माणसात हरवलेली माणुसकी

 बालक जन्माला येते वेळेस माणुसकी सोबत आणत नाही, तो बालपणा पासून शिकतो, त्याच्यावर आई-वडील शिक्षक चांगले संस्कार करतात. त्यामुळे तो माणुसकीकडे जातो. यासाठीच साने गुरुजींनी’ खरा तो एकची धर्म’ हे वाक्य सांगून सकल समाजाला एकच धर्म शिकवतात.

 

जगात अनेक धर्म आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, इस्लाम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू परंतु सर्वांची तत्त्वे माणुसकीला धरून आहेत. म्हणूनच माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. *माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावे याला माणुसकी म्हणतात*. माणूस ही एकच पृथ्वीतलावर जात आहे . त्यामुळे तिला महत्त्व आहे. माणसा- माणसां मध्ये भेदभाव करू नका. स्पृश्य -अस्पृश्य मानव समाजात दरी निर्माण करू नका.

 

 

माणुसकीचे उच्चाटन करू नका. असे आपण ऐकतो, पहिल्या महायुद्धात लाखो सैनिक मारले गेले. जर्मनीने व्हसार्यचा तह धुडकावून लावला ,त्याला कागदाचा एक चिटोरा समजून हिटलरने फेकून दिला. त्याचे दुरगामी दुष्परिणाम दुसऱ्या महायुद्धात झाले, दुसऱ्या महायुद्धात तर पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त सैनिक मारले गेले. हे युद्ध आकाशात, सागरात, जमिनी वर लढले गेले. त्यामुळे मानव जात नष्ट होते की काय? अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली हे दोन्ही महायुद्ध जास्तीत जास्त संहारक ठरली.1945 नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने मध्यस्थी करून यापुढे युद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी असे ठणकावून सांगितले, तोपर्यंत बरीच माणुसकी वाहून गेलेली होती, 6 ऑगस्टला जपानच्या हिरोशिमा व 9 ऑगस्टला नागासाकी शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले तेव्हा उरलीसुरली माणुसकी ही तळाला पोहचली. माणुसकी हा धर्म मानावे आपण सहज म्हणतो. नक्षलवादी संघटना काय करीत आहेत? माणुसकीचे डोस किती पाजले तरी काही फरक पडत नाही.

 

 

इतरांना त्रास देऊ नये, वाईट वागू नये, माणुसकी सोडू नये, असे आपण सांगतो. माणूसकी हरवल्यामुळे माणसांमाणसा मध्ये असुरक्षितता वाढत आहे. त्यामुळे ताण तणाव निर्माण होत आहे, त्यातून माणूस दहशतवादाकडे पुन्हा जात आहे,चांगले आचार -विचार शिक्षकांनी शिकवलेले असतात. तरी समाजामध्ये माणूस आल्यानंतर काही जनाच्या मनात वाईट विचार निर्माण होतात. सध्या प्रत्येक राष्ट्र एकमेकांच्या विरोधात उभे राहताना दिसत आहे. अनेक लोकांचे त्यात बळी गेले. माणुसकी काही लोकांकडे थोडी सुद्धा शिल्लक राहिली नाही. बॉम्ब टाकून लोकांचे जीवन संपवले जात आहे. मणिपूर राज्यात महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात .तेव्हा माणुसकी कुठे जाते? भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत
असे आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो पण वागतो ते वेगळेच?

 

माणूसकी म्हणून खरोखरच वार्धक्यामध्ये आलेल्या लोकांना आपण मदत करतो काय? याचा विचार करावा लागतो, दररोज आपण रेल्वेमध्ये, बसमध्ये कुठेही मुलींना त्रास दिला जातो, अशा बातम्या ऐकतो. समाजामध्ये गर्दीच्या ठिकाणी महिलांना त्रास दिला जातो? असे का होते ?कारण माणुसकी कमी होत आहे. गैरमार्गाने, जबरदस्तीने काही माणसं वाईट कृत्ये करतात, तेच जर प्रेमाने सामंजस्याने केले तर बरे होते. दहशतीचा गैरमार्ग समाजात निर्माण करून वर्गणी गोळा केली जाते व उत्सव साजरे केले जातात. ही प्रवृत्ती गुंड ,टग ,मुजोर व मवाली लोकांकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करून उत्सव साजरा करण्यात काय पुरुषार्थ आहे? असे मला वाटते ,जबरदस्तीने केलेली कामे कोणतीही चांगली नसतात, प्रेमाची ताकद फार जास्त असते, काया सरली, माया उरली, असे म्हटले जाते. शरीर हे आपल्या कधी सोडून जाणार आहे, परंतु दिलेले प्रेम माया जगात कायम राहणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या पायावर खिळे ठोकलेल्या लोकांना सुद्धा क्षमा करून सोडून दिले, म्हणून माणुसकीने जग जिंका, सत्कृत्ये करणाऱ्या व्यक्तीसोबत नेहमी रहा, वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, कारण ते तुम्हाला माणुसकी पासून दूर घेऊन जातील ,चंदनाची संगत केली की हाताला सुगंध येतो, कोळशाचे संगत केली की हात काळे होतात,

 

असे म्हटले जाते, म्हणून चांगलेच मित्र ठेवा ,सध्या मित्र मिळणे सुद्धा खूप कठीण झाले आहे, आज नेटवर हजारो मित्र आहेत परंतु दवाखान्यामध्ये भेटण्यासाठी किती येतील हे न सांगितलेले बरे, *सारा गाव मामाचा एकही नाही कामाचा* ही म्हण पूर्वीच्या काळी खरोखरच अनुभवावरून लिहिली गेली असावी असे मला वाटते, म्हणून जीवनामध्ये माणुसकी बाळगा ,लहान मुलांना चांगले शिकवा, दिव्यांग व्यक्तींना मदत करा ,शरीराच्या बाह्य वर्तनावरून कोणाचाही अंदाज काढू नका, काळी सावळी माणसं सुद्धा वागायला फार चांगली असतात ,गोरी व्यक्ती कधीही दगा फटका करतील सांगता येत नाही, म्हणून त्यांचे मन किती निर्मळ आहे हे शोधा ,हवं ते मिळाले तरी खूप काही कमी असतं ,चांदण्याने भरून सुद्धा आभाळ आपलं रिकामा असतं,
असं होऊ देऊ नका, जगण्याचा आनंद घ्या किती वर्षे जगलो याची गणती करण्यापेक्षा किती जणांना तुमच्या जगण्यातून आनंदी मिळाला. तुमच्यामुळे किती जणांचा आयुष्य सुधारले त्याचा हिशोब करा *या जगण्यावर शतदा प्रेम करावे* असे उगीच म्हटले जात नाही, कुसुमाग्रजांचे हे काव्य सकल समाजाला प्रेरणा देते, मानवाला शरीरासाठी व्यायामाची आवश्यकता आहे,

 

बुद्धीसाठी अभ्यासाची गरज आहे, स्वच्छ व निर्मळ मनासाठी मनन व ध्यानांची गरज आहे .त्यासाठी माणुसकी पेरत चला ती उगवत जाईल आणि एक महापुरुष या पृथ्वीतलावर होऊन गेले त्यांचे आज सुद्धा आपण आठवण काढतो, त्यामुळे आपल्या विचारात परिवर्तन होतात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी हे विश्वचि माझे घर म्हणून सर्व समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, हा समाज एक मंदिर आहे, कुटुंब हे गाव सर्व काही माझा आहे, म्हणून त्यांनी *वसुधैव कुटुंबकम* या उक्तीप्रमाणे जगाला ज्ञान दिले म्हणून आपली विचारधारा चांगले व उत्तुंग ठेवा, सध्याच्या धकाधकीच्या ,गर्दीच्या ,अशांततेच्या युगात माणुसकी मागे पडत आहे, शांती लोप पावत आहे.

