आधुनिक रूपातील गणपतीची सुमारे ५०० हून जास्त भावमुद्रा ;ॲड. दिलीप ठाकूर यांच्या घरी संग्रह

नांदेड ; प्रतिनिधी

नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या एसटी कर्मचारी गणेश मंडळास गेल्या ३४ वर्षापासून श्री ची मूर्ती देणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी असलेल्या संग्रहात क्रिकेट खेळणाऱ्या गणपतीपासून ते ट्रॅव्हल बॅग घेवून प्रवासाला जाणा-या आधुनिक रूपातील गणपतीची सुमारे ५०० हून जास्त भावमुद्राची विविध आकर्षक रूपे आहेत.

समाजसेवेचा अविरत वसा घेतलेल्या दिलीप ठाकूर यांच्याकडील गणेशाच्या विविध मूर्तींचा हा संग्रह गेल्या तीन दशकांचा आकर्षक मूर्तींचा येथे खजिनाच आहे. दोन गणेश मूर्तींपासून सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आज पाचशेपेक्षा जास्त मूर्तीपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या ३४ वर्षांत त्यांनी देश-विदेशांतून वैशिष्ट्यपूर्ण अशा गणेशमूर्ती गोळा केल्या करुन पावित्र्य आणि प्रेरणा देणारा हा अप्रतिम खजिना दिलीपभाऊंनी जपला आहे.
दिलीप ठाकूर यांचा पर्यटन हा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी देश-विदेशातील अनेक ठिकाणांहून मूर्ती आणलेल्या आहेत. या संग्रहातील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे संग्रहातील कोणतीच मूर्ती एकसारखी नाही. प्रत्येक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी असावी यावर कटाक्षाने त्यांनी लक्ष दिले आहे. दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, शिसम, संगमरवर, व्हाइट मेटल, काच ,मिश्रधातू, गनमेटल, बोनचायना, चांदी, चंदनाचे लाकूड, ब्राँझधातू
श्रीफळ, सुपारी, लाकूड, दोरी,अशा विविध वस्तूंचा वापर करत गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
नटराज गणेश, वाद्यवृंदरूपी, रुद्राक्षरूपी,
भगवान विष्णू रूपातील गणेश, कृष्णरूपी, हनुमानरूपी, नारदरूपी, भगवान शंकररूपी, मुषकारूढ, अन्य वाहनांवरील गणेश, रथारूढ शेषारूढ, रामरूप, बटूवेशातील गणराय अशा विविध मुद्रा व वेगवेगळ्या प्रकारातील “वक्रतुंड” मनाला सहज भावतात. काही मूर्त्या तर त्यांनी वर्णनानुसार खास कलाकारांकडून तयार करवून घेतल्या आहेत. गणेशमूर्तींच्या या संग्रहातील उभा, आडवा, बसलेला, नृत्य करणारा असे अनेक गणेश आपले मन मोहून घेतात. याशिवाय काही दुर्मिळ प्राचीन नाण्यांमधील बाप्पांच्या विलोभनीय वैविध्यपूर्ण भावमुद्राही मंत्रमुग्ध करतात. स्फटिक , पोवळे ,नीलमणी, हिरवे मीनावर्क डिझाइन, दशावतारी, तुळशी वृंदावन, फुलदाण्या, काळया उभ्या दगडाचा मोठा गणपती, ,उंदरावर उभा अष्टभूज, हस्तिदंतातून कोरलेला, चंदनातील उभा, चारही दिशांना तोंड असलेला छत्रीधारी, मंदारवृक्षाच्या मुळाचा , सुपारीवर कोरलेला, उभा राहून नृत्य करणारा,  बासरीवादक, डफवादक, पाय पसरून रुसून बसलेला, शेषशायी नागारूढ, वीणावादक,कालियामर्दन, दुतोंडी नेपाळी नाचाच्या वेशात , एकाच पायावर नाचणारा, मडक्यावरील गणपती,  वाजंत्रीवाला, तीन तोंडाचा, भरतनाट्यममुद्रा, विविध वाद्य वाजवणारे गणपती, सुटाबुटातील गणपती, मोबाईल धारक गणपती,  लॅपटॉप चालणारा गणपती, फोन करणारा गणपती, घसरगुंडी खेळणारा गणपती, लहान   उंदीराला पायावर घेऊन झोके देणारा गणपती, बाहुल्यांचा गणपती, धान्या पासून बनवलेला गणपती, रुचकीच्या झाडापासून बनविलेला गणपती, बसलेला गणपती, उभा असलेला गणपती, झोपलेला गणपती, गल्ल्यावर  बसलेला गणपती, दो-यापासून बनवलेला गणपती, गणेश मुखी दुर्मिळ रुद्राक्ष, नारळात कोरलेला गणपती असे अनेक गणपती यात आहेत. दिलीपभाऊंच्या संग्रहातील ही अफाट विविधता डोळे दिपवणारी आहे. नेपाळ ,चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, आफ्रिका, श्रीलंका, भूतान, सुदान आणि इतर ठिकाणच्या देखण्या मूर्तीही या संग्रहात आहेत.

आपल्या या आगळ्यावेगळ्या  छंदाबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलीप ठाकूर यांनी अतिशय हृदयस्पर्शी अशी माहिती दिली.१९८९ पर्यंत ठाकूर हे अंधश्रद्धा चळवळीचे श्याम मानव व दाभोळकर यांचे अनुयायी होते.  गणेशोत्सवातील एका प्रसंगाने त्यांचे जीवन बदलून गेले. त्यांच्या आईचे सतत डोके दुखत असल्यामुळे नांदेडच्या डॉक्टरांच्या सल्यानुसार हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये आईचे डोळे तपासण्यासाठी नेले होते. डोळ्यांची एक चाचणी केल्यानंतर आईला दिसेनासे झाले. त्यावेळी आईसोबत एकटेच असल्याने त्यांना काहीच सुचत नव्हते.  घाबरलेल्या मनःस्थितीत दिलीप ठाकूर यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये असलेल्या  गणेशमूर्तीला नवस केला , जर आईला पूर्ववत दिसू लागले तर  एस.टी. महामंडळाच्या गणपती उत्सवासाठी मूर्ती देईन. चमत्कार म्हणा किंवा आणखी काही म्हणा,थोड्याच वेळात आईला पूर्वीसारखे दिसू लागले. तेव्हापासून नास्तिक भाऊंचे कट्टर गणेशभक्तात रूपांतर झाले.या आराध्य देवतेच्या भक्तीपोटी मूर्ती संकलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.एक वर्षाचा नवस असतांनाही तब्बल ३४ वर्षापासून नांदेडच्या एस.टी.कर्मचारी गणेश मंडळाला ठाकूर हे आवर्जून गणेशमूर्ती देत आहेत. दरवर्षी वेगळी मूर्ती द्यावी या उद्देशाने त्यांनी मूर्तिकाराला दाखवण्यासाठी जमा केलेल्या मुर्त्यांचे आता विशाल  संग्रहात रूपांतर झाले आहे. सुरुवातीला ५१ गणेशमूर्तींचा संग्रह करण्याचा संकल्प त्यांनी केला होता, पण पुढे हा आकडा वाढत गेला. त्यांच्या संग्रहातील एक मूर्ती अष्टविनायकासह अनेक नामवंत मंदिरातील मुख्य मूर्तींना स्पर्श  करून आणलेली आहे. या मूर्ती समोर दिलीपभाऊ दररोज गणपती स्तोत्राचे पठण करून पूजा करतात. सत्य गणपती येथे दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला दिलीप ठाकूर यांच्या संयोजनाखाली १५१ पदयात्रा संपन्न झाल्या आहेत. नांदेड शहरातील गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी गणेशोत्सव काळात गणेशदर्शन स्पर्धेचे आयोजनदेखील करतात.ठाकूर यांची गणेशभक्ती माहीत असल्यामुळे अनेक परिचित त्यांना आढळलेली नाविन्यपूर्ण  मूर्ती आणून देतात. त्यामुळे नेहमी अद्ययावत होत असलेलेहे संग्रहालय गणेशभक्तांनी आणि कलाप्रेमींनीही आवर्जून पाहावे असेच आहे. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *