चुलीची ओलसर झालेली लाकडे भरभरून धूर काढत होती, खोकत खोकत जुन्या मळलेल्या वर्तमानपत्राचे दोन फाटलेले कागद त्या चुलीमध्ये कोंबली आणि एक मोठा श्वास घेऊन जोरदार फुंकर मारली तेव्हा कुठे त्या लाकडांना जाळ लागला.
जगण्याला आधार म्हणून ती अंगणवाडीत काम करायची त्यातून मिळणारी पगार नामक तुटपुंजी रक्कम गेले तीन महिने मिळाली नव्हती. त्यामुळे तिने रोजच्या ओळखीच्या शेजारील लोकांकडून थोडे पैसे उधारीने नेहमीप्रमाणे घेतले होते.
आजचा दिवस थोडा वेगळा होता. उद्या तीन महिन्यांनी तीचा मुलगा घरी येणार होती. त्याला काम, पार्टी, सेलिब्रेशन, मित्र, बायको-मुले, सासुरवाडी यांच्यामधून वेळ मिळतंच नाही. त्यामुळे तिला येण्यासाठी वेळ कसाबसा काढावा लागतो हेसुद्धा तिला ठाऊक होते. चुलीने वणव्याचे रूप घेतले असं तिला समजलं आणि ती वाकलेली कंबर थोडी सरळ करून उभी राहिली. तिच्या उंचीएवढ्या भिंतीला लावलेल्या लाकडी फळीवरून ॲल्युमिनिअमचा टोप (पातेले) खाली उतरवून तिने ते चुलीवर ठेवले. बाहेर मात्र तीन दिवस सलग पावसानं कहर केला होता. बारा ते पंधरा वर्षांपूर्वी जी एकटी पंचवीस लोकांचे जेवण करीत होती तिला आज एक भांडे उचलताना भरपूर त्रास होत होता.
चुलीच्या बाजूलाच ठेवलेल्या स्टीलच्या कळशीमधील पाणी तिने त्या पातेल्यामध्ये भरले आणि चुलीमध्ये अजून तीन ओलसर लाकडे कोंबली. थोड्या वेळाने पाणी खळखळन उकळू लागले.
आज संध्याकाळी शेजारच्या मुलाला दोन रुपये खाऊ खाण्यासाठी देऊन तिने दुकानामधून त्याच्याकडून तूप, गूळ आणि वेलची या वस्तू आणून घेतल्या होत्या. तसेच गेला आठवडा आजूबाजूच्या तिच्या समवयस्क बायकांसोबत गप्पा-गोष्टी करत तिने खलबत्त्यात जाडसर गहु भरडून तयार केला होता.
कागदात बांधून आणलेला गूळ आणि तूप तिने त्या उकळत्या पाण्यामध्ये सोडले. वेलची कुटण्यासाठी जागा नव्हती म्हणून तिने बाजूचा बसण्याचा लाकडी पाट काढला तो पदराने हळुवार पुसला आणि वेलची सोलून त्यामधील दाणे त्यावर ठेवून लोखंडी फुकणीवर फिरवली. वेलचीची पूड त्या गरम पाण्यामध्ये सोडली आणि एका पळीने ते पाणी ढवळत राहिली.
थोड्यावेळाने पळीने हातावर दोन थेंब घेऊन चाखून पाहिले आणि तिला जाणवले की, आपला वर्षानुवर्षांचा अंदाज अजूनपर्यंत चुकलेला नाही. त्यानंतरच तिने त्यामध्ये चवीपुरते मीठ घातले आणि खलबत्त्यात भरडलेला जाडसर गहु त्यामध्ये टाकला. एका हातात कापडी पोतेरे आणि दुसऱ्या हातामध्ये कलथा असे धरून त्या पातेल्याला पकडून सर्व मिश्रण एकजीव करीत राहिली. अंदाजे पंधरा मिनिटांनी तिने पुन्हा ते मिश्रण चाखून पाहिले आणि सर्व योग्य आहे असे समजून तोंडात हम्मम्म असे पुटपुटत डोके हलवले. तिच्या आसपासच्या केळीची झाडांची काही हिरवीगार पाने आणली होती. ती तिने संध्याकाळीच स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवली होती. चुलीवर ठेवलेले ते मिश्रण एकजीव होऊन थोडे शिजले होते त्यामुळे तिने पुन्हा कलथा घेऊन ते मिश्रण पातेल्यात पुन्हा फिरवून दाबले आणि वरचा थर सपाट केला. त्यानंतर चुलीमधील काही निखारे त्या पानांवर ठेवले. चुलीमधील लाकडे बाहेर काढली. थोडे विस्तव चुलीत ठेवून आग थंड केली. कारण तिचा मुलगा कोणत्याही क्षणी येणार होता. नंतर चुल पेटवायला त्रास होऊ नये म्हणून तीने ज्वाला मंद केली.त्यानंतर सर्व आवरून ती छतातून टपटप गळणार्या धारेकडं बघत शांततेत झोपी गेली. सकाळी लवकर म्हणजे चार वाजताच्या सुमारास उठून ती थेट चुलीपाशी पोहचली. तेव्हा तिने पाहिले की, आग विझली होती.
त्या ओलसर लाकडाची चुल पेटवण्यासाठी तीने नाही तसा खटाटोप सुरू केला. बाहेरचा पाऊस मंद झाला होता पण तिच्या नजरा रस्त्यावर सारखा पाहारा देतं होत्या. तीने
तोंड वगैरे धुतले. अंघोळ केली. दारासमोरच्या तुळशीला सकाळीच एक तांब्या पाणी घालून नमस्कार केला. त्यानंतर तिने ते पातेले चुलीवर चढवून केकसारखा दिसणारा तो ‘गव्हाचा शिरा’ सर्व बाजूनी शिजला होता. घरातील या गोड पदार्थवर त्या वेळी सर्व भावंडांची त्यावर उडी पडत असे. हे सारं तिला सरसर डोळ्यांसमोर आठवलं. काही वेळा नंतर चिखलातून कोणीतरी वाट काढतं, पावसात भिजत घराकडं येताना दिसलं.
तिचा मुलगाच असलं म्हणून ही चटकन त्याच्या स्वागतासाठी उठली. पण एक पोर तिच्या दारात आलेलं तिला दिसलं. त्यांनी तिला काहीतरी सांगितल्याप्रमाणे पुटपुटला आणि तीच्या आईच्या हातामध्ये शंभर-पाचशे रुपडे ठेवून तो परतला… तीने त्या पोराला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि गव्हाच्या शिर्यातला लहानसा भाग तीने घाईघाईने बाजूला काढला. स्वच्छ धुतलेल्या नारळाच्या पानांवर गव्हाचा शिरा टाकून तिने तो कापडी पिशवीमध्ये ठेवून त्याच्या हाती दिला. तो पोरं आनंदान अन् आप्रूकिन तिच्या कडं बघून तीला हात दाखवून निघून गेला हवेसारखा. काल पासूनच सारं तिला सरसर डोळ्यांसमोर आठवलं. तिने डोळ्यांवर , तोंडावरून सुका पदर फिरवला आणि झालेला ओला पदर कंबरेला बांधून ती चुलीपाशी बसलेली. मुलांने घेऊन दिलेला लँडलाइन फोन तितक्याच वाजला…फोन बराच वेळ तसाच वाजतच राहिला, तसा तिच्या डोळ्यातील पाऊस दाटून येत होता. कारण तिला कळलं होतं तिच्या मुलाच न येण्याचं कारण…न येण्यासाठी अनेक कारणे देता येऊ शकतात पण आपल्या माणसाकडं येण्यासाठी त्याला एक कारणं देता आलं नसेल का? या विचारानंच तिचा ऊर दाटून डोळ्यातला पाऊस कोसळून धबधबाया लागला.
कोणीतरी म्हणेल,
“आई शिरा छान झाला होता!”अश्या या शब्दांचा पाऊस तिच्या कानावर कोसळून पडावा म्हणून ती आस लावून बसली होती.
रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211