परिवर्तनवादी व्यक्तिमत्व: डॉ.हरी नरके अनंतात विलीन

 प्रा.डॉ.हरी रामचंद्र नरके यांचा जन्म 1 जून 1963 मध्ये झाला. ते परिवर्तनवादी लेखक व विचारवंत होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर विपुल लेखन करणारे सुप्रसिद्ध लेखक वक्ते . व अभ्यासू समीक्षक होते.
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते ते महाराष्ट्रातील मागासवर्ग आयोगाचे सदस्य ही होते. महात्मा फुले यांच्या विचारांसाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले.
समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा धारेवर धरले, मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलगू याप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे फार मोठे योगदान आहे.
महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा ज्योतिबा फुले नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्यावत करून प्रकाशित केला त्यांचे प्रा.डॉ.हरी नरके संपादक होते. त्यांची दोन पुस्तके अतिशय गाजली होती. *महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन आणि महात्मा फुले: शोधांच्या नव्या वाटा* त्यांनी आजतागायत 54 पुस्तके मराठी ,हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत आणि त्यांचे संपादन केले आहे .*ओबीसी मध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनाचे विभाजन, मराठा आरक्षण ही पुस्तके प्रसिद्ध होती*, त्यांचे ब्लॉगर आणि फेसबुकवरील लिखाण म्हणजे तरुणांसाठी ऑनलाइन विद्यापीठ होते. या विद्यापीठातील ते ज्ञानाचा वाहता झरा होते,पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते . भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी त्यांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय होता. अनेक विद्यापीठात त्यांनी शोधनिबंध सादर केले. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतील चालते बोलते ते ज्ञानकोश होते. याच आठवड्यात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. पण काळाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली, सर्व स्तरातून अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा तरुणापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. फुले- शाहू -आंबेडकर या महामानवांच्या विचारांचे ते निष्ठावंत पाईक होते. त्यांच्या लेखणीने तळागाळातील समाजामध्ये शैक्षणिक प्रबोधन करण्याचे महान कार्य केले. ओबीसीच्या प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास होता,त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे .अनेक दिवसापासून ते आजारी असल्यामुळे मुंबई येथील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार घेत असताना बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यावेळी ते 60 वर्षाचे होते, तेव्हा अनेक मान्यवरांनी एक चांगला,विचारवंत,साहित्यिक, संशोधक,समीक्षक हरपल्याची भावना शोकसंदेशातून व्यक्त केलेली आहे.

 

शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
संस्थापक अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *