मुखेड -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या सर्वच क्षेत्रात लेखन केले. कादंबरी, कथा, पोवाडे, नाटक,लावणी व अन्य साहित्य प्रकारात त्यांची लेखणी बहरली. त्यांनी मार्सवाद व आंबेडकरवाद या विचारसरणीचा अवलंब करून लेखन केले. त्यांच्या वाट्याला केवळ दीड दिवसाची शाळा आली नंतर त्यांना अनेक पारिश्रमिक कामे करावी लागली. आपल्या साहित्यातून त्यांनी कामगार व शोषितांची दुखे वेशीला टांगली. लालबावटा पथकाच्या माध्यमातून काम केले.त्यांनी लिहिलेली माझी मैना गावावर राहिली ही रचना खूप गाजली. शाहीर अमर शेख व अन्य सहका-यांच्या सोबतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर लेखन केले. तसेच प्रत्यक्ष कार्य केले.रशियन राज्यक्रांतीचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला. त्यांनी स्वतः रशियाला भेट देऊन तेथील शिस्त, स्वच्छता व लोकजीवन जवळून पाहिले व त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.अण्णाभाऊंच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन प्रा.डाॅ. सौ कविता लोहाळे यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आयोजित टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना केले.
या वेळी दुसरे प्रमुख वक्ते प्रा.डाॅ. रामकृष्ण बदने म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे कलंदर कलावंत होते.त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू
भुक हा होता. त्यांनी जे जे आयुष्यात भोगले ते आपल्या साहित्यातून व्यक्त केले. लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. एक शिक्षक, पत्रकार, संपादक, राजकीय नेते म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांच्या कारभारावर कठोर कोरडे ओढले. गीतारहस्य सारखा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. गणेश उत्सव,शिवजयंतीच्या माध्यमातून भारतीय लोकात एकसंघपणा व जागरूकता निर्माण करण्याचे काम केलं. या दोन्ही महापुरुषांची कामे आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करणे हीच त्यांना आदरांजली ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.एस. बाबाराव यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.सूत्रसंचलन प्रा.डाॉ.व्ही.पी. चव्हाण यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. अरुणा ईटकापल्ले यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.