ऋषितुल्य व्यक्तिमत्व :कर्मवीर किशनराव राठोड

नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मा. विधान परिषद सदस्य. विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगरचे संस्थापक अध्यक्ष: कर्मवीर किशनराव राठोड साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील माणसापर्यंत शिक्षण देण्यासाठी शिका, संघटित व्हा,आणि संघर्ष करा. असा मंत्र दिला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून अहोरात्र कष्ट करणारे कर्मवीर किशनराव राठोड यांनी शैक्षणिक कार्य करीत असतानाच काळाने त्यांच्या वर 22 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे वयाच्या 93 व्या वर्षी झडप घातली, त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याला वाहिलेली ही आदरांजली……….
तो काळ अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा होता. तरीही समाज परिवर्तनासाठी व शिक्षण प्रत्येकाला मिळावे म्हणून मुखेड तालुक्यातील डोंगराळ भागात वसंतनगर येथे त्यांनी शैक्षणिक संस्था काढून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिले. शिक्षणातून परिवर्तन होते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. *जनसेवा हीच ईश्वर सेवा* समजून आजतागायत त्यांनी लाखो विद्यार्थी विमुक्त जाती सेवा समिती संस्थेमधून शिक्षण घेऊन परदेशामध्ये गेले.
ही किमया सर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व कर्मवीर किशनराव राठोडसाहेबांची आहे, ज्यांना शिक्षण कळाले त्यांनी समाज घडविला. संत गाडगे महाराजांनी लोकांना शिक्षण शिका म्हटले, तसेच कर्मवीर किशनराव राठोड यांनी जी संस्था उभारली त्या संस्थेत आज हजारो शिक्षक तयार झाले ज्या समाजाला शिक्षण माहित नव्हते, त्यांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले, जे झोपले होते त्यांना जागी केले, जे जागी होते त्यांना उठविले, जे उठले होते त्यांना चालण्यास शिकविले, जे चालत होते त्यांना पळण्यास शिकविले, या संस्थेत माझ्यासारखे शेकडो प्राध्यापक
,प्राचार्य, शिक्षक साहित्यिक, लेखक, कवी, डॉक्टर.वकील. इजिंनियर सैनिक, आणि राजकीय क्षेत्रातील नेते तयार झाले म्हणूनच त्यांना ऋषितुल्य समाजसुधारक, समाजसेवक म्हणावे वाटते, मराठवाड्यातील पहिले वस्तीगृह त्यांनी वसंतनगर येथे काढले कमळेवाडी येथे विद्यानिकेतनची स्थापना केली तिथे प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांच्यासारखे विद्वान प्राचार्यांची नियुक्ती केली. त्यामुळे दुधात साखर व साखरेत केशर मिळाल्याचा आनंद तालुक्यातील लोकांना झाला. मराठवाड्यात शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचविण्याचे काम कर्मवीर किसनराव राठोड साहेबांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे आज हजारो चुली पेटल्या आहेत. त्यांच्या या वस्तीगृहातून अनेक विद्यार्थी वैद्यकीय सेवेत रुजू झाले. त्यांच्या परिवारातील सर्वच लोक लोकांच्या सेवेसाठी जन्मले आहेत. असे मला वाटते. कुटुंबातील सर्वच सदस्य उच्चविद्या
विभूषवित आहेत. त्यांच्या संस्थेतील कर्मचारी हे त्यांना प्रत्यक्ष देव मानत असत, कधीच कोणाला ते ब्र केले नाहीत ,त्यांचा स्वभाव सर्वांशी मिळून घेणे होता. जवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची बळ त्यांनी दिले, आपल्या जीवनात त्यांनी कोणाला कधीही धोका दिला नाही, प्रत्येक गरीब मुलांवर त्यांचे लक्ष होते, म्हणून ते ऋषितुल्य वाटतात. त्यांनी नेहमी ज्ञानदानाचा भंडारा केला, व्यसनापासून तरुणांना दूर राहण्याचे आवाहन केले. अंधश्रद्धा तर त्यांनी कधीच पाळल्या नाहीत. मेहनतीने कमावलेले कधीही गोड लागते असे ते म्हणत असत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन नवी दिल्ली येथे त्यांचा *राष्ट्रीय जीवन ज्योती पुरस्कार* देऊन सन्मान केला मुखेड नगर परिषदेने त्यांना मुखेड भूषण किताब बहाल केला. त्यांच्याच महाविद्यालयातील प्रा. डॉ. अशोक भवरे यांनी संशोधन करून त्यांच्या कार्यावर विद्यावाचस्पती पदवी पी.एच, डी प्राप्त केली डॉ. तात्या लहाने यांनी 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचा लोखाजोखा समाजासमोर मांडला..तेव्हा अनेकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.त्यांच्या घरातील पुढची पिढी सुद्धा गोरगरिबांना घेऊन चालत आहे. कै. गोविंदराव राठोड यांनी ही संस्थेसाठी अपार कष्ट केले. आमदार म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले होते. आज डॉ. तुषार राठोड आमदार म्हणून कार्यरत आहेत मा. नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड . जिल्हा परिषद मा, सदस्य संतोष भाऊ राठोड हे सर्व पुढील वारसा चालवत आहेत *दया करणे जे पुत्रासी। तेच दास आणि दासी* याप्रमाणे त्यांनी जीवन जगले. शेतकरी, कष्टकरी ,कामकरी,दीन दुबळे -मागास या सर्वांना घेऊन चालणारे हे एक धैर्यवान निधड्या छातीचा, बलदंड शरीरयष्टिचा, वाघाच्या काळजाचा, मेहनती पोलादी पुरुष आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व 22 ऑगस्ट रोजी काळाच्या पडद्याआड गेले. आपण सर्वांनी त्यांच्या विचाराच्या दिशेने वाटचाल करूयात, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर राठोड कुटुंबास देवो.

*साहित्यिक: बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष विठूमाऊली प्रतिष्ठान ,खैरकावाडी ता. मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *