भाषेवर प्रभुत्व हवं असेल तर वाचन हवं , उत्तम श्रवण हवं.. त्यातुन इंग्रजी माध्यमाची क्रेझ त्यामुळे बऱ्याच लोकांना हे शब्द माहीतच नाही आणि त्यातुन एखाद्याला पुण्यात रहायचं असेल तर त्याने याचा अभ्यास जरुर करावा..
एक फ्रेण्ड ने सांगितलेला किस्सा , पुण्याबाहेरुन येणाऱ्या भाडेकरु ला ती म्हणाली , तुम्ही दुधाचा रतीब लावु शकता त्यावर तो म्हणाला , ते काय असतय …या पिढीची चुक आहे असाच नाही पण मराठी पुस्तक वाचली तर असे अनेक अडगळीत गेलेले शब्द आणि त्यांचं सौंदर्य याची ओळख होते..
दोन महिन्यापुर्वी ट्रीपला गेलो असताना एकीचं पोट बिघडलं.. माझा मित्र म्हणाला , खरं तर तु लंघन करायला हवस , त्यावर ती म्हणते , ते काय असतय ??.. पुण्यासारख्या सिटीत लहानाची मोठी झालेली ती आणि महत्वाचं म्हणजे मराठी माध्यमात शिकलेली पण पूर्णपणे हुकलेली म्हणु.. दिसेल ते आणि कुठल्याही वेळी काहीही खायची सवय असलेल्या मुलीला लंघन हा शब्द काय माहीत असणार.. खरं तर तिला उत्तर द्यायलाही नको वाटत होतं.. कारण मी सांगितलेलं तिच्या मेंदुत गेलच नसतं.. वाचन अजिबात नाही आणि कोणाचं काहीही ऐकायची सवय नाही..
यंग जनरेशन आणि त्यांची मेंटॅलीटी तर अजुनच वेगळी..
मी रोज इतक्या वेगवेगळ्या विषयावर लिहीत असते पण त्यांचं लक्ष माझ्या फिगरवर किवा फोटोवर .. त्यातील अनेक मुलांना अजिबात वाचायला आवडत नाही.. सेक्स विषय दिसला की उड्या मारायला लागतात पण मला काय सांगायचय हे ते जाणूनच घेत नाहीत..वाचनाची आवड नाही त्यामुळे त्यांना जुने शब्द कळणार तरी कसे ना..
वाळवण घालायचय असं काकु म्हणाली , तर तरुण मुलगी बुचकळ्यात पडली. यातील वाळवण हा शब्दही माहीत नाही आणि ती बुचकळ्यात पडली म्हणजे नक्की काय झालं याचाही अर्थ कळत नाही.. त्या काकूला बिचारीला तिला समजवुन सांगता येइना , त्यावर ती मुलगी म्हणाली , आपण हेअर ड्राय करतो ते वाळवण का ??त्यावर काकु म्हणाली , केस वाळवणं असतं गं.. वाळवण म्हणजे कुरड्या , पापड्या ,किवा उन्हाळ्यात धान्य वाळवुन ठेवतो ते .. फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे पण अर्थ किती बदलतो ना.. एका टिंबाने अर्थाचा अनर्थ होतो.. त्यावर ती मुलगी म्हणाली ,म्हणजे ण वर टिकली लावायची का ??.. आता मात्र काकु बुचकळ्यात पडल्या त्या म्हणाल्या , कुंकु गं , टिकली तर टिकली.. गेलं ना सगळं डोक्यावरुन ??.. म्हणुन भाषेवर प्रभुत्व हवं आणि वाचनावर प्रेम हवं..
सगळं गुगल वर मिळेल पण शब्दांचे खेळ उत्तम वाचकच जाणु शकतो.. अंगणात सडा घालुन आपण सडसडीत रहातो हे काळाआड गेलं कारण घराला अंगणच राहिलं नाही त्यामुळे सडसडीत राहायला जीम लावावी लागली.. सडा , अंगण हे सुंदर शब्द निघुन गेले.. सांडशी म्हणजे चिमटा , आपण काढतो ते चिमटे नाहीत हा.. रोवळी ,सुप , उखळ , मुसळ , कढण सगळे शब्द गायब त्यामुळे त्यातुन निघणारी शुध्दताही गायब.. आपल्या साहित्यात या सगळ्या गोष्टी आहेत फक्त रील च्या जमान्यात रीअल गेलं आणि कृत्रिमता आली.. छोट्या गावात जे लहानाचे मोठे झाले त्यांना काहीतरी माहीत आहे पण शहरात वाढलेल्यानी साहित्याचा आधार घ्यायलाच हवा..
काहीना काही सतत वाचत रहा..
सोनल गोडबोले..