शिक्षण हाच देव मानणारे :मा.कर्मवीर किशनराव राठोड

(दि.22 आॅगस्ट 2023 रोजी माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांचे वयाच्या 93 व्या वर्षी हैद्राबाद येथे एका खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दि.23 आॅगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कंधार फाटा, कमळेवाडी ता.मुखेड येथे होणार आहे.त्या नीमित्त या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली ही शब्दांजली‌. )

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो कोण्ही प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे शिक्षणाचे महत्त्व विशद केले.त्या पुर्वी महात्मा फुले,राजर्षी शाहु महाराजांनी ही बहुजन उध्दार शिक्षणाशिवाय शक्य नसल्याचे ठामपणे सांगितले. या महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव त्या काळातील समाज परिवर्तनासाठी पेटून उठलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या मनावरती झाला व त्यांनी शैक्षणिक कार्य हाती घेतले व त्याद्वारे समाज विकास करण्याचे ठरवले तोच विचार डोळ्यासमोर ठेवून मुखेड व मराठवाड्यामध्ये नव्हे तर विद्यानिकेतनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक चळवळ उभी करण्याचे काम माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड यांनी केले. त्यांनी शिक्षण हाच देव अशी एक अत्यंत महत्वपूर्ण व्याख्या समाजासमोर ठेवली. ते केवळ व्याख्या करुनच थांबले नाहीत तर ते स्व कृतीने सिध्द केले.तसेच भारतीय संस्कृतीने वेळोवेळी कर्माचे महत्व विशद केले आहे. आपल्या ग्रंथांनी भगवान प्रभू रामचंद्र,भगवान श्रीकृष्ण,महात्मा गौतम बुद्धापासून ते अलीकडच्या संतांपर्यंत कर्म किती महत्वाचे आहे हे त्यांच्या स्वचरित्रातून समाजासमोर ठेवले आहे. ‘ कर्मे ईशु भजावा l’असे ही वर्णन आले आहे. ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी ‘ तया सर्वात्मका ईश्वरा l स्वकर्म कुसुमांचिये वीरा l पूजा केली होय अपारा l तोषालागी ll ‘ या ओवीतून ईश्वराची खरी पूजा ही आपल्या वाट्याला आलेले कर्म प्रामाणिकपणे केल्यासच घडते असे सांगितले आहे. पंढरपूर पासून हाकेच्या अंतरावर अरण नावाच्या गावात राहणारे संत सावतामाळी हे पंढरपूरला विठोबाच्या वारीला किंवा दर्शनाला न जाता शेतातील ‘कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll’ म्हणून कर्मरत राहतात.संत गोरोबाकाका,संत सेना न्हाव्यांपासून,संतसेवालाल महाराजांपर्यंत जवळ जवळ सर्व संत कर्माला महत्त्व देताना दिसतात. खरा पंडित कोण? तर ज्याला खूप पाठांतर आहे तो नाही तर ‘ य: क्रियावान स् पंडित:’ असे म्हटले गेले आहे. महापुरुषांनी देखील आपल्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्व कर्माला दिले आहे. म्हणूनच ते अजरामर झाले. तोच वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून कर्माला अत्याधिक महत्व देणारे व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर किशनराव राठोड होत.

अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा जन्म वर्ताळा तांडा ता.मुखेड जि.नांदेड सारख्या मागासलेल्या भागात २९ एप्रिल १९३१ रोजी माता गंगाबाई व पिता मक्काजी राठोड यांच्या पोटी सत्ता,संपत्ती व प्रतिष्ठे पासून हजारो वर्ष दूर असणाऱ्या बहुजन समाजातील बंजारा या समाजात झाला.घरात अठरा विश्व दारिद्र्य. समाजात शिक्षणाविषयी असलेली अनास्था, अज्ञान,अंधश्रद्धा या गोष्टी जन्मताच त्यांच्यापुढे आ- वासून उभ्या होत्या. अशा अवस्थेतही वडिलांनी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला. ते कसेबसे प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकले. पण त्यांचा पिंड हा मुळातच समाजसुधारणेचा. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना शेतमजुरी,किराणा दुकानातील काम, आडती वरील मुनीमकी नंतर एक वर्ष शाळामास्तर असी कामे करावी लागली.
त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सोलापूर येथील त्यांनी ऐकलेले भाषण व कै. वसंतराव नाईक यांचे मुंबई येथील मार्गदर्शन.तेथून त्यांनी भटक्या विमुक्त व मागासवर्गीयांच्या सेवेसाठी जीवन वाहून घेण्याचा संकल्प केला. त्यातूनच १९५६ ला त्यांनी मागासवर्गीय मुलांसाठी नेहरू वसतीगृह सुरु केले व खऱ्या अर्थाने बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणयज्ञ सुरू केला. मुलांना जेवु घालण्यासाठी पैसे कमी पडल्यास प्रसंगी त्यांना आपली पत्नी कै.चंद्राबाई राठोड यांच्या गळ्यातील मंगळसूत्र विकावे लागले. दलितांच्या मुलांना शिकविण्यासाठी गावातून माधुकरी मागून आणावी लागली. अनेक वेळा त्यांनी गोळा केलेले धान्य ही हा दलितांच्या मुलांना शिकवतो म्हणून गावकऱ्यांनी भरुन नेले.पण ते डगमगले नाहीत.कार्य करने सोडले नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी वसतिगृह चळवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये राबविली. तसीच चळवळ मराठवाड्यामध्ये कर्मवीरांनी राबविली. फुलसिंग नाईक वसतिगृहाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना वसतिगृहाद्वारे शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यासाठी त्यांनी मराठवाड्यातील पहिली आश्रमशाळा वसंतनगर ता. मुखेड येथे सुरू केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर महाराष्ट्रात आश्रम शाळेत शिकणाऱ्या भटक्या-विमुक्तांच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल) असावे असे त्यांना वाटू लागले व त्या धर्तीवर त्यांनी राज्यातील पहिले विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल )भटक्या-विमुक्तांच्या मुलांसाठी सन १९९६ ला कमळेवाडी ता. मुखेड जि. नांदेड येथे सूरु केले.

 

त्या विद्यानिकेतनचा पहिला प्रभारी प्राचार्य होण्याचा सन्मान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. तेव्हापासून या पब्लिक स्कूलमध्ये ६०० पेक्षा अधिकची मुले मुली शिक्षण घेत आहेत.इथे शिक्षण घेऊन अनेक मुले-मुली देशभर विविध पदावर कार्यरत आहेत.याकामी त्यांना त्यांचे छोटे बंधू कै.आ. गोविंदराव राठोड यांचे नेहमीच सहकार्य लाभले. हे दोघे बंधू म्हणजे आधुनिक काळातील रामलक्ष्मणच. विमुक्त जाती सेवा समितीची स्थापना १९६० ला केली.या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणुन कार्य करतात.आज मितीला या संस्थेच्या प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत जवळ जवळ २० पेक्षा जास्तीच्या शाखा त्यांनी उभ्या केल्या आहेत.आज या शाखांमध्ये ५०० पेक्षा अधिक कर्मचारी व हजारों विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवन चरित्रावरती दिसून येतो. आणि म्हणुन त्यांच्या सततच्या वागण्यात व बोलण्यात हे पहावयास मिळते. ते नेहमी आपल्या मार्गदर्शनात सांगतात ‘विद्येविना मती गेली’ हे म.फुले यांचे विचार व ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ‘ किंवा ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हे बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार तर छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात एका दलिताच्या कांबळे नावाच्या व्यक्तीला महत्त्वाच्या ठिकाणी हॉटेल टाकायला लावून तेथे चहा घेत हाच वारसा कर्मवीरांच्या बाबतीत ही दिसतो. ते ही समाजाच्या दृष्टीने उपेक्षित असणा-यांसाठी जास्तीचा वेळ देतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे मुखेड तालुक्यातील होंडाळा ता.मुखेड गावचा एक फासेपारधी समाजाचा मुलगा ज्याला त्यांनी आपल्या वसतिगृहात शिक्षण देऊन पुढे एम.बी.बी.एस.बनविले.तो सरकारी सेवेत डॉक्टर झाला व त्याच्या लग्नाची पत्रिका मिळाल्याबरोबर कर्मवीरांनी त्या दिवशी अन्य शंभर लोकांच्या लग्नपत्रिका बाजूला ठेवून त्याच्या लग्नाला हजेरी लावली व आशिर्वाद दिला.हा राजर्षी शाहूं महाराजांच्या विचारांचा वारसा दिसतो.
राजकारणात कै.वसंतरावजी नाईक,कै. सुधाकररावजी नाईक व कै. डॉ. शंकररावजी चव्हाण साहेबांच्या सहकार्याने त्यांनी विधानपरिषदेवर १२ वर्ष कार्य केले.या काळात त्यांनी गरीबांच्या उन्नतीसाठी अनेक योजना आणल्या.भ्रष्टाचाराचा भुंगा त्यांच्याजवळ कधी आलाच नाही. राजकारणात राहून ही स्वच्छ चारित्र्य सांभाळले म्हणून आजही ते या क्षेत्राबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसतात.
त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून व त्यांच्याशी झालेल्या चर्चेवरून असे लक्षात येते की या माणसाला समाजपरिवर्तनाची अतीओढ आहे. म्हणून त्यांचे विस्ताराने विचार समजून घेतले पाहिजेत.माझ्या लेखी ईश्वर हा मंदिरात नसून तो शिक्षणात आहे. शिक्षण हेच ईश्वराचे स्वरूप असून तुम्हाला भक्तीच करावयाची असेल तर विद्यार्थ्यांना मनातून शिकवणे ही शिक्षकांसाठी भक्ती व पूजा आहे. तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास हीच भक्ती आहे. बाकी सर्व थोतांड आहे.आता आपला उद्धार करण्यासाठी कोणीही ईश्वर अवतार घेईल या भ्रामक कल्पनेत रमू नका. आपला उद्धार हा बाबा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणच करणार आहे. जो शिक्षणाला चुकला तो खऱ्या जीवनाला मुकला असे म्हणण्याची वेळ येणार आहे. तेंव्हा शिक्षणावर जिवापाड प्रेम करा,नशिबावर विश्वास ठेवू नका.सटवी वगैरे काही खरे नाही. आपले नशीब आपणच घडवत असतो. सटवीने लिहिल्याने काही होत नाही. मी स्वतः प्रतिकूल परिस्थितीत जन्मलो. सभोवताली दारिद्र्य, अज्ञान अंधश्रद्धा हे पावलो पावली होते.त्यामुळे मला जरी जास्त शिकता आले नाही तरी उपेक्षित समाजातील मुले शिकली पाहिजेत हा विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण संस्था उभ्या केल्या.प्रसंगी डोक्यावर पाणी, दळण घेऊन विद्यार्थ्यांना जेवु घातले. अनेक संकटे आली पण घाबरलो नाही. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा ध्यास कायम ठेवला. तसे तुम्ही खचू नका, शिक्षणाची कास सोडू नका.

कोणतेही काम निष्ठेने व मनातून केले की यश हमखास येते. मी शेतीत, राजकारणात,समाजकारणात शैक्षणिक क्षेत्रात जे काम केले ते मनातून केले.आजही माझा शेतीवर जीव आहे.मला शेतात गेल्या शिवाय करमत नाही, तसे आपल्यालाही आपली कर्तव्य पार पाडताना माझ्यासारखी तळमळ असली पाहिजे. जिथून आपण मोठे झालो त्यांना विसरू नका, आपणास मोठे करणारे आई-वडील हेच आपले देव आहेत. त्यांची मनापासून सेवा करा.

 

ज्या महापुरुषांनी आपल्याला माणूसपण मिळवून दिले ते म. फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे अनुयायी बना. हाच विचार आपल्याला तारणार आहे. आपला खरा ग्रंथ संविधान हाच आहे.त्याची वेळोवेळी पारायणे करा. मंदिर उभारणे, भंडारे करणे,यापेक्षा शिक्षणातून ज्ञानाची मंदिरे उभारा,ज्ञानदानाचा भंडारा करा. बकऱ्यांचा बळी देण्यापेक्षा,अंधश्रद्धेचा बळी द्या.जगात सर्वात पवित्र काय आहे?असे जर मला कोणी विचारले तर मी म्हणेन शिक्षण. ते देणे सर्वात मोठे पवित्र काम आहे. ज्यांना शिकण्याची संधी प्राप्त झाली आहे त्यांनी त्याचे सोने केले पाहिजे.संधी पुन्हा पुन्हा येत नसते.हे आयुष्य एकदा संपले की पुन्हा येणे नाही. तेंव्हा काहीतरी चांगले करून हे जग सोडले पाहिजे.आपल्या मृत्यूनंतर आपल्या कार्याचा दिवा सतत तेवत राहिला पाहिजे. माझ्या लेखी माणसाने किती पैसा कमावला, किती बंगले बांधले यापेक्षा तो माणूस किती गरिबांच्या कामी आला हे महत्त्वाचे आहे.मी केवळ गरिबांना घाबरतो. मला श्रीमंतांची भीती वाटत नाही.जो रंजल्या गांजल्याची सेवा करतो तो माझ्या दृष्टीने श्रीमंत आहे.आज सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतोय.हे वाचले ऐकले की मन सुन्न होते. त्यामुळे देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल तर आपण भ्रष्टाचार रुपी भस्मासुराचा नायनाट केला पाहिजे.

 

व्यसनापासून दूर राहा, ते आपले वाटोळे करते.आज शिक्षणात सर्वत्र मुलीच आघाडीवर दिसतात ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.मुलींना शिकवा त्यामुळे घरात व समाजात चांगुलपणात लवकर वाढ होते. स्वतःसाठी सगळेच जगतात पण समाजासाठी ही जगायला शिकले पाहिजे. त्यासाठी सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात राहा पण तिथे मनापासून काम करा,समाधान निश्चित लाभते. कष्टाच्या, मेहनतीच्या भाकरीची चव अमृताहून गोड असते. जी खाल्ल्याने समाधानाची झोप येते. भ्रष्ट मार्गाने पकव्वान ही कडू लागते.

भोगापेक्षा त्याग करायला शिका तो , महत्त्वाचा असतो.महात्मा गांधींनी त्याग केला म्हणून ते इतके मोठे झाले. आता प्रत्येकाला भोग हवा आहे. गाडी, बंगला हवा आहे.लवकर श्रीमंत होण्याची,काही न करता पैसा कमविण्याची सवय वाढली आहे. हे समाजासाठी घातक आहे.श्रमातून मिळालेला पैसा व प्रतिष्ठा ही चिरंतन टिकणारी असते. ती टिकवा.आपला देश व राज्य संतांनी व महापुरुषांनी जन्म घेऊन पुनीत केला आहे.त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवा. चुकीच्या मार्गाने मोठे होण्याचे धंदे सोडून द्या. दररोज झोपण्यापूर्वी आपण दिवसभरात काय काम केले ते आठवा म्हणजे कळेल की तुम्ही दररोज कसे काम करत आहात. चांगुलपणा पुढे रेटा व वाईटपणाचा त्याग करा.यामुळे आपण सर्वच मोठे होऊ शकतो.माती,माता व मातृभूमीसाठी जगायला शिका असे कितीतरी विचार त्यांच्याकडून मिळतात.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय जीवन ज्योती पुरस्कार’ मिळाला आहे.तसेच मुखेड नगर परिषदेनेही त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘मुखेड भूषण’ हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले आहे. तसेच नांदेड येथे त्यांना महात्मा फुले पुरस्काराने गौरविले आहे.एवढेच नाही तर त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विमुक्त जाती सेवा समितीत वर्षभर अवर्णनीय असे कार्यक्रम घेण्यात आले. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी ‘विमुक्त ‘ नावाची पुस्तिका ही काढण्यात आली. त्यांच्या अमृत महोत्सवाला तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण साहेब,चार कुलगुरू व राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दहा हजारापेक्षा जास्तीचे चाहते उपस्थित होते.त्यांच्या एकंदर कार्यावर ग्रामीण महाविद्यालयातील माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.अशोक भवरे यांनी संशोधन करुन विद्यावाचस्पती (पी-एच.डी.)ही पदवी प्राप्त केली आहे. असे हे सर्वव्यापी व्यक्तिमत्व आहे.त्यांचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून साजरा केला जातो.त्यांच्या ८०व्या वाढदिवसाला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन व नेत्रचिकित्सा शिबीर व मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला होता.नंतरच्या वाढदिवसाला भव्य रक्तदान शिबिर घेऊन १००० हजारपेक्षा जास्त रक्त बाटल्यांचे संकलन केले होते. त्यानंतर जलजागरण परिषद व अन्य अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतले गेले आहेत.
त्यांच्या अपुर्ण आशा आकांक्षांना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचे काम त्यांची पुढची पीढी करते आहे. माजी नगराध्यक्ष व वि.जा.से.समिती वसंतनगरचे सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड, मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ.तुषारभाऊ राठोड व माजी जि. प.सदस्य संतोषभाऊ राठोड हे हा वसा आणि वारसा पुढे चालविण्याचे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
शेवटी त्यांना सत्तेतून गरिबांचा विकास अपेक्षित असतो, भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मिती हे त्यांचे ध्येय आहे. सर्वांना वीज,पाणी,आरोग्य,शिक्षण, शेतकऱ्यांसाठी सिंचन ह्या त्यांच्या अपेक्षा होत्या.

 

जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिन दलितांचे कल्याण, भटक्या विमुक्तांचा विकास, शेतकऱ्यांची उन्नती,हा त्यांचा ध्यास होता.मुलींच्या शिक्षणाची संख्या वाढावी ही त्यांची मोठी भूक होती.त्यांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते.माझ्या प्रत्येक सूखदुखात ते आवर्जून उपस्थित राहायचे.इतके वय झालेले असतानाही परवा जूनमध्ये आमच्या महाविद्यालयात नॅक बेंगलोरद्वारे पाठवलेल्या टीम सोबत सतत दोन दिवस त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांची शिक्षणाप्रती असणारी निष्ठा ठळकपणे जाणवत होती.ते आज शरीराने जरी आपल्यातुन गेले असले तरी ते त्यांच्या विचाराने आज ही आपल्यात आहेत.आज आपण त्यांच्या विचारानुरूप आचरण करण्याचा संकल्प करूयात.हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.साहेबांना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

 

या दुखातून सावरण्याचे बळ राठोड परिवारास ईश्वर देवो.साहेबांच्या आत्म्यास शांती लाभो.

 

प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड.
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *