जेव्हा डोळे भरून येतात.

 

मातृत्वाच्या भूमीमध्ये आई नावाची एक संकल्पना आहे, त्या संकल्पनेमधून मनुष्य नावाचा घटक तयार होतो. जेव्हा आई बाळाला जन्म देते, तिला होणाऱ्या वेदना ती सहन करून आपल्या पोटात असणाऱ्या बाळाला जन्म देते. आईला होणाऱ्या वेदना सहन करण्याची शक्ती तिच्यामध्ये तयार होते.

डोळ्यातून येणाऱ्या अश्रूच्या धारा काही वेळासाठी त्या त्रास देतात, परंतु काही वेळात माझा बाळ जन्माला आला म्हणून आनंदाच्या अश्रू सुद्धा दाटून येतात. बाळ जन्माला घातल्यानंतर चोहीकडे आनंद पेरला जातो, त्या आनंदामध्ये कौटुंबिक वातावरण अतिशय मनशांतीचं प्रतीक बनलेला असतं.

बाळ थोडं-थोडं मोठं व्हायला लागलं तेव्हा त्याला आपण बोबड्या शब्दांमध्ये बोलायला शिकवतो. त्याचा हात धरून आपण त्याला चालायला सुद्धा शिकवतो. पाळण्याची दोरी घेऊन त्याला आपण आपले चांगले संस्कार आणि चांगले विचार देतो. एवढं सर्व करून सुद्धा आज कालच्या दुनियेमध्ये खरोखरच चांगल्या संस्काराची मुलं निघतील का?

हा मात्र प्रत्येक आई-वडिलांना प्रश्न पडत आहे. खरं पाहता माणसाच्या जीवनामध्ये वेदना नावाचा एक आजार अंगामध्ये शिरला आहे. कारण जीवन जगावं कशासाठी ते सुखासाठी जगाव का दुःखामध्येच राहावं अस अजून सुद्धा अनेकांना खरं जीवन समजलं नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि सुख ही संकल्पना नैसर्गिक आहे.

परंतु जरी ती संकल्पना नैसर्गिक असेल तिला कशा प्रकारे हाताळता यावी म्हणून त्यावर उपाययोजना सुद्धा आपणच करू शकतो हे सुद्धा विसरता कामा नये. मानसिक ताण-तणावात जीवन जगणारी माणसं काही काळच जीवन जगू शकतात. म्हणून जीवन जगत असताना जगण्याचा एवढा आनंद घ्यावा की, आनंद सुद्धा आपल्याला कंटाळून जावा कारण मानसिक त्रासामध्ये जीवन जगू लागलो तर नवीन येणारी पिढी आपल्याकडून कोणते संस्कार घेतील हे सुद्धा स्वतःला आपण विचार करावा लागेल.

काळाप्रमाणे जीवन जगावं लागतं प्रत्येकासोबत चांगलंच वागाव लागत, प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं की, आपली मुलं कुठेतरी आपल नाव रोशन करतील, ते करण्यासाठी त्यांना चांगले संस्कार चांगले विचार चांगली संगत आपण खरोखरच त्या गोष्टीची त्यांना ओळख करून देतो का? हे सुद्धा कुठेतरी तपासन गरजेचं असतं. कारण हे जर तपासलं तर आपण खरंच आपल्या मुलाबाळांना योग्य शिकवण देणारी एक संस्कार पेरणारी संस्था बनू शकतो.

पुढे मूलबाळ शिक्षण शिकून जेव्हा मोठी होतात, तेव्हा मात्र आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू दाटून येतात. आजकाल बोटावर मोजण्या इतकी मुलं आहेत की, आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर पुढे असतात, परंतु काही मुलं आई-वडिलांना विसरून त्यांना अनाथ आश्रमामध्ये पाठवण्याची काम आजच्या पिढीमध्ये खूप वेगाने वाढत आहे. अस पाहायला मिळतो.

याची मात्र खूप मोठी खंत आहे. जे काही आपण आपल्या जीवनामध्ये यश संपादन केलं त्याचे खरे हकदार कोण असतील तर ते आपले आई-वडील परंतु आजचा जमाना एवढा स्वार्थी आणि लबाडू निघाला की, तो आपल्या जन्म दिलेल्या आई-वडिलांना त्यांच्या डोळ्यासमोर आनंद पेरण्यापेक्षा दुःखाच्या वेदनेचा डोंगर त्यांच्या समोर ठेवला.

जी मुलं आई-वडिलांवर जीवापाड प्रेम करतात ती मुलं जेव्हा आई वडिलांवर बोलत असताना ओठावरच्या शब्दांनी डोळे ओले करतात, असे शब्द त्यांच्या ओठातून निघतात मायेचा जो आधार असतो जेव्हा ते व्यक्त होतात. तेव्हा या जगामध्ये मुलांना कितीही मोठा सन्मान मिळालेला तो मोठा सन्मान नसून परंतु आई-वडिलांच्या उपकाराची जाण जी माणसं ठेवतात त्या माणसासाठी आपले आई-वडील तेच आपला सन्मान म्हणून जीवन जगताना पाहायला मिळतात.

रस्त्याने चालताना ठेच जरी लागली तरी तेव्हा आपल्या आईची आठवण आपण लगेच काढतो. “आई ग” असा शब्द नकळत आपल्या तोंडातून बाहेर पडतो. पुन्हा एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्याकडे जात असताना भर वेगाने जर आपल्यासमोर मोठा ट्रॅक जर आला तर “बापरे” असा शब्द आपल्या तोंडून निघतो. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा तेव्हा आपल्या आई वडिलांची आठवण मनातून आणि शब्दातून व्यक्त होते.

मग जेव्हा संकट असताना आपण आपल्या आई-वडिलांची आठवण काढतो, मग जेव्हा आपण आनंदामध्ये असतो तेव्हा सुद्धा आपल्या आनंदामध्ये त्यांना सामावून घेणं हे सुद्धा प्रत्येक मुला मुलीचं कर्तव्य आहे. त्यांच्या डोळ्यात येणार पाणी आपल्याला पुसता आलं पाहिजे कारण लहान असताना जेव्हा आपण खाली पडायचं तेव्हा रडायचं परंतु जेव्हा आपण रडत होतो तेव्हा आपले डोळे पुसायला आपला बाप किंवा आई धावत धावत येऊन आपले डोळे पुसून आपले रडणे बंद करायचे.

मग आपण एवढे मोठे होऊन सुद्धा ज्यांनी आपले डोळे पुसले त्यांचे डोळेच भरून येणार नाहीत. असं आपलं वागणं जोपर्यंत बनवणार नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा सुख नावाची संकल्पना कधीच कळणार नाही. कारण जी माणसं आपल्याला कष्टातून घडवली जीवाचं रान करून त्यांनी आपल्या जीवनाच सोनं केलं, मग त्यांचा जर विसर पडला तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही असे सुद्धा मनाला वाटते.

जीवन जगत असताना कधी कधी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. जर का त्या गोष्टी आपण सोडलो नाही तर येणाऱ्या नवीन गोष्टी आपल्याला शिकायला खूप अवघड जातील कारण काही गोष्टींमध्येच आपण गुंतून गेलो असतो, त्यापासून आपल्यावर होणारा विपरीत परिणाम आपल्यालाच धोकादायी बनवतो. याची सुद्धा आपल्या मनाला कल्पना देण्यासाठी सुचक केंद्र म्हणून सावधगिरीने वागण्यासाठी हा मोलाचा संदेश सुद्धा आपल्या आयुष्याला सुंदर जगणे बनवण्याचा मुख्य घटक म्हणून सुद्धा ठरू शकतो.

अनेकांसोबत टिंगल टवाळी करण्यापेक्षा अनेकांचे कौतुक करायला जर आपण शिकलो तर आपण सुद्धा अनेकांच्या नजरेमध्ये ग्रेट आणि या जगामध्ये श्रेष्ठ या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्याला सुद्धा वेळ लागणार नाही. त्याचं कारण ज्या माणसांना आपण जाणून बुजून त्रास देतो जाणून बुजून त्याचा अपमान करतो त्या माणसाकडून आपल्याविषयी भावना कधीच निर्मळ मनाची नसते. म्हणून एखाद्याचं आपल्याला चांगलं करता येत नसेल तर त्याचं वाईट करावं हा कुठेही नियम लिहून ठेवलेला नाही. म्हणून जर आपल्या न कोणतीच गोष्ट सिद्ध होत नसेल तर आपण गप्प बसाव. अनेकांच्या मनात आपल्याविषयी वैर नसावं.

जीवनाचा सारांश लिहीत असताना अगदी ओले चिंब होऊन डोळे भरून येतात कधी दुःखाचे तर कधी सुखाचे काही प्रसंग मनाच्या अवतीभोवती फिरतात मनाला विचलित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनाच्या तंत्रज्ञानावर एवढा मंत्र टाकलेला आहे की, जगणं कितीही कठीण असलं तर त्या जगण्याला मी कठीण मानणार नाही. त्याचं कारण जीवन कठीण व सुखमय दोन्ही गोष्टी मानवापासून निर्मिती झालेल्या गोष्टी आहेत म्हणून कठीण परिस्थितीवर मात करून मी आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करील आणि नुसता प्रयत्न करत नसून तो मिळवण्याचा हक्क सुद्धा माझ्या मनामध्ये मला सातत्यपूर्ण ऊर्जा प्राप्त करून देणारा माझा विश्वास आहे.

म्हणून जगण्यावरच्या गोष्टी चा विचार करताना माणसाच्या आयुष्यातलं दुःख वेचून जाता जाता कधी पेचून गेलं हे अनेकांना कळलच नाही म्हणून तर दुःखाचं आणि सुखाचं मित्रत्व कधी जुळलं नाही, म्हणून जेव्हा डोळे भरून येतात. कधी सुखाने तर कधी दुःखाने त्या आलेल्या वातावरणाला कशाप्रकारे व्यवस्थितरित्या सोबत घेऊन सावरायला आणि आवरायला ज्या ज्या व्यक्तीला जमतं त्या व्यक्तीचं दुःखात आणि सुखात आयुष्यभर मन रमत..

– लेखक :
– युवा साहित्यिक : सोनू दरेगावकर, नांदेड

संपर्क :7507161537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *