▪️राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार
▪️जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्हाभर मुलांची तपासणी करून केली निवड
नांदेड, दि. 11 :- राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील शुन्य ते 18 वयोगटातील मुलांची विशेष मोहिम राबवून तपासणी करण्यात आली. यासाठी 45 वैद्यकिय आरोग्य तपासणी पथके कार्यारत ठेवून संपूर्ण जिल्ह्यातून शहरी व ग्रामीण भागातील 22 मुलांची निवड करण्यात आली. ही निवड करतांना ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या मुलांची टुडी ईको चाचणी करण्यासाठी विशेष शिबीर घेण्यात आले. यातून त्वरीत उपचार व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 22 मुलांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी आज आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथे विशेष वाहनाने रवाना केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या समवेत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हणुमंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत शून्य ते 18 या वयोगटातील बालकांची 4डी म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.
या मुलांची तपासणी ही आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. शंतनू गोमासे आणि रुग्णालयाचे डॉ. प्रतिक गडकरी ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडली. नांदेड जिल्ह्यातील एकूण 82 बालकांची तपासणी करण्यात आली. जन्मजात ह्रदयरोग असलेल्या बालकांसाठी या शस्त्रक्रियेचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊन भविष्यात ही मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागतात. जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, व्यवस्थापक विठ्ठल तावडे, श्रीमती अनिता चव्हाण, गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.