भारतीय संस्कृती ही लोक संस्कृतीच्या विविध घटकांनी नटलेली संस्कृती आहे. परंपरागत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचे प्रचलन होत असल्याने तिच्यामध्ये टिकाऊपणा असलेला दिसतो, तिचा हा टिकाऊ पणा टिकून ठेवण्यात लोकसंस्कृतीच्या उपासकांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी आपल्या लोकरंजनातून, लोकसंस्कृतीचे जतन करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे.
वासुदेवांची परंपरा ही अति प्राचीन असून परंपरेने ती आपल्या लोककलेचे जतन करत आला आहे. वासुदेवांना गावोगावच्या लोकसंस्कृतीत मानाचे पान असलेला महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा अमोघ ठेवीदार या लडिवाळ लोककलावंताचा वर्तमान अढळ मात्र केवळ काही यात्रा- जत्रा सण -उत्सव आणि देऊळ- मंदिरापुरताच उरला आहे ,
हा संस्कृतीचा लोप नसून नीती मूल्यांच्या घसरणीची आरंभावस्था समजावी लागेल ,भारतीय संस्कृतीचा मुलाधार हा मुळातच ग्रामीण संस्कृतीचा असल्याने ग्रामीण भागात वासुदेव पहाटेच्या प्रहारी खेड्यापाड्यापासून- वाड्यावस्ती वर आपल्या मधुर आवाजाने बासरी घेऊन अंगणात येतो, गीतातील आपल्या सरळ साध्या वाक्याने ग्रामीण भागातील लहान -थोरांचे मनोरंजना बरोबरच प्रबोधनही केले जाते. लोक सांस्कृतिक बंध रुजवण्याचा प्रयत्न वासुदेवांच्या लोकगीतातून केला जातो. *वासुदेवाची ऐका कहाणी , जगात नाही राम रे*
*दाम करी काम*
*वेड्या दाम करी काम रे* ,अशाप्रकारे वासुदेवांनी गाणी गाऊन दामाचे महत्व पटवून दिले आहे. वासुदेव ही एक समाजामध्ये प्रबोधन करणारी संस्था आहे. त्यांनी गायलेल्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगितले जाते. त्यामध्ये दैववाद आहे .व्यक्तीने चांगले कर्म करावे त्यामध्ये त्यांना चांगलेच फळ मिळते अशी त्यांची लोकधारणा आहे. आपण चांगले कर्म करीत राहावे बाकीचे सर्व ईश्वरावर सोडून द्यावे अशी वासुदेवांची धारणा आहे.
मराठी संस्कृतीत वासुदेवाची परंपरा अकराशे- बाराशे वर्षांपूर्वीची जुनी असल्याचे पुरावे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते आजतागायत त्यांची परंपरा चालू आहे,भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना फार महत्त्व आहे. सकाळच्या वेळी वासुदेव डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले ,एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी लहान टाळ, कमरेला पावा ,मंजिरी आणि काखेत झोळी,गळ्यात कवड्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे व कपाळावर, कंठावर गंधाचे टिळे असा पोशाख करून सकाळच्या प्रहरी *दान पावलं बाबा दान पावलं। वासुदेव आला हो वासुदेव आला । सकाळच्या पारी हरिनाम बोला* अशा प्रकारे वासुदेवांनी प्रबोधन करत लोकांना उठवण्याचे काम केले .त्यात पांडुरंगावरील अभंग गवळणी ,गात दान मागणारा हा एक लोककलाकार आहे,पूर्वी अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याचे गोष्ट मानली जात असे, कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे, लहान मुले त्यांच्या भोवती गोळा होत असत तो आनंद अतिशय गोड व
अवर्णनीय असे त्यांच्या तोंडून देवादिकांची महती गायली जात असे, पंढरीच्या विठोबाला। सासवडच्या सोपान देवाला । पैठणच्या नाथ महाराजाला। जेजुरीच्या खंडोबाला।।असे नाव घेऊन लोकांना अध्यात्मिक प्रबोधन करत असे, “तुळस ऐसे लावता रोप। पळून जातील सगळे दोष।।असं सहज वाक्य बोलून त्यातून आरोग्याचे मंत्र सांगतो, प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करावी इकडे तिकडे न जाता आपल्या आई-वडिलालाच देव मानावे यासाठी खालील ओळी त्यांनी गायले आहेत
आई बाप घरची काशी । मानुनी त्याचे चरण धरा।।असे मानवी जीवनाला आवश्यक अशा उत्तम प्रकाराच्या विचाराची महती वासुदेव गात असे, भारतीय संस्कृतीच्या खुणा अनेक भटक्या जमातीमध्ये सामावलेले आहेत, पुण्याचे दान मागत सकाळच्या पारी गाव जागवत येई। वासुदेवाची स्वारी हे आता कानाला ऐकू येत नाही. त्यामुळे वासुदेवाची गाणी आता हरवत चालली आहेत ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूच्या गोटातून गुप्त बातम्या व माहिती मिळून आणण्यासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली ,
आता वासुदेवाचे दर्शन दुर्मिळ होत आहे, दान मागणारी परंपरा आता काळाच्या ओघात लोप पावत आहे, आता या जमातीने नवीन व्यवसाय स्वीकारला आहे, दारोदार फिरून दान मागणं आता कमीपणाचे वाटत आहे, त्यामुळे ही परंपरा नष्ट होऊ जाते की काय? अशी भीती निर्माण होत आहे पूर्वीसारखा आता रोज वासुदेव दान मागण्यासाठी अंगणात येत नाही ही लोकपरंपरा जतन करणे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.शासनाने या लोकपरंपरेचे चित्रीकरण करून ठेवावे. या परंपरेचे जतन करावे त्यामुळे येणाऱ्या पिढींना ही लोकपरंपरा दाखवता येईल,
शब्दांकन
*साहित्यिक प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव* अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि नांदेड