जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त सभासद नोंदणी सुरु
कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
: मानवी जीवनात ग्रंथांना गुरुचे स्थान मिळाले आहे. ग्रंथ हेच आपल्या जीवनात दींपस्तंभासारखे कार्य करतात. तेच आपल्याला खरी दिशा दाखवतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले वाचन वाढवले पाहीजे, असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र गहाळ यांनी केले.
माजी राष्ट्रपती, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा (दि. 15) हा सन 2015 पासून ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. गहाळ बोलत होते.
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त व्याख्यान कथाकथन व ग्रंथप्रदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साहित्यिक राजेंद्र गहाळ हे व्याख्याते व उद्घाटक म्हणून तर प्रा. राहूल नितनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार कसा होईल आणि वाचन संस्कृती कशी वृद्धींगत होईल, या विषयावर राजेंद्र गहाळ यांनी विचार मांडले. त्याचा लाभ वाचनप्रेमी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच विद्यार्थ्यांना, नवीन पिढीला व जनतेला वाचनाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या विद्यार्थी व वाचक प्रेमी ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. त्यानिमित्त दि. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर,2023 पर्यंत विशेष वाचक सभासद नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रंथप्रेमी वाचकांनी मोठ्या प्रमाणावर सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय निरीक्षक बालासाहेब देवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी केले. या वेळी कोडींबा गाडेवाड, रुपेश मोरे, ग्रंथालय पदाधिकारी, वाचक व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. सभासद नोंदणी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कल्याण नगर, वसमत रोड, परभणी (८८८८७५४७५३) येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे
*****