कंधार ; दिगांबर वाघमारे
———————
कंधार शहरातील खडंकी माता मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र या गंभीर बाबींकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आगामी नवरात्र महोत्सवापूर्वी नगरपालिका प्रशासनाने या परिसराची स्वच्छता करावी. अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भजपाचे शहराध्यक्ष अॅड.गंगाप्रसाद यन्नावार यांनी कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे
.
कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की, कंधार शहराचे ग्रामदैवत अष्टभुजा खडंकी माता मंदिर, सिद्धिविनायक गणेश मंदिर, तलाव कट्टा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी नालीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडल्या जात आहे. त्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच या मंदिराची विटंबना होऊन भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या संदर्भात गणेशोत्सवापूर्वी या परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही.
नगरपालिका प्रशासनाने हिंदूंच्या जनभावनांचा विचार करून आगामी नवरात्र महोत्सवाच्यापूर्वी या परिसराची स्वच्छता करावी. तसेच नालीच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा मंगळवार, १० ऑक्टोबरपासून नगरपालिकेच्या कार्यालयासमोर कंधार शहरातील सर्व भाविकांच्या वतीने मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भजपाचे शहराध्यक्ष अॅड.गंगाप्रसाद यन्नावार यांनी कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी (नांदेड), पोलीस अधीक्षक(नांदेड), उपविभागीय अधिकारी(कंधार), उपविभागीय पोलीस अधिकारी(कंधार), तहसीलदार (कंधार), पोलीस निरीक्षक( कंधार) यांना दिल्या आहेत.