*शिक्षक दिन*
पाच सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. संपूर्ण शिक्षकांसाठी लौकिक अर्थाने प्रेरणा दिन. त्या निमित्त हा शब्दप्रपंच..
शिक्षकाचे समाजातील स्थान अनन्य साधारण आहे. भारतीय परंपरेत आई वडील आणि गुरूंचे स्थान पुजनीय आहे. पूर्वी गुरुकुल शिक्षण पध्दती होती. गुरुगृही राहून ज्ञान संपादन करावे लागत असत. तद्नंतर ब्रिटिश काळात शाळा सुरु झाल्या, अन् शालेय शिक्षण रुढ होवू लागले.
शाळेतशिकवणाऱ्या गुरूंना महत्त्व आले. गुरूजी शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू झाले, समाजात गुरूजींबद्ल कमालीचा आदर निर्माण झाला. गुरूजीं ही ज्ञानदानाचे कार्य नित्तांत श्रद्धा ठेवून करत असत. काळानुरूप प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होऊ लागल्या, शिक्षणाप्रती समाज जागरूक झाला. शालेय शिक्षणात, अभ्यासक्रमात संशोधन होऊन यथोचित बदल होऊ लागले. शिक्षककेंद्रित शिक्षण पध्दती बालकेंद्रित झाली. गुरूजींची जागा आता सरांनी घेतली. शिक्षक आता मुलांचे मार्गदर्शक सहकारी झाले.
आपल्या परंपरेत विचारवंतांनी शिक्षकांना वेळोवेळी अनेक उपमांनी गौरविले आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्तवाची सर्वांगीण जडणघडण करण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. शिक्षक हा शिक्षणक्षेत्रातील मूलभूत घटक आहे. इतके महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिक्षकांनीदेखील स्वतःला काळानुरूप सक्षम बनवले पाहिजे. त्यासाठी अभ्यासाने, ज्ञानाने, अनुभवाने स्वतःला समृध्द करायला हवे. विचार, आचार योग्य दिशादर्शक असायला हवेत. स्वयंमूल्यमापन, स्वयंअध्यन करायला हवे. त्यातून स्वसमृद्धी साधता येते.
आपल्या कार्याचे आपण कसे मोजमाप करायचे? त्यासाठी कोणते निकष लावायचे, व्यक्तीमत्वाचे विविध पैलू कसे समृद्ध करता येतील यासाठी अंतर्मुख होऊन प्रयत्न करायला हवेत. शिक्षक म्हणून आपले व्यक्तिमत्त्व फुलेल, समर्थ होईल. अध्यापन अधिक प्रभावी होईल.
आज अनेक जिल्हे तंत्रस्नेही शिक्षकांनी समृद्ध आहेत. दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. स्वत:चे शैक्षणिक अँप, ब्लॉग, तयार करून वापरत आहेत, केवळ देशातच नाही तर परदेशी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करत आहेत. तंज्ञांचे टेलिकॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन नविन अध्ययन अनुभुती मिळवित आहेत, नित्य नुतन संकल्पना अनुभवांची आदानप्रदान होत आहे. शिक्षक ही स्वतः राबविलेल्या संकल्पना, उपक्रम,प्रकल्प, कृतीचे सादरीकरण व्हाट्सएप, यु-ट्यूब, फेसबुक, द्वारे करत आहेत.
इतर शिक्षक या पासुन प्रेरणा घेत आहेत, यामुळे शिक्षकांच्या आत्मविश्वासाचे बळ वाढत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षकांच्या अध्ययन व अध्यापनाला प्रेरित करत आहेत. नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान या बाबत मार्गदर्शन करत आहेत. पण अजूनही सर्व बाजूंनी बहुतांशी शिक्षक व शिक्षण सक्षम होताना ग्रामीण भागात मात्र भौतिक सुविधा, विद्युत पुरवठा या प्रमुख बाबींच्या उपलब्धतेच्या अभावाने म्हणावी तशी प्रगती साधण्यासाठी आपली व्यवस्था व आपण कुठंतरी कमी पडतोय हे आपल्याला शिक्षक म्हणून प्रशासनाचा भाग म्हणून तितक्याच प्रांजळपणे आणि दिलखुलास भावनेने मान्य करून स्विकारावे लागेल.
शाळा सक्षमीकरणासाठी भौतिक सुविधा, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, देखभाल दुरूस्ती, यासाठी शिक्षकेतर प्रशासन व्यवस्था ग्रामीण पातळीवर राबवावी लागेल. आता क़रोनाच्या महामारीच्या पार्श्र्वभूमी वर किमान हॅन्डवाॅश स्टेशन ,हात धुण्यासाठी साबण,पाणी, शालेय पोषण आहाराची संपूर्ण व्यवस्था बचतगट किंवा तत्सम व्यवस्थांकडे सोपवावी लागेल. ज्याने करून मुख्याध्यापकाला जास्तीत जास्त वेळ शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करता येईल. मुलभुत क्षमता विकसन, स्पर्धात्मक परीक्षा, विविध उपक्रम, प्रकल्प सातत्याने टिकवून ठेवण्यासाठीची यंत्रणा, ग्रंथालय, मैदान, विविध प्रकारचे खेळ, या दृष्टीने कृतीप्रवण रहाण्यास वेळ मिळेल.
विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा वेळ आणि उर्जा विद्यार्थांवर प्रभावी पणे उपयोगात येत नाहीत. सततचे अहवाल, ऑनलाईन नोंदी, निवडणूका, त्यांचे प्रशिक्षण, बी.एल.ओ. म्हणून करावे लागणारे काम, शालेय पोषण आहाराची जबाबदारी आणि सरतेशेवटी हिशोबाची जुळवण यामुळे गुणवत्ता संवर्धनासाठी चा आवश्यक व्यासंग, दृष्टिकोन उपेक्षित राहत आहे. ग्रामीण पातळीवर अजूनही लहान भावंडांना सांभाळण्यासाठी व तत्सम कारणांसाठी विशेष:ता मुलींच्या शालेय शिक्षणात गळती आणि स्थगिती वाटयाला येते.
प्राथमिक शिक्षणाच्या सबलीकरण व सक्षमीकरणाचा पल्ला ग्रामीण पातळीवर बऱ्याच अर्थाने आपणास गाठायचा आहे. शिक्षक, पदवीधर शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची पदे त्वरित भरावी लागतील.
शाळेच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न अनेक अनेक बाजूंनी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य इतर शालेय उपक्रम वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता यासाठी संरक्षकभिंत आवश्यक आहे. गावागावात पाणी टंचाई आहे. या प्रश्नांची सोडवणूक करायला हवी.
काळ दिवसेंदिवस अधिक अत्याधुनिक होत आहे, त्याचे जसे सकारात्मक परिणाम आहेत तसे नकारात्मक परिणाम नक्कीच आहेत. ह्याबदलाचे आव्हान आम्हाला लिलया पेलायला सक्षम बनण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं. नवीन शैक्षणिक संकल्पना, पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान या बाबी अवगत करून घ्याव्या लागतील, शिक्षक म्हणून स्वतः मध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा जाणीवपूर्वक घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असायला हवे. आज जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सुट्टया वगळता चार महिन्यांच्या वर झाले शाळा बंद आहेत,पण शिक्षक स्थानिक पातळीचा विचार करून, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचयाचे, ज्याने करून विद्यार्थांची शिकण्यात खंड पडणार नाही, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत टिकून राहतील.शिक्षक व विद्यार्थी दोहोंत एक संवादबंध तयार होईल, हा कर्तव्यतत्परतेचा प्रेरक झरा तुमच्या माझ्यात अखंड खळखळून वाहता राहिला पाहिजे, त्यात प्रवाहीपण चिरस्थायी असायला हवे.किमान यासाठी प्रयत्नशील असायला हवे.
पुरस्कार, प्रेरणा या पुढे जाऊन मन शांत, गतिशील, प्रेरक, सृजनाचा मागोवा, चैतन्य वृत्ती फुलविणारा बदल घडवून आणण्याचा आत्मविश्वास जागविणारं विशाल बनवायला हवं.
सरतेशेवटी आयुष्यभर केलेल्या कामाचं समाधान मौलिक आहे.
याचे चिरंतन स्मरण करून देणारा हा ………शिक्षक दिन.
*अनिता दाणे-जुंबाड*
कंधार.नांदेड
मो. 7775830740.