मी काहीही करत असले तरी हरे कृष्ण हरे कृष्ण हा महामंत्र उच्चारत असते.. काल संध्याकाळी व्यायाम झाल्यावर एका बाकड्यावर बसले असताना शेजारी काही लहान मुले खेळत होती.. त्यांची निरागसता न्याहाळत असताना त्यातील एक मुलगी ( मुलं कामगारांची असावीत ) माझ्यापाशी आली आणि म्हणाली ,, दिदी तुझे घड्याळ मस्त आहे.. मी म्हटलं हवय का तुला ??.. ती नको म्हणाली आणि खेळायला गेली..
मी महामंत्र पुटपुटत होते , तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली , दिदी तु काय बोलतेस .?? .. मी म्हटलं, मी देवाचं नाव घेतेय.. त्यावेळी त्या निरागस नजरेत अनेक प्रश्न दिसत होते .. पण तिला काय विचारावं किवा काय बोलावं कळत नसावं.. ती हसली आणि म्हणाली , तु देवाचं नाव का घेतेस ??..मी घेत नाही ..
तिला बाकड्यावर बसवलं आणि म्हटलं , बाळा तुला देवाचं नाव घ्यायची गरजच नाही कारण तु खुप गोड आहेस..इतक्या लहान मुलीला काय सांगावं मला कळेना ..
तिला म्हटलं , तु थोडी मोठी झालीस की देव कोण तुला समजेल आणि मग तु त्याचं नाव घ्यायला सुरुवात कर आता तु फक्त खेळ .. तिने मान हलवली पण तिचं समाधान झालच नाही.. मग तिला म्हटलं , तुला खेळायचं नाही का ??.. तर म्हणाली , मला तुझे बुट आवड्ले .. तिला म्हटलं , तुझी चप्पल पण छान आहे .. तिला बिचारलंस , चप्पल कोणी दिली ??.. त्यावर ती म्हणाली ,माझ्या आयने आणली आणि तुझे बाबा काय करतात ??त्यावर तो निरागस जीव बोलला , तात्याला देवाने त्याच्याकडे नेलं आणि तिने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिले ना ते इथे मी उतरवूच शकत नाही. दिदी ज्या देवाने आमच्या तात्याला नेलं त्याचं तु नाव घेतेस का ??… माझे डोळे पाणावले कारण माझ्याकडे याचं उत्तरच नव्हतं… त्या देवाला सांग ना तात्याना आमच्याकडे परत पाठवायला.. मला काहीही सुचेना .. मी नक्की सांगेन असं म्हणून मी तिथुन निघाले.. गेटपाशी गेल्यावर मागे वळुन पाहिलं तर ती मुलान्मधे खेळायला लागली.. ती सगळं दोन मिनीटात विसरली आणि माझं काय ??.. मी जितकी स्ट्रॉंग तितकीच हळवी.. घरी जायला उजवीकडे जायचं की डावीकडे हेही कळेना… कर्म , विधीलिखीत ,नशीब हे किती जड शब्द आहेत आणि त्याचे अर्थ तर त्याहूनही जड. मग त्या निष्पाप जीवांचं काय ??.. माझ्यातील लेखिका निशब्द झाली.. एका साध्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं नाही ..
दिदी तु देवाचे नाव का घेतेस ??… अश्या अनेक अनाथ मुलांना हा प्रश्न पडत असेल आणि याचं उत्तर कोणीही देउ शकत नाही याची खंत आयुष्यभर राहिल.. माझ्या पन्नशीतही माझे आई बाबा सासु सासरे सगळे आहेत यासारखं भाग्य ते काय असावं ना.. नाव फेम पैसा संपत्ती हे यापुढे किती फिकं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं आणि त्या निरागसतेपुढे की किती लहान आहे हेही जाणवलं..
हरे कृष्ण..
सोनल गोडबोले