लावणी ही शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शाहीर साबळे, आत्माराम पाटील, शाहिर अण्णाभाऊ साठे , शाहिर अमर शेख यासारख्या शाहिरांनी मुंबईचे वर्णन करणाऱ्या लावण्या लिहिल्या,त्यात मुंबईतील बेकारांची समस्या,गिरणी कामगाराचे दुःख,अन्नासाठी होणारे गोरगरीब मुलांचे हाल, निवा-याची गैरसोय, वाढती लोकसंख्या अशा अनेक प्रश्नांना लावणीतून व्यक्त केले.
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी शाहिरांना आश्रय दिला.परशुराम, प्रभाकर,सगन भाऊ,सवाई फंदी,रामा गोंधळी, बाकेराव यांनी लावणी जिवंत ठेवली,मराठी माणसाच्या मनाला सुख मिळवन देण्याचे काम पूर्वीपासूनच लावणीने केले आहे.प्रसिद्ध नृत्यांगना सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाने पद्मश्री हा किताब बहाल केला. होनाजी बाळाने लावणीला प्रकाशाच्या झोतात आणले. परंतु अलीकडे लावणीमध्ये चुकीच्या अदा, हालचाल,अयोग्य हातवारे,अंगप्रदर्शन यामुळे लावणी बदनाम होण्याच्या मार्गावर आहे. ही लावणी आता अश्लील व विकृती कडे जाते की काय ? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.त्यामुळेच हा लेखन प्रपंच………
लवण या शब्दावरून लावण्य गीत वा लावणी शब्द तयार झाला आहे. लावणी हा एक पारंपरिक गायन आणि नृत्य प्रकार आहे. ढोलकी व पेटी या वाद्यांचा लावणी सादर करताना प्रामुख्याने वापर केला जातो. लावणीचा जोश पूर्ण ठेका हे त्याचे वैशिष्ट्ये आहे.ढोलकीच्या तालावर लावणी सादर केली जाते.लावणी हा महाराष्ट्रातील लोकनाट्य शैलीतील तमाशाचा एक प्रकार आहे.लावणी हा तर तमाशाचा आत्मा आहे.लावणीला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. वर्षानुवर्ष ते मराठी रसिकावर राज्य करत आहे. आजही लोकप्रियतेच्या शिखरावर लावणीच आहे, म्हणूनच मराठी संस्कृतीची शान असलेल्या लावणीला लोकप्रिय करण्यात अनेक शाहीर, कलावंत, गायक,गायिका यांचे योगदान फार मोठे आहे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती नाटकांमध्येही लावणी गायली जाते,*नाव गाव कशाला पुसता ,अहो मी आहे कोल्हापूरची* ही सुलोचना चव्हाण यांनी गायलेले लावणी मराठी रसिकांना आजही ठेका धरायला लावते, *पदरावरती जरतारीचा* *पाडाला पिकलाय आंबा* *मला म्हणतात लवंगी मिरची *आई मला नेसव शालू नवा* अशा लावणीने खरोखरच मराठी मनाला आनंद मिळवून देण्याचे काम केले. कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल सुलोचना चव्हाण यांना *पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.* लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसाचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजला जातो. लावणीही संगीत, कविता, नृत्य आणि रंगमंचाने बनलेले असते, लावणी नृत्यशैलीमुळे मराठी लोकनाट्याच्या वाढीस मोठा हातभार लागला आहे.लावणी हे आपल्या प्रियसीच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या स्त्रीने गायलेले प्रेमगीत म्हणून ओळखले जाते. फडाची लावणी आणि बैठकीची लावणी अशी दोन स्वतंत्र प्रकार आहेत. फडाची लावणी नाट्यगृहात तर बैठकीची लावणी खास श्रोत्यासमोर बसलेल्या महिलेला सादर करावयाची असते. महाराष्ट्रात विविध पारंपरिक नृत्य सादर केले जातात. लावणी हे नृत्य सर्वात प्रसिद्ध आहे.नऊ मीटर लांबीची पारंपरिक साडी आणि पायात घुंगरू बांधलेले, सोळा अलंकार परिधान करून शरीराच्या अदा ठेक्यात करणे. अशी वेशभूषा, केशभूषा, गजरा लावून ओठावर लाली भुवया रंगवून नजरेत कामुक भावना ठेवून *या रावजी बसा भावजी* म्हणून प्रेक्षकांना मोहनी टाकते. ढोलकी वर थाप, घुंगराची साथ,रूपवतीचा ठुमका आणि मनाला चटका लावणारे ठसकेबाज शब्द लावणीत असतात. लावणी,लोकनृत्य, समाज, राजकारण, धर्म आणि प्रणय या विषयावर आधारित आहे.सुरुवातीच्या लावणीची रचना ही क्षेत्रवर्णन,भक्तीपर, अध्यात्मिक उपदेशपर होती, पण पुढे मस्तानी बरोबर आलेले नाच गाणे लावणीच्या विकासाला पूरक ठरली. युद्ध करून थकलेल्या योदध्यासाठी मनोरंजन आणि मनोबल वाढविण्याचे काम लावणीने केले .*मला लागली कुणाची उचकी, ह्याची का त्याची* असे म्हणून जीव ओवाळून टाकले. गोंधळ, पोवाडे ,लावणी आणि भारुडे या प्रकारात लावणीने कमाल केली, दोन अर्थाचे शब्द बोलून मनाला निखळ मनोरंजन मिळवून देण्याचे काम लावणी करते. *कस काय पाटील बरं आहे काय*?
सुरेखा पुणेकर ही लावणी सम्राज्ञी एक अक्षरही शिकली नाही तरीही सर्व प्रकारच्या लावण्या ती सादर करते.
*मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, कारभारी दमानं, पिकल्या पानाचा देठ ,की हो हिरवा, इचार काय हाय तुमचा*?अशा एकापेक्षा एक सरस लावण्या गाऊन मराठी संस्कृतीला उंची वर घेऊन जायाचं काम त्यांनी केलेले आहे. पंचवीस वर्षापासून अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे आयोजन केले जाते. आजही तिथे छुमूक छुमूक आवाज घुमतो. पूर्वी लावणीत सौंदर्य दिसायचं! आता ते दिसत नाही. पूर्वी पारंपरिक लावणी होती,आता चित्रपटातील गाण्यावर नृत्य करावे लागते.लावणी सम्राज्ञी म्हणून मंगला बनसोडे यांचे नाव घेतले जाते, त्यांना महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार दिला आहे.तसेच सामाजिक न्याय हा सुद्धा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेला आहे.कांताबाई सातारकर अशा या सर्व लावणी सम्राज्ञीने महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोककला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केलेले आहे,त्यांचा मुलगा सोंगाड्या रघुवीर खेडकर हे बहुआयामी व्यक्तीमत्व असून त्यांना पठ्ठे बापुराव राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथे बहाल करण्यात आला, सतत चार दशके त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केले. लोकांना खळखळून हसवले आहे. तमाशा फड मालक संघटनेचे राज्याचे ते अध्यक्ष आहेत. नटरंग मधील
*अप्सरा आली, मला जाऊ द्या ना घरी* या लावणीने महाराष्ट्राला वेड लावले आहे. मराठी रसिक सुद्धा या लावणीच्या प्रेमात पडू लागले आहेत. ना. धो. महानोर ,राम जोशी, आनंद फंदी यांनीही लावणीला चाल दिली.
,कलगीतुरे सवाल-जवाबाने रंगू लागले.पेशवेच्या काळात लावणीने वेगळा साज घातला होता. दुसऱ्या बाजीरावांनी राज्यरोहणापासून ते राज्यत्यागापर्यंत चैनबाजी आणि कुपात्री दान केले. शिमगा महोत्सव पाच दिवस चालत असे, त्यावेळेस अनेक शाहिरांनी लावणी रचना तयार केली असे सांगता येते,परंतु अली कडच्या काळामध्ये लावणीला उतरती कळा लागली आहे. ग्रामीण भागात
जत्रेमध्ये तमाशा येत असला तरी लोक जास्तीत जास्त तमाशाकडे जात नाहीत. वग ऐकत नाहीत,कारण प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आल्यामुळे हवे ते गाणे व लावणी घरी बसून सुद्धा पाहता येते,त्यामुळे तमाशाचे दिवस सध्या वाईट आले आहेत. खर्च आणि कलाकारांना वेतन यांचा ताळमेळ बसत नाही,असे ऐकण्यास येते, यापुढे कलाकारांना मानधन वाढविले तर या कलेकडे अनेक कलाकार येतील, वार्धक्यात अनेक कलाकारांना उपाशी राहण्याची वेळ येत आहे, ही वास्तविकता आहे.
लावणी जिवंत ठेवायचे असेल, लावणीला पूर्वीचे वैभव आणायचे असेल तर लावणीवर साधकबाधक विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात एखाद्या पाठ ठेवले तर ही कला जिवंत राहील, लावणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे , ही लावणी सातासमुद्रापार गेलेली आहे,तिच्या मुळे मराठी पाऊल पुढे पडत आहे,
त्यामुळे लावणी ही लोकसंस्कृती निखळ मनोरंजन करण्याचे कार्य करते, पुढील पिढी साठी लावणी हा प्रकार समाजामध्ये रूढ होणे महत्त्वाचे आहे.म्हणून प्रत्येक तालुक्यात दरवर्षी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे.
शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड