तिला वाटतय तसं जगुदेत की

एक अभिनेत्री आयुष्यभर लांब केस , साडीत असते , वयाच्या पन्नाशीत तिने स्वतःला मेंटेन केलय आणि याच वयात जर तिला वाटलं ,एक दिवस शॉर्ट घालुन तिने फोटो शेअर केले तर बिघडलं कुठे.. लगेच तिला ट्रोल करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला ?? .. तिला वाटतय तसं जगूदेत की..
एखादी गृहीणी जिने आयुष्यभर घर सांभाळलं , आता मुलं मोठी झाल्यावर तिला वाटलं थोडं घराबाहेर पडावं , काही गृप्स जॉईन करावे.. फोटो काढावेत.. गेटटुगेदर करावीत आणि राहिलेले आयुष्य स्वतःसाठी जगावं तर बिघडलं कुठे …तिला हवं तसं जगूदेत की..
वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर तिला वाटतय रील्स करावेत .. आनंद घ्यायला वयाचं बंधन नसतं .. तिला वाटतय केस रंगवावेत , एखादा मित्र असावा.. वेगळा स्पर्श असावा..
ती तिचा संसार आणि काम उत्तम सांभाळत आहे आणि तिचं उत्तम जीवन जगत आहे तर मग तिला टोकण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला ??.. तिचा आनंद पाहुन आपणही आनंदी व्हायला हवं ना.. Live and Let Live..
तिला प्रेम करायचा अधिकार आहे.. तिला तिचा नवरा शोधण्याचं स्वातंत्र्य आहे.. तिला love marriage करायचय मग आपण कोण सांगणार तिला की अरेंज मॅरेज चांगलं असतं.. काहीही चांगलं आणि काहीही वाईट नाही . अरेंज मॅरेज वाल्यांची सुध्दा भांडणं होतात , त्यांचे सुध्दा घटस्फोट होतात मग त्या मुलीला शारिरीक , मानसिक त्रास द्यायचा अधिकार आपल्याला कोणी दिला.. तिलाही स्वातंत्र्य आहे..तिलाही स्वतंत्रपणे विचार करु देत की..
८ मार्च नको.. रोजच नवा विचार हवा.. रोजच नव्याने जगणं हवं.. स्वातंत्र्य हवं स्वैराचार नको.. वाद झाला तरी चालेल पण संवाद हवा.. नव्या गोष्टी स्व्विकारण्याची मानसिकता हवी.. चौकस नजर हवी.. आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागणं हवं.. जगायला फार काही लागतच नाही.. मैत्रीणीनो भरभरुन जगा..

सोनल गोडबोले.. लेखिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *