ये आझादी झुठी हैं,
देश की जनता भुखी है ! ही अण्णाभाऊंची घोषणा आजच्या स्थीतीला खुपच पुरक असली तरी,याही पलीकडे जाऊन.”ये आझादी झुठी हैं,यहाॅ देश की बहु-बेटी दुखी है” हे सध्याचे वास्तव आहे.स्वातंत्र भारतातील महिला अजूनही पुरुषांच्या दडपशाहीखाली वावरत आहे तिच्यावर होणारे बलात्काराचे प्रमाण वरचेवर वाढतच आहेत.भारतीय राज्यघटना समानतेवर आधारलेली असली तरी,त्यात लिंगभेद, वर्णभेद आणि वर्गभेदाला जागा नसली, तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही. समानता अस्तित्वात नाही हे वास्तव इतके स्पष्ट आहे की ते सिद्ध करून दाखवण्याची गरज मुळात भासणारच नाही. स्त्रियांचे स्थान कुटुंबात आणि पर्यायाने समाजातही अतिशय गौण आहे.महिलांना स्त्रीशक्ती, दुर्गा आणि काय काय उपमा देणाऱ्या याच प्रगत महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्या अजूनही संपुष्टात आली नाही.अगदि जन्माला आलेल्या सहामहिन्याच्या बालीकेपासुन ते वयोवृध्द स्त्रीला बलात्काराला सामोरे जावे लागते हे विदारक सत्य आहे.तसेच बलात्काराची रूपे विविध आहेत.ज्याला धार्मिकतेचा आधार मिळालेला आहे,उदा. देवदासींची प्रथा, देवाला मुली वाहण्याची प्रथा- हा एक प्रकारे बलात्कारच आहे. वेश्याव्यवसायाचे ते दुसरे रूप आहे. या दोन्ही प्रकारांत स्त्रीची होणारी विक्री व तिची फसवणूक यांचा संबंध लैंगिकता व अर्थप्रधानता या दोन गोष्टींशी जोडलेला आहे. वेश्याव्यवसाय हा अनादिकालापासून चालत आला आहे आणि तो चालूच राहिल कारण,या व्यसायाला खतपाणी पुरुष वर्गच घालतो. याला बलात्कार म्हणायचे की ती एक भावनिक पातळीवरची समाजाची गरज म्हणायचे?हा मुद्दा वेगळा.पण वेदना मात्र तिच्याच वाट्याला आजही मुली, स्त्रिया त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेबद्दल उघडपणे बोलत नाहीत. ‘सहनशीलतेची’ संस्कृती जपण्याची सगळी जबाबदारी समाजाने महिलांवर टाकून तीची एकप्रकारे दमकोडीच केली आहे.मॅकिन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेने भारतातील स्त्री स्वातंत्र्याचा आणि स्त्री-पुरुष समानतेचा तपशीलवार अभ्यास केला असून भारतातील महिला मागे पडल्या असल्याचा निष्कर्ष काढला आहे.आणि ही अत्यंत खेदजक बाब आहे.यावर वेळीच दखल घ्यायला हवी.
परक्या देशातील पुरुषकेंद्री राजकीय सत्तेतून स्त्री मुक्त झाली आणि स्वदेशातील पुरुषकेंद्री राजकीय सत्तेने पुन्हा तिच्यावर नियंत्रण आणत अत्याचाराचे सत्र सूरू केले. स्वातंत्र्याने भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले असले तरी त्यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार अभिप्रेत नव्हता,तो विचार डाॅ.बाबासाहेबांनी संविधानाच्या रुपाने भारतीयांच्या मनामनात रुजवला.
खर तर स्वातंत्र्य दिनापूरती सर्वाची राष्ट्रभक्ती उफाळून येते, स्वातंत्र्याचा उमाळा दाटतो, राष्ट्रप्रेमाचा तर अक्षरशः पूरच वाहातो. यत्र तत्र सर्वत्र ‘तिरंगा…देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सत्य असल तरी देशातील महिलांना अजूनही म्हणावे तेवढे स्वातंत्र्य लाभलेले नाही हे अंतिम सत्य आहे.
भारतातील स्त्री स्वातंत्र्य हा विषय विविध प्रकारच्या निष्कर्षांना जन्म देणारा आहे.खरंच ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उंबरठ्यावर उभी असलेली भारतीय स्त्री खरंच स्वतंत्र आहे का? या देशातील प्रत्येक घटक स्वातंत्र्य अनुभवत वा उपभोगत आहे का?तर याचे उत्तर स्पष्टपणे नाही असे येईल.कारण,गेल्या काही महिन्यांपासून घडणाऱ्या घटनांनी भारतातील स्त्री खरंच स्वतंत्र आहे का, हा प्रश्न निर्माण होतो.अजूनही मणिपूरमध्ये धुमसत असलेल्या मतैइ विरुद्ध कुकी या प्रकरणात, कुकी महिलांची विवस्त्र निघालेली धिंड मन सुन्न करणारी होती.मानवतेला काळीमा फासणार प्रकरण असल तरी,देशाच्या जबाबदार व्यक्तींना याचे काही देणे घेणे नाही.कारण ती स्त्री ना?पुरातन काळापासुनच पुरुषांच्या हातच खेळण.क्षणभराच्या कामतृप्तीसाठी तीच आयुष्य उधवस्थ केल जातय,भारताला स्वातंत्र्य मिळाल असल तरी,काही मुठभर महिला सोडल्या तर स्त्रीवर्ग हा आजही पुरुषांच्या गुलामगिरीतच जखडलेला आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये आता लिंग गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. आपली मानसिकता बदलूनच आपण भविष्यात उद्भवणाऱ्या प्रमुख समस्यांना तोंड देऊ शकू. अन्यथा, भविष्यात कोणत्याही आईला तिच्या गर्भातुन मुलगी जन्माला घालण्याची इच्छाच होणार नाही.कारण,वरचेवर स्त्रीयांवर होणारे अत्याचार हे यासाठी एकमेव प्रभावी कारण असेल. हैदराबाद बलात्कार प्रकरण, हिंगणघाट जळीत प्रकरण, बिल्किसबानो असो कींवा एसिड प्रकरण,श्रध्दा,असो की सरस्वती वैद्य प्रकरणातील हि विकृत मानसिकतेची लोक सुडाच्या क्षणिक समाधानासाठी पेटून उठतात आणि हे असे कृत्य करुन स्त्रीयांच्या जीवनाशी खेळतात.
एकतर्फी प्रेम प्रकरनातून मुलींना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते. ॲसिड टाकून चेहरा विद्रूप केला जातो.निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी होऊ नये यासाठी वकिलांची फौज उभी केली जाते हे सभ्यतेचे लक्षण तर मुळीच नाही?स्त्रियांना ख-या आर्थाने माणूस म्हणून जगण्याचा हक्क संविधानाने दिला असला तरी त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.तोपर्यंत भारतात कितीही स्वातंत्र्य दिन साजरे झाले तरी स्त्रियांना खरे स्वातंत्र्य मिळाले असे कसे म्हणता येईल?स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय शोधण्याची खरी गरज आता आहे.अत्याचार, बलात्कार करणारा पुरुषच असला तरी वैर त्याच्यातल्या रानटी प्रवृत्तीशी आहे. हाच पुरुष स्त्रीचा पिता, पती, पुत्र, भाऊ, मित्र अशा विविध नात्यांनी तिच्याशी जोडलेला आहे; म्हणूनच पुरुषांच्या मनामध्ये या नात्यांची जाणीव जागृत करणे हे महत्वाचे ठरते.तेव्हाच स्त्रीयांना मोकळा श्वास घेता येईल व मनाजोगे स्वातंत्र्य उपभोगता येईल.
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१