मुंबई, दि. २३:
चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेसाठी इस्रोचे अभिनंदन करताना हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, भारताची ही कामगिरी देशातच नाही तर जगभरात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. इस्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचे हे फळ आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दूरदृष्टीतून डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंतराळ संशोधनाला चालना दिली. त्यातूनच पुढे इस्रोची स्थापना झाली. या संस्थेने आजवर अनेक चढउतार सहन केले. काही मोहिमांमध्ये अपयशही आले. मात्र खचून न जाता आज इस्रोने इतिहास रचला आहे.