नाशिक – नाशिक येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंच म्हणजे लिहित्या सर्जक महिलांसाठी हक्काचा मंच आहे. अनेक क्षेत्रातील लिहित्या महिला ह्या मंचाच्या सदस्य आहेत. ह्या सर्व महिला एकत्रित येऊन आपल्या अभिव्यक्ती, आनंद आणि प्रबोधन ह्यासाठी स्वखर्चाने दरवर्षी हे साहित्यसंमेलन घेत असतात.
यंदाही साहित्यसखीचे पाचवे एकदिवसीय राज्य महिला साहित्य संमेलन रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पद्मश्री नारायण सुर्वे वाचनालय सभागृह, सिंहस्थ नगर,सिडको, नाशिक येथे सकाळी १० ते सायं. ५ ह्या वेळेत संपन्न होणार असल्याचे नुकतेच साहित्यसखीच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव व सचिव अलका कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे.
सदर राज्य महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ.प्रज्ञा दया पवार(ठाणे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार ह्या असणार आहेत. डॉ. प्रज्ञा पवार ह्या पाक्षिक ‘परिवर्तनाचा वाटसरू’च्या संपादक आहेत शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती आणि मराठी संशोधन मंडळ या संस्थांच्या सदस्या आहेत.
विविध साहित्य प्रकारातील त्यांच्या १३ साहित्यकृती प्रकाशित असून विविध मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. सन २००९ मध्ये मॉस्को, रशिया येथे झालेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून त्या कविसंमेलनात सहभागी झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय साहित्यिक ख्याती असलेल्या साहित्यिक डॉ. प्रज्ञा पवार साहित्य संमेलन अध्यक्षा म्हणून लाभणे ही महत्वाची बाब आहे.
दरवर्षी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून महिला साहित्यिक ह्या संमेलनात सहभाग नोंदवीत असतात.
सदर संमेलनात डॉ. प्रतिभा जाधव एकपात्री प्रयोग सादर करतील. कवयित्री संमेलनात सहभागी होण्यासाठी तसेच संमेलनात महिला साहित्यिकांना पुस्तकप्रकाशन करायचे असल्यास पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी अलका कुलकर्णी (सचिव, साहित्यसखी मंच)-९८५०२५३३५१ यांचेशी संपर्क साधावा. दि. १५ ऑक्टोबर २०२३ पूर्वी नोंदणीची मुदत असून वेळेवर कुणाचीही नोंदणी घेतली जाणार नाही.
नाशिकनगरीत खास महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या ह्या सोहळ्यात जरुर सहभागी व्हा असे आवाहन डॉ.प्रतिभा जाधव, अलका कुलकर्णी व मिलन खोहर यांनी केले आहे.