@गणपती बाप्पा झाले डाऊनलोड.

 

आपले गणपती बाप्पा पृथ्वीतलावर दहा दिवसांसाठी डाऊनलोड होणार आहेत या विचारानेच मन प्रफुल्लित होते. एखाद्या चांगल्या ॲप्सचे पिक्चर जसे कार्य करते अगदी तसेच दहा दिवसांसाठी पृथ्वीतलावर गणपती‌ बाप्पा डाउनलोड झाल्यावर सर्व लोक त्यांच्यासाठी एका फीचर्स प्रमाणे उत्तम उत्तम कामं करण्यासाठी एकत्र येतात.
नुकतेच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे म्हणून आपण जोरदार तयारीला लागतो. केवढी उत्सुकता ! आपल्या घरात दहा दिवसांसाठी एक छोटासा पाहूणा येणार म्हणून तयारी चाललेली असते.

 

मोबाईल बॉक्स मध्ये एखादे ॲप डाऊनलोड केल्यानंतर एखादी जागा व्यापते तसेच गणपती बाप्पा सुद्धा आपल्या घरात डाऊनलोड झाल्यावर तो कोपरा ,ती जागा व्यापून घेतो. घर छोटे असो वा मोठे असो ती आपल्या घरातील नुसतीच जागा नाही तर संपूर्ण घर मंत्रमुग्ध करून टाकणारा कोपरा असतो. एखाद्या मोबाईल मधील एखादे फीचर्स आपल्याला खूप आवडत असते. तसेच, आता घरातील ती जागा भिंतीचा कोपरा म्हणून राहीलेला नसतो. तर ती जागा आपल्या श्रद्धेचे , भाव-भावनांशी जुळलेली जागा असते…

 

अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करून तिथे गणपतीला विराजमान करतो.
टेबलावर, चौरंगावर किंवा पाटावर दोन्ही बाजूंनी झिरझिरीत पडदे सोडले जातात. घुगूरमाळा सोडल्या जातात. गणपतीला बसवण्यासाठी सुंदर मखराची सजावट केली जाते. गणपतीला बसवायला मऊ-मऊ मखमलीचे आसन केले जाते. त्याच्या मुकोटाच्या पाठीमागे विद्यूतप्रवाहाद्वारे सुशोभित कागदांचे सुदर्शन चक्र सतत फिरते ठेवले जाते. विविध तरेचा वापर करून सर्वत्र देखावा नेत्रदीपक केला जातो.

 

वेगवेगळ्या रंगाचे चकचकीत कागद लावून चकाकत्या झुरमुळया गणपतीच्या दोन्ही बाजूला सोडल्या जातात.
आप-आपल्या सवडीने व आवडीने मनाजोगे हवं ते सुशोभीकरण करत असतो.
मनोरंजनासाठी गणपतींच्या गाण्याची गीते चालू ठेवली जातात.त्यामुळे सर्व घरभर धार्मिक वातावरण तयार होते. अशा प्रकारे घरा-घरात , गल्ली-बोळात,अगदी सर्वत्र गणपती बाप्पा
डाउनलोड होतात.

 

बर्याच मंडळांमध्ये स्पर्धात्मक विविध प्रकारचे देखावे तयार केले जातात.ते पाहून मन अचंबित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळे ही नाटक, कलापथक, वगनाट्य, चित्रकला,खेळ, विविध स्पर्धेचे आयोजन करतात. यांचे पुर्वनियोजन केले जाते आणि तशी तयारी ही ठेवली जाते.

 

गणपती ११ दिवसांचा असल्याने सर्व दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते. निरनिराळे कलाकार आपले कलागुण दाखवत असल्याने त्यांच्या गुणांना वाव मिळत असतो. रोज नवनवीन प्रसाद असल्याने बालचमू आरतीच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने हजेरी लावतात. सर्व गरीब-श्रीमंत एकजुटीने इथे गणरायाची ओवाळणी करण्यात दंग असतात. इथे उच्च, निच हा भेद विसरुन एकजूटीने गणेशोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच, विषमता नष्ट होण्यास मदत होते. दुसऱ्यांची कुरापत न काढता एकत्र येतात. व आपल्याच घरचे कार्य असल्याप्रमाणे एकजूटीने सर्व कामे पार पाडतात.
११ व्या दिवशी महाप्रसाद, बँडपथक व लेझीमच्या खणखणाटात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमुन निघतो व गणपतीबाप्पाला निरोप दिला जातो.

 

 

या मिरवणूकीत सर्व आबालवृद्ध सामील करून असंख्य अश्या फीचर्सची सेवा करवून 11व्या दिवशी गणराया Uninstall म्हणजेच विसर्जित केला जातो.

सौ.रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *