नांदेड ;
ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या शुभारंभाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा काँग्रेस कार्यसमितीवर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार देखील होणार आहे.
शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिलेल्या माहितीनुसार, खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारीहून शुभारंभ झाला होता. त्या ऐतिहासिक यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी सायंकाळी ५ वाजता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून पदयात्रा काढली जाईल. सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृहात एका जाहीर सभेच्या माध्यमातून यात्रेचा समारोप होणार आहे. याच सभेत काँग्रेस पक्षात सर्वोच्च मानल्या गेलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर नुकतेच नियुक्त झालेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार केला जाईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, ईश्वरराव भोसीकर, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर, डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केले आहे.