 

नकारात्मकता वाढली आहे. शत्रुत्व, दुःख ,वादविवाद, भांडणे जास्तीत जास्त होत आहेत. म्हणून माणुसकीच्या विचाराने एकत्र या. एकमेकांवर प्रेम करा. पैशासाठी एकमेकाचा छळ करू नका. एका हाताने घेतले तर दुसऱ्या हाताने द्या. तेव्हाच माणूसकीचा धर्म या जगात टिकेल. तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला.
स्वामी विवेकानंदानी आपली भारतीय संस्कृती किती महान व श्रेष्ठ आहे हे शिकागोच्या धर्मपरिषदेत दाखवून दिले, डॉ ,ए ,पी ,जे अब्दुल कलामनी त्यांच्या अग्निपंख आत्मचरित्रातून जगाला माहिती दिली,
आज तुम्ही स्वत:भूतकाळ दूर ठेवा, वर्तमानाला जवळ करा, आज पर्यंत जे झालं ते विसरून जा, समोरच्यांना क्षमा करायला शिका, दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा. मन मोठं करून समोरच्याला क्षमा करा. वर्तमानात जगण्याचा व भूतकाळातील काही अनिष्ट रूढी, परंपरा विसरण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ,अंधश्रद्धा बाळगून माणसांना त्रास देऊ नका, दिवसभरात डोळ्यांना दिसणारी दृश्य सगळे चांगलीच आहेत का? याचा विचार करा. प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर ही तुमचे बंधने लादू नका, आपण काय आहोत? वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळणार आहे आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला काहीच महत्त्व नसते,

 

चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात म्हणून माणुसकी
पेरत चला, प्रत्येक गोष्टीवर तुम्ही तुमचा अधिकार गाजू नका, काही गोष्टीविषयी इतरांनाही काही अधिकार गाजू द्या, कारण त्यांना इच्छा आकांक्षा आहेत हे विसरू नका ,दुर्योधनाची गीता वेगळी आणि अर्जुनाची गीता वेगळी होती म्हणून स्वतःचा दृष्टिकोन बदला … दिसत तसं नसतं असं नाही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या विवेक बुद्धीने करा, आज पेरलं जातं ,तेच बाहेर बहरू लागतं हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून मी जसा आहे तसाच खूप सुंदर आहे परिपूर्ण आहे.असा दृष्टिकोन ठेवा. इतराबद्दल वाईट तुलना करू नका .आज जे तुमच्याशी चांगले वागत आहेत ते तुमच्या सोबत उद्या चांगलेच वागतील असे सांगता येत नाही, प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या विचाराचे किंवा अनुभवाचे लोक मिळतील असे अजिबात नाही, कोणाकडून काय घ्यावे काय घेऊ नये? हे तुमच्यावर अवलंबून आहे म्हणून आदर्श विचारसरणी ठेवा, चांगल्या वाईट प्रत्येक समाजप्रवाहाशी समरस व्हा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या. खरंच तुम्ही माणुसकी निर्माण करू शकता, जग बदलायचे आहे तर अगोदर स्वतः बदला, शेवटी एवढेच सांगेन ? एका मिनिटात तुमचे आयुष्य बदलू शकत नाही; परंतु मिनिटभर विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचे आयुष्य नक्की बदलू शकते,हे ठामपणे सांगता येते, निर्णय क्षमता हे कशी आहे ते स्वतः तुम्हालाच घ्यायची आहे ,
आज अमावस्या असल्याने अंधार आहे, म्हणून पळून जाता कामा नये, तर न घाबरता या अंधारात सुद्धा मी माझा उजेड निर्माण करेल ही जिद्द जो बाळगतो तो माणुसकीच्या दिशेने चालतो.

 

*शब्दांकन*
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी. ता मुखेड .जि नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *