यांच्या गीतांमधून आपल्याला भेटते.
सरळ विचार कवितेतील नायिका व्यक्त करते.
रानकवी म्हणून ओळख असणाऱ्या ना धों महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. महानोरांच्या कवितेमधून स्त्रीची विविध रूपे अविष्कृत झालेली दिसतात. त्यांच्या एकंदर सर्वच काव्याचा विचार केला असता त्यात येणाऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या रूपात वाचकांना भेटते. जीवनातील बिकट परिस्थितीला सामोरे जाताना संसाराचा गाडा ओढणारी, कधी उदास झालेली तर कधी भ्रमिष्ट झालेली आपल्या सुख दुःखासह आपल्या अवतीभवती वावरणारी स्त्री ना. धों.महानोर आपल्या कवितेमधून रेखाटली आहे.
“पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून, आई करपले हात तुझे भाकरी भाजून”. या अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांमधून आई या रुपामध्ये स्त्रीचे संपूर्ण आयुष्य नेमके कोणत्या पद्धतीने जाते याची जाणीव कवीने करून दिलेली आहे.
कविराज असे म्हणतात की,आई मेली तरी आपल्या मुलाची काळजी करणे सोडत नाही, तिचा आत्मा किंवा मन सतत मुलांच्या संसारामध्ये किंवा घरामध्ये घुटमळत फिरत राहते अशी भावना कवीने व्यक्त केली आहे. महानोरांच्या कवितेमध्ये शेतात वावरणारी, राबणारी कष्टनारी निसर्गाच्या कुशीमध्ये स्वतःचे अस्तित्व उडवून देणारी आई सातत्याने दिसत राहते.
स्त्रीच्या आयुष्यातील जाते, ओव्या, आणि कष्ट हे जणू तिच्या पाचवीला पुंजल्या सारखे जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसले होते. घरादाराच्या दुःखात स्वतःला झिजवून घेत असताना स्वतःला कायमच अर्धपोटी ठेवून झोपते असे सांगतात.
ग्रामीण भागातील माय माऊली यांचे जीवन किती बिकट आणि खडतर आहे हे पाहून त्यांनी ते आपल्या रचना सजीव केल्या.
गाण्या मधील नेमका ठेका, लयबद्धता, आणि प्रासंगिक कथा असा सुंदर आविष्कार गीतांमधून महानोरांनी उभे केले.
अत्यंत स्त्रीसुलभ घटना नेमकेपणा हे रचनेत ते टिपायचे. त्यातही स्त्रीने आपल्या माहेरच्या लोकांना नेहमीच भरभरून कोडकौतुक केलेले ग्रामीण भागांमध्ये दिसते.
असे असले तरी स्त्रीच्या सहनशीलतेला अंत नाही, दुःखाच्या आणि कष्टाच्या वाटा सतत पुढे सरकत जातात त्या ती कुठे तक्रार करत नाही.
“बाई जन्माचे धिंदोडे सांगू कसे, झाकू कसे? चुलीतल्या गोवरीला चुलीमंधी जळायचे!”
इतक्या सोशिक विचाराने ना.धो.महानोर यांच्या कवितेमधील स्त्री आपल्या भावना आणि वेदना मांडत असत.
ती हे सर्व का सहन करते? अशा प्रश्नाची अनेक उत्तरे त्यांच्या यश काव्यसंग्रहा मधून मिळतात.
पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये निमूटपणे सोसावे लागणारे अत्याचार, दारिद्र्य, जीवाची होणारी तगमग या सर्वांमध्ये एखादेवेळी अन्यायाविरुद्ध उभे राहाणे हे सारे महानोरांच्या कवितांमध्ये दिसून येते.
आपल्या माहेरपणाची भावना व्यक्त करताना कवी म्हणतात, एका विशिष्ट टप्प्यावर तिला तिचे माहेर सुद्धा पोरके ठरते अशा आशयाची स्त्रीचे दुःख मांडणारी कविता अस्वस्थ करून जाते. तिचे दुःख इतके भीषण आहे की ह्या स्त्रिया देवाला विनंती करताना आपल्याला बाईचा जन्म पुन्हा देऊ नको अशी विनंती करताना दिसतात.
असे जेव्हा कवी लिहितात तेव्हा मुलीला तिची आई काम करू देत नाही, तिचे कोडकौतुक करते माहेरा मध्ये तिला काम नसते त्यामुळे सासरी रांजणातील पाणीसुद्धा तिला कोसभर अंतरावर आहे असे वाटू लागते.
तशीही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये स्त्री नवऱ्याला बहाल केलेली असते. नवऱ्याच्या संसारात रममाण झालेली स्त्री नवऱ्यासाठीच आपल आयुष्य मागत असते.
असे म्हणणारी स्त्री महानोरांच्या कवितेमध्ये सतत भेटत राहाते.
याचबरोबर, तितक्याच प्रभावीपणे कवितेमधील अल्लड अवखळ कधी प्रणयोत्सुक, अगदी आपल्या सौंदर्याने वेड लावणारी स्त्री त्यांनी उभी केली आहे.
” नितळ भुऱ्या मांड्यावरती काळे डाग तिचा उभार देह एक जळती आग”
अशा बेधडक बिनधास्त वृत्तीची स्त्री महानोरांच्या कवितेमध्ये दिसते. तर कधी पायात पैंजण मन ओलेचिंब कसा काल धरू गर्भात लेकरू अशा गर्भवती स्त्रीच्या मनाचे स्पंदन महानोरांनी नेमकेपणाने टिपले आहे. स्त्रीचा मनोभाव कवींनी अधोरेखित केलेला आहे.
त्यामुळे दुःख हे चिरंतन आहे ते कोणीही नष्ट करू शकत नाही याची जाणीवही महानोरांनी करून दिली आहे.
तर कधी शिवरायांची गाथा लिहिताना शिवरायांचा पाळणा ना धों महानोर ह्यांच्या लेखणीतून स्फुरलेला आठवतो. आता पाळणा आणि नाव ठेवणे हा स्त्री संस्काराचा अविभाज्य घटक आहे हे वेगळे सांगायला नको.
अशी ही अतिशय विचार करायला लावणारी स्त्री भूमिकेवर कविता महानोरांच्या सूक्ष्म निरीक्षणातून जन्मास आली आहे.
सुख दुःखाच्या झोक्यावर ह्या पुरुषी व्यवस्थेत स्त्री आपले आयुष्य कसे जगते त्याचे नेमके चित्रण कविवर्य ना धों महानोर ह्यांच्या कवितेमधून पाहायला मिळते हे निश्चितपणे म्हणता येते.
‘रानातल्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह ज्याने मराठी कवितेत त्यांना महत्त्वाचं स्थान निर्माण करून दिलं. लोकसाहित्यात्याबद्दलच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं तसेच लोककथा शोधून, एकत्रित करून संग्रहरूपाने त्यांचा परिचय वाचकांसमोर ठेवला. विलक्षण निसर्गप्रेमी असलेल्या महानोर यांनी मुक्तछंदामध्ये विपुल लेखन केले आहे. मराठी साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या स्वरूपात लोकप्रिय झाल्या आहेत.
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.अशा रानकवीस भावपूर्ण श्रद्धांजली.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *