Post Views: 58
नांदेड – वृक्षारोपण करुन त्याकडे नंतर दुर्लक्ष करून चालणार नाही तर वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. ही भावना विद्यार्थ्यांत रुजत असतांना झाडांबद्दल माया निर्माण झाली की त्यांचा योग्य सांभाळ मुलांकडून होतो हे जवळा देशमुख येथील विद्यार्थ्यांमुळे अनुभवायला मिळाले. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आपणच लागवड केलेल्या झाडांना जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलींनी झाडांना भाऊ मानत राख्या बांधल्या. मुलींनी दोन दिवस आधी शाळेतच तयार केलेल्या राख्या झाडांना बांधून वृक्षरक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, हैदर शेख, मनिषा गच्चे आदींची उपस्थिती होती.
भारतीय संस्कृतीत वडाची पूजा केली जाते. धार्मिक पूजनातही विविध वृक्षांना स्थान दिले जाते. यावर्षी जवळा देशमुख येथील विद्यार्थीनींनी पहिल्यांदाच झाडांना राख्या बांधून सण साजरा केला. यात तिसरी ते सातवीच्या वर्गातील
अनुष्का झिंझाडे, दीपाली गोडबोले, निशा गोडबोले, अक्षरा शिंदे, कावेरी गच्चे, सुप्रिया गच्चे, गीतांजली गोडबोले, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, किरण कदम, तेजल शिखरे, मयुरी गोडबोले, अनन्या टिमके, सुहानी कांबळे, शाश्वती गच्चे, विद्या गोडबोले, शालीनी हटकर, सपना हटकर, शीतल पाईक आदींनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या राख्या मुलींनी स्वतःच बनविल्या होत्या.
यापूर्वी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यासह
मुक्त वृक्षवाचनालय, झाडांवरची पक्ष्यांसाठी पाणपोई, वृक्षांचे वाढदिवस, वृक्षतोडीवर आधारित नाटीका आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. अशा अनेक उपक्रमांमुळे वृक्षांबद्दलचे प्रेम वृद्धिंगत होत असून या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, केंद्रप्रमुख नागोराव डोंगरे, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे, सरपंच कमलताई शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, आनंद गोडबोले, मिलिंद गोडबोले, पांडूरंग गच्चे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
चौकट…
मुलींनी घरीच बनविल्या राख्या
जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राखी कशी बनवावी याचे प्रशिक्षण संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार आणि मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी मुलींना दिले. कागद, दोरा, मणी, रंगीत कापड, चमकी, गोंडे आदींच्या सहाय्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार राख्या तयार केल्या. तसेच भावांना आणि झाडांना बांधून त्यांच्याविषयी बंधुत्वाची प्रेमभावना आणि मंगल कामना व्यक्त करतांना मुलींना कमालीचा आनंद झाला होता. मुलींनी बनविलेल्या या राख्या परिसरात कुतुहलाचा विषय बनला आहे.