त्याच्या आयुष्यातील त्याने लावलेलं पहिलं वहिलं झाड आणि तेही पिंपळाचं आणि त्याला साक्षीदार मी..
जेव्हा तो त्या झाडापाशी उभं राहुन त्याकडे निरखुन पहात होता आणि मी त्याच्या निरागसतेकडे कुतुहलाने पहात होते तिथेच माझ्यातील लेखिका गुणगुणायला लागली होती…माझा लिखाणाचा बाज मुळातच रोमॅन्टिक पण अनेक विषय हाताळताना तो कधीतरी हरवुन जातो आणि पुन्हा नव्याने पिंपळपान मनात जाळी बनवायला सुरुवात करते..
त्याला म्हटलं , काय पहातोस रे झाडात ?? तर तो म्हणाला ,माझी प्रेयसी पहातोय गं.. भरपुर ऑक्सिजन देणारं हे झाड , त्याची मुळं खोलवर रुजवुन अनेक वर्षे उभं रहाणारं हे झाड.. भगवान श्रीकृष्णानी याच झाडाखाली बसुन भगवदगीतेचे ज्ञान दिले होते… माझी प्रेयसी मला अगदी अशीच दिसते..निस्वार्थी प्रेम करणारी.. कसलीही अपेक्षा नाही.. अगदी त्या जीर्ण झालेल्या पानाच्या जाळीलाही स्पर्श केल्यावर त्यातुन सुर्याची किरणे आत यावीत आणि त्यांनी मला कवेत घ्यावं ..
प्रेयसीच्या कमनीय बांध्यावर तिच्या कंबरेवर अलगद ओठानी चुंबावं , तिच्या सौंदर्याची तारीफ करताना माझ्या शब्दानीही मोहरुन जावं, तिच्या पाठीवर माझे ओठ फिरताना तिने शहारुन जावं आणि त्याचवेळी ढगानी धरणीवर येउन थैमान घालावं .. गाडीच्या काचेतुन हळुच डोकावताना पिंपळ पानाने माझ्याकडे पाहुन हसावं .. आणि गाडीच्या काचेवर दोघांच्या गरम श्वासानी वाफ येउन आतील हितगुज फक्त त्या पिंपळ पानानीच टिपावी यासारखं भाग्य ते काय असावं ना..
हे सगळं तो मनातल्या मनात झाडाकडे पहात बोलत होता आणि माझ्या कर्णपटलावर त्याचे मुके बोल आदळत होते..
थोड्या वेळात तो माझ्या समोर येउन उभा राहिला आणि म्हणाला , सोनल अगं कुठे हरवलीस ??..खरं तर त्याच्या मनातील प्रेयसी मी माझ्या हृदयावर कोरत होते कारण माझ्या सुंदर लेखणीतुन तिला माझ्या वाचकांपर्यंत पोचवायची होती..
खरं तर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत असताना राधा ही अशीच वेडी होत असेल ना.. आनंद दुसऱ्याचा असो पण तो आपल्याला अचुक टिपता यायलाच हवा आणि त्याच्या आनंदात आपल्याला सहभागीही होता यायला हवं..
मी काहीना काही कारणाने सतत निसर्गात जाते आणि मग जे काही सुचतं ते अगदी जाळीदार आणि दाणेदार असतं.. कायमच प्रेमात रहा .. अगदी माझ्यासारखं..
सोनल गोडबोले