असाही पाऊस – भाग २

 

शाळा सुटल्याची घंटा झाल्याबरोबर अन्या सुसाट वेगाने पळत सुटला,तो थेट चौकात भाजी विकत बसलेल्या आईसमोरच जाऊन थांबला…रोजच्याप्रमाणेच त्याची आई चौकात,फुटपाथवर,एका बाजुला गोणपाटावर भाज्यांच्या ढिगामागे बसलेली…दप्तर आईपाशी टाकुन त्याने पटकन फडक्यात गुंडाळलेली भाकरी तिथच पटकरुन खाल्ली व नळावर पाणी पिऊन,हातात भाजीच्या चार गड्ड्या घेऊन तो सिग्नलच्या गाड्यांच्या मधे मधे जाऊन विकु लागला….जेमतेम तासभर झाला असेल नसेल तोच आभाळ भरुन आलं…कडुझार तोंडाने अन्याने एकदा आभाळाकडे पाहीलं, अजुनही मोठ्या असलेल्या भाज्यांच्या ढिगाकडे पाहीलं व तो अजुनच बेंबीच्या देठापासुन ओरडत भाज्या विकु लागला……पण….
काही वेळातच त्याचा दुष्मन तुफान वेगाने बरसु लागला…आईपाशी जाऊन सगळ्या भाज्या गोळा करुन,तो ढिगारा आडोशाला नेईपर्यंत तो लहानगा जीव दमला….चौकातला गजरे विकणारा राजु पण हातातले गजरे सावरत त्यांच्या बाजुला येऊन टेकला…..
अन्या आणी राजु, त्यांचं संध्याकाळचं जेवण व रोजीरोटी हिरावणार्‍या त्या पाऊस नामक सैतानाकडे डोळे वटारुन पाहात राहीले…..काही चुकार थेंब त्या दोघांच्याही डोळ्यातुन ओघळुन रस्त्यावरच्या पाण्यातुन वाहात, गटारात जाऊन कधी मिसळले,ते त्यांनाही कळले नाही……
होय…पाऊस असाही असतो…..शत्रुसारखा……तोंडचा घास पळवणार्‍या चोरासारखा….

 

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *