“ज्या मनगटात बळ,बुद्धि आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनु शकतो” असा संदेश देणा-या इतिहासाच्या कालपटलावर स्त्री व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणा-या होळकर घराण्याच्या “तत्वज्ञानी महाराणी” अहिल्याबाई यांचा १३आॅगस्ट हा स्मृतिदिन.एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन त्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी झाल्या. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले; पण न डगमगता त्यांनी प्रजेची सेवा हे व्रत अंगिकारले.आणि शेवटपर्यंत जे जोपासले.दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे,वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या.तसेच घोड्यावर बसणे,दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे,लढाया करणे,पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले.त्यामुळे अहिल्येची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली.आणि पुढिल कारकीर्दीत हेच प्रशिक्षण त्यांच्या कामी आले.इ.स.१७५४ मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले.आणि वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी त्यांना वैधव्य आले त्यांचे पतिवर निस्मीम प्रेम होते तरी,त्यांनी सती जाण्याचे नाकारून पुरोगामित्वाचा परिचय करुन देत नवा इतिहास रचला.आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही हे कोणाला माहित? परंतु आपण जगलो तर राज्यातील लाखो प्रजाजेचा विकास होईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म ,रूढी ,परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य देत नवा आदर्श निर्माण केला.मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होत्या. त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे.आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी वेळोवेळी दक्षता घेतली.तसेच दिव्यांग,अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले.त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतक-यांना जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या.शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.अहिल्याबाईंची शिवावर फार भक्ती होती.म्हणूनच होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग,गव्हाची लोंबी यांचे छाप असत,पुढे त्यांनी महेश्वर येथेही टांकसाळ सुरू केली.त्या धार्मिकवृत्तीच्या होत्या पण अंधश्रध्दाळू नव्हत्या.न्याय निवाड्यासाठी अधिकाऱ्यांकरिता त्या कायम वेळ देत असत. सर्व बिंदू जोडून न्याय देण्याच्या कर्तव्याची त्यांची जाणीव अत्यंत प्रबळ होती.होळकरांच्या राज्यात नियमबद्ध न्यायाची मूहुर्तमेढ अहिल्याबाईंच्या काळापासून रोवली गेली. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायालये स्थापन करून त्यावर योग्य न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या. पंचायती स्थापन करून त्यांना न्यायदानाचे विस्तृत अधिकार दिले.त्या स्वतः संपूर्ण प्रकरण ऐकून निवाडा करीत असत. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य,हळवा,कनवाळू असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली होती.अहिल्यादेवीनी स्वतः लष्करी शिक्षण घेतले होते. होळकर संस्थानातील संरक्षण क्षेत्रातील लक्षणीय योगदान म्हणजे त्यांनी त्या काळात सैन्यात महिलांची विशेष तुकडी तैनात केली होती.स्त्री पुरुष समानतेला चालना देणारा त्यांचा हा त्या काळातील निर्णय खरच कौतुकास्पद आहे.तसेच उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली.आज या साड्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे.अहिल्याबाईंच्या कार्यकालात महेश्वर हे साहित्य व कलेचे माहेरघर झाले होते. त्यांनी १८व्या शतकातील सर्वोत्कृष्ट असा अहिल्या महाल बांधला.
अहिल्यादेवींनी अडीचशे वर्षांपूर्वी”हुंडाबंदीचा” कायदा करून न्यायाचा वेगळाच वस्तुपाठ शासनव्यवस्थेपुढे घालून दिला. अठराव्या शतकात विधवांचे प्रश्न समजून घेऊन तिला समाजात बरोबरीचे स्थान मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की,जो कोणी चोर,लुटारू,दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह करुन देण्यात येईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून देत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला.अहिल्याबाई उच्चकोटीच्या दानशूर होत्या.काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला,तीर्थस्थळी धर्मशाळा बांधल्या, पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधले. नदीकाठी घाट बांधले आणि गरिबांसाठी अन्नछत्रे उभारलीत. भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे.काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी याचा यात समावेश येतो.अहिल्यादेवी यांना कामगार,व्यापारी, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार कधीच गाजवला नाही.आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता,हे विशेष.अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे अशी मुभा होती. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला,तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधीचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर करत तो पार पाडला.एक कर्तव्यदक्ष शासकाबरोबर त्या कणवाळूपणाचा आणि दयेचा सागर देखिल होत्या.तसेच त्यांना वाचनाची आवड देखिल होती म्हणूनच त्यांचा ग्रंथसंग्रह देखिल फार मोठा आणि दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. स्वतःला राजधर्म कळावा म्हणून अहिल्यादेवींनी अहिल्याकामधेनू नावाचा ग्रंथ विद्वानांनकडून तयार करून घेतला.
इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट” असे म्हटले आहे.याचा आर्थ आहिल्याबाई यांची तुलना त्यांनी रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रीयांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिले जाईल. समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांनी तब्बल तीस वर्षे यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळल्यानंतर १७९५मध्ये आपला देह ठेवला. मुलगी, जावई तसेच अन्य आप्तांच्या वियोगाचे दुःख त्यांना सहन झाले नाही.आज त्यांचा स्मृतिदिन त्यांच्या स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन!!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१