चांदोबा चांदोबा भागलास का,
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?
लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा, तूपरोटी खाऊन जा……
अशी विनवणी कधी काळी तुम्ही सर्वांनीच चंद्राला केली होती. हो, ना त्याच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला मी चंद्रयान 3 बोलतोय!
अगदी बरोबर. हो तोच मी तुमच्या चांदोबाला भेटायला आणि बोलायला आलो आहे.आज योग आलाय,
मी चंद्रयान-3 अंतराळयान भारतीय वेळेनुसार 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने झेपावलो. मला आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाहून प्रक्षेपणानंतर चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागणार होते.
आजच्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी मी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत माझ्या सारखं कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही.
तुलना करायची झाल्यास,याआधी माझे मोठे भाऊ चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2 मोहिमेला आले होते.
इस्रोच्या मोहिमांमध्ये PSLV रॉकेट्स अवकाशात झेपावतात. या रॉकेट्सचं काम असतं उपग्रहांना एका ठराविक अंतरावर नेऊन एका कक्षेत सोडून देणं. इस्रोने याच गोफणच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कमीत कमी इंधन खर्च करून चंद्र गाठण्याचा मार्ग आखला. थेट चंद्राच्या दिशेने सरळ प्रवास करण्याऐवजी मला हळूहळू आपली कक्षा पृथ्वीपासून दूर वाढवत जातं.एका ठराविक अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यावर चंद्राच्या दिशेने जाऊन मग चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतं चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करतं. कमी शक्ती आणि इंधनाचा वापर करून पण जास्त लांबचा प्रवास करून चंद्रावर पोहोचलो.
माझ्या मधला रोव्हर आणि लँडर हे याच ऑर्बिटरवरून नियंत्रित केले जात होतं. जेव्हा हे लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा त्यातून रोव्हर नावाचं एक वाहन बाहेर पडेल. हे रोव्हर चंद्रावरची माती आणि इतर गोष्टी गोळा करण्याचं काम करेल.
अश्या या लांबच्या प्रवासासाठी अनेक बारीकसारीक तांत्रिक बाबी वेळोवेळी पृथ्वीवरून तपासल्या जात होते.
चंद्र म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक. आठवा तुमचं बालपण! रोज संध्याकाळी तुम्ही चंद्राला बघत-बघत जेवायचा. चंद्रा शिवाय तुमची एकही संध्याकाळ किंवा रात्र गेली नसेल ना? त्याच्याशी तुम्ही ‘मामाचं नातंच जोडलंत’. म्हणूनच मी तुमच्या मामाला भेटायला इथपर्यंत आलो आहे. दृष्ट लागू नये म्हणून आईने लावलेलं गालबोट चंद्र अभिमानाने गालावर घेऊन आकाशात मिरवतो. पौर्णिमेच्या चंद्राची शान तर काही औरच असते. पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल आकाशात दिसतो. तेव्हा तो प्रकाशही भरपूर देतो.
“वाऽऽ! म्हणे नलराजाच्या घोड्याच्या उधळल्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग म्हणजेच चंद्रावरचा डाग !”
मुळात चंद्राचा रंग पिवळा नसून स्वच्छ पांढरा, रुपेरी आहे.
चंद्र लांबून तुमच्याशी बोलायचा ना, तेच ठीक होतं.
अति परिचयात अवज्ञा होते हेच खरं. त्यामुळेच तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नील आर्मस्ट्रग हा पहिला चंद्रावर पाऊल टाकणारा मानव. त्याच्यामुळेच मानवाला पहिल्यांदा जवळून चंद्राला बघण्याचा योग आला.
चंद्रावर मानव राहू शकणार नाही, हे सत्य जगासमोर आलं आहे. नाहीतर आजपर्यंत तुम्ही चंद्रावर वर कब्जा करून मोठी वसाहत निर्माण केली असती. मोठ-मोठ्या पर्यटन संस्थांनी ‘चला चंद्रावर …’ म्हणून सहली आयोजित केल्या असत्या. मानवा, तू बुद्धिमान आहेस खरा; पण त्यापेक्षा स्वार्थी खूप आहेस. पण लक्षात ठेव.
चंद्रापुढे तू खूप थिटा आहेस.चंद्राच्या दर्शनाची लालसा तू कधीच शमवू शकणार नाहीस. तुला चंद्राचं गुणगान करावंच लागेल. त्याच्या कलानेच तुला वागावं लागेल.अरे मानवा, तू त्याच्या अंगरख्याची चिंता करू नकोस. त्याच्यातील बदल तुला आनंददायी ठरोत, हीच इच्छा !
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211